समान पाणीपुरवठा योजनेचा खर्च 290 कोटींनी कमी 

समान पाणीपुरवठा योजनेचा खर्च 290 कोटींनी कमी 

पुणे - नियोजित समान पाणीपुरवठा योजनेचा खर्च तब्बल 290 कोटींनी कमी झाला असून, सुमारे दोन हजार 325 कोटींच्या योजनेला बुधवारी अखेर "एस्टिमेट कमिटी'ची मंजुरी मिळाली. त्यात, सर्वाधिक जलवाहिन्या आणि "फायबर ऑप्टिकल डक्‍ट'च्या खर्चात जवळपास दोनशे कोटींची कपात झाली आहे. देखभाल- दुरुस्ती, जलवाहिन्या, तंत्रज्ञान आणि इलेक्‍ट्रॉनिक वस्तूंचाही खर्च कमी झाला आहे. त्यामुळे योजनेसाठी निविदा प्रक्रिया राबविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पुढील महिनाभरात निविदा काढण्यात येईल, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले. 

योजनेच्या कामाचे 2 हजार 615 कोटी 6 लाख 45 हजार 925 रुपयांचे पूर्वगणकपत्र (एस्टिमेट) मांडले होते. त्यावर दोन दिवस चर्चा झाल्यानंतर 2 हजार 325 कोटी 20 लाख 12 हजार 917 रुपयांच्या योजनेला मंजुरी दिल्याचे महापालिकेचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी बुधवारी सांगितले. 

समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत जलवाहिनी टाकणे, पाणी मीटर बसविणे, पंपिंग स्टेशनची कामे करण्यात येणार आहेत. मात्र, याआधीची निविदा जादा दराने आल्याचा आरोप होता. या पार्श्‍वभूमीर निविदा रद्द करण्यात आल्या, त्यानंतर फेरनिविदा काढण्यात येणार आहेत. त्यानंतर वस्तू व सेवा करामुळे (जीएसटी) अनेक वस्तूंच्या दरात बदल झाल्याने योजनेतील विविध कामांचे नव्याने "एस्टिमेट' करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार या योजनेच्या सल्लागार कंपनीने तयार केलेले जलवाहिन्या, पाणी मीटर, पंपिग स्टेशन आदी कामांबरोबरच दहा वर्षांच्या देखभाल दुरुस्तीच्या कामांचे पूर्वगणकपत्र एस्टिमेट कमिटीसमोर ठेवले होते. त्याबाबत अभ्यास करून सुमारे 290 कोटींचा खर्च कमी करण्यात आला, असेही वाघमारे यांनी सांगितले. ""योजनेसाठी खरेदी करण्यात येणाऱ्या मीटरमुळे 14 ते 15 कोटी रुपये वाचणार आहेत. शिवाय, जलवाहिन्या दोन प्रकारच्या असतील, ज्यामुळे खर्चात कपात झाली आहे. तसेच, "जीएसटी'मुळे काही खर्च कमी झाला असून, नव्याने निविदा काढण्यासाठी पुढील माहिनाभर काम करण्यात येणार आहे. त्यानंतर निविदा काढल्या जातील, असेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. 

कमी झालेला खर्च (कोटीत) 
जलवाहिन्या : 100 
फायर ऑप्टिकल केबल : 100 
देखभाल- दुरुस्ती : 33 
अन्य कामे : 57 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com