वाहन परवान्याच्या "ई-पेमेंट'साठीही वेटिंग !

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 ऑगस्ट 2017

पुणे - वाहन परवान्याच्या परीक्षेसाठी आतापर्यंत नागरिकांना वेटिंग करावे लागत होते. आता परवान्यासाठीच्या परीक्षेनंतर "लायसन्स फी' भरण्यासाठी "ई-पेमेंट' करण्यास 24 तासांचे वेटिंग दाखवत आहे. हा अजब प्रकार शुक्रवारी समोर आला.

वाहन परवान्यासाठी द्याव्या लागणाऱ्या परीक्षेआधी अर्जदारास शुल्क भरावे लागते. यासाठी आता ई-पेमेंट केले जाते. मात्र शुक्रवारी ई-पेमेंट करताना तांत्रिक अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे ही पेमेंट प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी 24 तासांचा कालावधी लागेल, अशी "एरर' प्रणालीमध्ये दिसत होती. त्यामुळे आता ई-पेमेंटसाठीही वेटिंग सुरू झाल्याचे बोलले जाऊ लागले आहे.

दरम्यान, या प्रकारामुळे अनेक नागरिकांना वाहन परवान्यासाठीची प्रक्रिया विनाअडथळा पूर्ण करता आली नाही. साधारणपणे पन्नास टक्के अर्जदारांना या "एरर'चा सामना करावा लागला. या नागरिकांनी ई-पेमेंट होत नसल्यामुळे आरटीओतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करून पर्यायी मार्ग शोधून काढला. त्यानंतर त्यांचे शुल्क स्वीकारले गेले. वास्तविक, पेमेंटसाठी वेटिंग असण्याची अजिबात शक्‍यता नाही. परंतु तांत्रिक अडचणीमुळे प्रणालीमध्ये हा "एरर' दाखविण्यात येत असून, परवाना विभागाचे अधिकारी त्यासंबंधीची दुरुस्ती करून देत आहेत. यामुळे परवाना विभागात मोठ्या प्रमाणावर नागरिकांची रांग लागली होती.