जंतुसंसर्ग टाळण्यासाठी हात धुवा स्वच्छ

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 ऑक्टोबर 2017

पुणे - देशाचा सर्व आघाड्यांवर वेगाने विकास होत असला तरीही बहुसंख्य नागरिकांना आजही वैयक्तिक आरोग्याची प्राथमिक माहिती नाही. त्यातूनच देशापुढील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा प्रश्‍न गंभीर होत आहे. कोणतेही अन्नपदार्थ खाण्यापूर्वी स्वच्छ हात धुणे याची जागृती नसल्याने जंतुसंसर्ग होऊन आजारी पडणाऱ्या रुग्णांचे प्रमाण मोठे असल्याचे निरीक्षण या क्षेत्रातील तज्ज्ञांनी नोंदविले आहे.

पुणे - देशाचा सर्व आघाड्यांवर वेगाने विकास होत असला तरीही बहुसंख्य नागरिकांना आजही वैयक्तिक आरोग्याची प्राथमिक माहिती नाही. त्यातूनच देशापुढील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा प्रश्‍न गंभीर होत आहे. कोणतेही अन्नपदार्थ खाण्यापूर्वी स्वच्छ हात धुणे याची जागृती नसल्याने जंतुसंसर्ग होऊन आजारी पडणाऱ्या रुग्णांचे प्रमाण मोठे असल्याचे निरीक्षण या क्षेत्रातील तज्ज्ञांनी नोंदविले आहे.

‘हात धुवा दिवस’ गुरुवारी (ता. १२) साजरा होत आहे. त्या निमित्ताने आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी हात धुण्याचे महत्त्व सांगितले. ते म्हणाले, ‘‘प्लेगसारखे भयंकर साथीचे आजार आपण हद्दपार केले आहेत. आता स्वाइन फ्लूसारख्या वेगाने पसरणाऱ्या साथीचे आव्हान आपल्यापुढे आहे. ते पेलण्यासाठी सार्वजनिक स्वच्छतेबरोबरच वैयक्तिक आरोग्य सुदृढ राखणे, वैयक्तिक स्वच्छता ठेवणे अत्यावश्‍यक आहे. त्याची सुरवात स्वतःपासून झाली पाहिजे.’’ त्यासाठी कोणत्याही खाद्य पदार्थाला स्पर्श करण्यापूर्वी हात धुण्याची सवय स्वतःला लावून घेणे आवश्‍यक आहे, असा सल्लाही वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला. 

मुलांवर स्वच्छतेचे संस्कार हवे
लहान मुलांवर स्वच्छतेचे संस्कार करणे ही काळाची गरज आहे. कारण, खाण्यापूर्वी हात धुण्याची सवय ही मोठेपणी लागत नाही. त्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात; पण लहान मुलांना या चांगल्या सवयी पटकन लागतात. त्यामुळे देशाचा आधारस्तंभ असलेल्या लहान मुलांना हात धुण्याची सवय लागली पाहिजे. त्यासाठी पालक आणि विशेषतः शिक्षकांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे आवश्‍यक आहे. पुण्यात ‘स्वाइन फ्लू’ने थैमान घातला आहे. या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी वेळोवेळी साबणाने स्वच्छ हात धुणे, हा एक प्रभावी मार्ग आहे, याची जाणीव लहान वयातील मुला-मुलींना झाली पाहिजे. शालेय वयातच त्यांच्यावर आरोग्याचे आणि स्वच्छतेचे संस्कार केले पाहिजे, असे सामाजिक वैद्यकीय सेविका प्रज्ञा वाघ यांनी सांगितले. 

अस्वच्छता हेच आजाराचे मूळ
अस्वच्छता हेच ८० टक्के आजाराचे मूळ आहे. त्यामुळे वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छता राखणे आवश्‍यक आहे. कोणताही पदार्थ खाताना आपले हात स्वच्छ धुतलेले असले पाहिजे. तसेच, खाद्यपदार्थ खाण्यासाठी वापरलेला चमचा स्वच्छ धुतलेला असावा. त्यातून रोगजंतूंचा संसर्ग टाळता येतो. 

असे धुवा हात
सुरवातीला हातावर पाणी घ्या. तळ हाताला साबण लावा. हाताचे तळवे एकमेकांवर घासा. बोटे स्वच्छ करा. बोटांची टोके, नखे स्वच्छ करावी. दोन्ही बोटांच्या मध्येही घाण असते. ती स्वच्छ करावी. पुरेसे पाणी वापरून हात स्वच्छ धुवून घ्यावे.

हात धुणे का आवश्‍यक?
आपण कोणत्याही वस्तूला हात लावतो त्या वेळी त्यावर बसलेले असंख्य जंतू आपल्या हाताला चिकटतात.
आपल्या साध्या डोळ्यांनी न दिसणारे अनेक जंतू अन्नपदार्थांबरोबर आपल्या पोटात जातात. त्यातून वरचेवर आजारी पडण्याचे प्रमाण वाढते.
एकमेकाला केलेल्या हस्तांदोलनातूनही जंतूंचा संसर्ग होण्याचा धोका असतो.
आपल्या हातावर अनेक रासायनिक घटक असतात. त्यातून जुलाब, विषबाधा किंवा काविळीसारखे आजार होण्याची शक्‍यता असते.

आपल्याकडे पालक स्वतःच हात धुण्याचा कंटाळा करत असल्याचे दिसून येते. त्यामुळे लहान मुलांना हात धुण्याची सवय लावण्यापूर्वी पालकांनी बाहेरून घरात आल्यावर हात-पाय साबण लावून स्वच्छ धुणे आवश्‍यक आहे.
- डॉ. सचिन कुलकर्णी

Web Title: pune news Wash hands Infections