पुणे शहराला वर्षाला ८.१९ टीएमसी पाणी

पुणे शहराला वर्षाला ८.१९ टीएमसी पाणी

पुणे - पाणीबचत आणि समान पाणीपुरवठ्याची योजना शहरात राबविण्याची तयारी महापालिका करीत असतानाच जलसंपदा विभागाने जुनेच तुणतुणे वाजवत ‘पुण्याला सध्यापेक्षा जवळपास निम्मे पाणी द्या’ असे पत्र दिले आहे. मुळात जलसंपदाबरोबर झालेला करार ११ अब्ज घनफुटांचा म्हणजेच टीएमसीचा असताना आणि चाळीस टक्के गळती होत असल्याने पुण्याला १५ टीएमसी पाणी लागत असताना ‘वार्षिक ८.१९ टीएमसी पाणी वापरावे’, असा अजब ‘आदेश’ जलसंपदा विभागाने दिला आहे. धरणात पुरेसे पाणी असतानाही दरवर्षीप्रमाणे हा जुना वाद उकरून काढण्यात येत असल्याची संतप्त प्रतिक्रिया महापालिकेच्या वर्तुळातून व्यक्त होत आहे.

राज्य सरकारशी झालेल्या करारानुसार पुणे महापालिकेला वार्षिक ११.५० टीएमसी पाणी देण्यात येत आहे, परंतु शहराची आजची लोकसंख्या ३९ लाख १८ हजार इतकी गृहीत धरून दरडोई १५५ लिटरप्रमाणे ८.१९ टीएमसीपर्यंत पाणीपुरवठा करण्याचा आदेश प्राथमिक विवाद निवारण अधिकारी तथा जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता टी. एन. मुंडे यांनी नुकताच दिला. मात्र, पुण्यात पाणीगळतीचे प्रमाण ३५ ते ४० टक्के असल्याने सध्या १५ टीएमसी पाणी लागते आणि हद्दवाढीमुळे तो कोटा १८ टीएमसी करण्याची मागणीही करण्यात आल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले.

महापालिकेकडून मंजुरीपेक्षा अधिक पाणीवापर होत असल्याने शेतीसाठी पुरेसे पाणी मिळत नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. या पार्श्‍वभूमीवर बारामतीच्या उंडवडी गावचे शेतकरी विठ्ठल ज्ञानदेव जराड यांनी जलसंपदा विभागाकडे तक्रार केली. त्यावर सुनावणीत पुणे महापालिका, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता आणि खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांना प्रतिवादी करण्यात आले होते.

हद्दीलगतच्या २१ ग्रामपंचायतींनाही पाणीपुरवठा करावा लागतो. २०१७ मध्ये पुण्याची लोकसंख्या ३९ लाख १८ हजार असून शासनाने मंजूर केलेले ११.५ टीएमसी पाणी शहरास पुरत नाही, त्यामुळे सध्या महापालिकेकडून १५ टीएमसी पाणीवापर होत असून, मंजूर आरक्षणापेक्षा जादा पाणी घेण्यात येते, असे या सुनावणीत महापालिकेने सांगितले. सध्या गळतीचे प्रमाण ३५ टक्के असून २०२७ पर्यंत ते १५ टक्‍क्‍यांपर्यंत आणण्याची आणि समान पाणीपुरवठ्याची योजना आखण्यात येत आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात दरडोई १५५ लिटर पाणीवापराचा निकष लक्षात घेता, महापालिकेला ८.१९ टीएमसी पाणीपुरवठा पुरेसा नाही, असेही महापालिकेने म्हटले आहे. तर, १६.५० टीएमसी पाणीवापर होत असल्याचे जलसंपदा विभागाचे म्हणणे आहे. २०१७ ची लोकसंख्या ३९.१८ लाख, तर कॅंटोन्मेंट बोर्डाची लोकसंख्या १.५८ लाख गृहीत धरून जलसंपदा विभागाने ८.१९ टीएमसी पाणीपुरवठा करण्याचा आदेश दिला आहे. 

आदेशातील मुद्दे 
 महापालिकेच्या विविध यंत्रांचे आणि पाणी घेण्याच्या सर्व जागांचे नियंत्रण जलसंपदा विभागाकडे सोपवा
 कात्रज आणि पाषाण तलावातील पाणी वापरण्याबाबत पावले उचलावीत
 ग्रामपंचायतींची लोकसंख्या, किती बिले दिली याची आकडेवारी सादर करा
 मुंढवा जॅकवेलमधून प्रक्रिया करून बेबी कॅनॉलमध्ये ६.५ टीएमसी पाणी सोडा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com