भाजीपाल्याचा पुरवठा विस्कळित

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 जून 2017

पुणे - भाजीपाल्याचा तुटवडा निर्माण झाला असला, तरी अद्याप ग्राहक पर्यायांकडे वळले नाहीत. अंडी, कडधान्य हे पर्याय ठरू शकतील, पण त्याची मागणी वाढलेली नाही. संप सुरूच राहिला तर मागणी वाढण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. आठवडे बाजारही बंद आणि ‘ऑनलाइन ’ विक्रीवरही मर्यादा आल्याने भाजीपाला पुरवठा विस्कळित झाला आहे.

पुणे - भाजीपाल्याचा तुटवडा निर्माण झाला असला, तरी अद्याप ग्राहक पर्यायांकडे वळले नाहीत. अंडी, कडधान्य हे पर्याय ठरू शकतील, पण त्याची मागणी वाढलेली नाही. संप सुरूच राहिला तर मागणी वाढण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. आठवडे बाजारही बंद आणि ‘ऑनलाइन ’ विक्रीवरही मर्यादा आल्याने भाजीपाला पुरवठा विस्कळित झाला आहे.

शेतकऱ्यांनी पुकारलेल्या बंदमुळे पुण्यातील भाजीपाल्याचा पुरवठा विस्कळित झाला आहे. पालेभाज्यांमध्ये मेथी, कोथिंबीरीचे भाव ४० रुपयांपर्यंत पोचले आहे. फळभाज्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. शनिवारी मार्केट यार्ड येथील घाऊक बाजार साप्ताहिक सुटीमुळे बंद असेल. त्यामुळे आवक होण्याची शक्‍यता नसल्याने भाजीपाल्याचा पुरवठा सुधारण्याची चिन्हे नाही. त्याचवेळी कडधान्य आणि अंडी यांच्याकडे ग्राहक वळेल, अशी अपेक्षा होती. परंतु, त्याची अद्याप मागणी वाढली नाही. मटण आणि चिकन यांचे प्रति किलोचे भाव जास्त आहेत. मासळीचे भावही सध्या तेजीत आहे. त्यामुळे हे भाजीपाल्याला तुर्तास पर्याय ठरू शकत नाहीत. 

सध्या कडधान्यांचे भाव कमी असून, ते भाजीपाल्याला पर्याय ठरू शकतात. मांसाहार करणाऱ्यांकरिता अंडी हा देखील पर्याय आहे. त्याचा सध्या प्रति नगाचा भाव ४ रुपये इतका आहे. या दोन्ही पर्यायांचा अद्याप ग्राहकांकडून विचार झाला नाही. येत्या दोन तीन दिवसांनंतर त्यांची मागणी वाढेल असे व्यापारी सांगत आहे. मार्केट यार्ड येथील कडधान्य विक्रेते विजय राठोड यांनी कडधान्यांची अद्याप मागणी वाढली नसल्याचे नमूद केले. ‘‘ गेल्या महिन्याभरापासून कडधान्य आणि डाळींच्या भावांत घसरण सुरू आहे.

शेतकऱ्यांचा संप सुरू होऊन दोन दिवस झाले असून, पुढील काळात कदाचित कडधान्यांची मागणी वाढू शकते,’’ असेही त्यांनी सांगितले. अंड्यांची मागणी उन्हाळ्याच्या कालावधीत कमी होत असते, याकडे लक्ष वेधत उत्पादक विजय मोरे म्हणाले, ‘‘मांसाहारामध्ये अंडी हीच सध्या स्वस्त आहे. त्यामुळे पुढील काळात त्याची मागणी वाढू शकते. पुरवठाही नियमित आहे.’’

आठवडे बाजार बंद
पणन मंडळाच्या सहकार्याने शेतकऱ्यांचे विविध गट पुणे शहरात ४२ ठिकाणी आठवडे बाजार आयोजित करीत असतात. या आठवडे बाजारातही भाजीपाल्याची विक्री थांबली आहे. त्यामुळे भाजीपाला विकत घेण्यासाठी ग्राहकांसमोर पर्यायच राहिला नाही.