मतदार याद्यांचा विशेष पुनर्निरीक्षण कार्यक्रम

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 सप्टेंबर 2017

3 ऑक्‍टोबर ते 3 नोव्हेंबर या कालावधीत मोहीम

3 ऑक्‍टोबर ते 3 नोव्हेंबर या कालावधीत मोहीम
पुणे - मतदार यादीत नाव नोंदविणे, दुरुस्ती करणे, स्थलांतरित करणे अथवा मयत मतदारांची नावे मतदार यादीतून वगळणे यासाठी जिल्हा प्रशासनाने मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण (दुरुस्ती) कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार जिल्ह्यात 3 ऑक्‍टोबर 2017 ते 3 नोव्हेंबर 2017 या कालावधीत ही मोहीम राबविली जाणार आहे.

निवडणूक आयोगातर्फे 1 जानेवारी 2017 या अर्हता दिनांकावर आधारित ही मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेचा आढावा उपजिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंग यांनी घेतला. येत्या मंगळवारी (ता. 3) प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. या मतदार यादीतील नावांसंदर्भात हरकत असेल तर 3 ऑक्‍टोबर 2017 ते 3 नोव्हेंबर 2017 या कालावधीत दावे व हरकती स्वीकारण्यात येणार आहेत. 7 ते 13 ऑक्‍टोबर 2017 या कालावधीत मतदार यादीतील संबंधित भागाच्या ग्रामसभा; तसेच स्थानिक संस्था येथे वाचन करून नावांची खातरजमा करण्यात येणार आहे; तर जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर 8 आणि 22 ऑक्‍टोबरला विशेष मोहीम राबविली जाणार आहे.

मतदार यादीतील नावांवरील हरकतींवर सुनावणी घेऊन त्या 5 डिसेंबरपर्यंत निकाली काढण्यात येणार आहेत. त्यानंतर 20 डिसेंबर 2017 पर्यंत मतदार याद्या अद्ययावत केल्या जाणार आहेत. 5 जानेवारी 2018 ला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे, अशी माहिती सिंग यांनी दिली.

मतदार नोंदणीसाठी सर्व मतदार नोंदणी अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी, महापालिका क्षेत्रातील सर्व क्षेत्रीय कार्यालये, सर्व गटविकास अधिकारी, सर्व नगरपालिका कार्यालये; तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखा येथे संपर्क साधावा, असे आवाहन सिंग यांनी या वेळी केले.

विद्यार्थ्यांना महाविद्यालयातच सुविधा
या मोहिमेदरम्यान मतदार यादीत नाव असल्याची खात्री करता येणार आहे. 1 जानेवारी 2018 रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण करणाऱ्यांना; तसेच ज्यांची नावे मतदार यादीत नाहीत त्यांना नाव नोंदविण्याची संधी या मोहिमेद्वारे मिळणार आहे; तसेच पत्त्यातील दुरुस्ती, दुबार, मृत किंवा स्थलांतरित मतदारांची नावे या मोहिमेत वगळता येणार आहेत. महाविद्यालयातील ज्या विद्यार्थ्यांचे वय 18 वर्षे पूर्ण असेल, अशा विद्यार्थ्यांना अर्ज नमुना 6 त्यांच्या महाविद्यालयातच भरून सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती सिंग यांनी दिली.