'पाणी वितरणाचे नियोजन करा '

'पाणी वितरणाचे नियोजन करा '

पुणे - धरणक्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे खडकवासला धरणसाखळीतील खडकवासला, वरसगाव, पानशेत ही धरणे शंभर टक्के भरली आहेत. पवना आणि चासकमान धरणातील पाणीसाठादेखील समाधानकारक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतीसह, तलावांमध्ये पिण्यासाठी १५ ऑक्‍टोबरपर्यंत पाणी सोडण्याचा निर्णय सोमवारी कालवा सल्लागार समितीच्या आढावा बैठकीत झाला. दरम्यान, पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा काटकसरीने वापर करा, अशा सूचना पालकमंत्री गिरीश बापट यांनी या बैठकीत दिल्या.

‘खडकवासला, चासकमान आणि पवना प्रकल्प कालवा सल्लागार समिती’ची बैठक विधान भवनामध्ये पालकमंत्री बापट यांच्या अध्यक्षतेखाली पडली. या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे, आमदार अजित पवार, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्‍वास देवकाते, आमदार दत्तात्रेय भरणे, बाळा भेगडे, बाबूराव पाचर्णे, भीमराव तापकीर, सुरेश गोरे, जिल्हाधिकारी सौरभ राव, पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, पुणे महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार, सिंचन विभागाचे अधीक्षक अभियंता एस. डी. चोपडे आदी उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यातील धरणांसह खरीप हंगामाच्या सिंचन आणि पिण्याच्या पाण्याच्या नियोजनाचा आढावा घेण्यात आला. 

सध्या खडकवासलामध्ये १.८८ टीएमसी (९५ टक्के), वरसगाव १२.८२ टीएमसी (१०० टक्के) आणि पानशेतमध्ये १०.६५ टीएमसी (१०० टक्के) इतका पाणीसाठा आहे. टेमघर धरणाच्या दुरुस्तीसाठी तज्ज्ञ समितीने सुचविल्याप्रमाणे २ टीएमसी पाणीसाठा शिल्लक ठेवण्यात आला आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षातील एकूण पाणीसाठ्यात १.७५ टीएमसी कमी पाणीसाठा उपलब्ध होणार आहे. शहरातील वार्षिक पाणीवापर १६.५० टीएमसी इतका आहे. परंतु, मंजुरीपेक्षा ५ टीएमसी जास्त पाणीवापर महापालिकेकडून केला जातो. त्यामुळे आगामी रब्बी आणि उन्हाळी हंगामातील सिंचनाची गरज पाहता पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्याचे निर्देश पालकमंत्री बापट यांनी यावेळी दिले.

खडकवासला प्रकल्पांतर्गत २५ हजार हेक्‍टर क्षेत्र आणि निर्धारित पाणीवापर ५.४६ टीएमसी आहे. जानाई शिरसाई उपसासिंचन योजना वरवंड व शिर्सूफळसाठी ०.२८ टीएमसी तर दौंड इंदापूर नगरपालिकांसाठी ०.१४ आणि पुणे महापालिकेसाठी २.९५ टीएमसी पाणी आवश्‍यक असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. खडकवासला धरणसाखळीतील आवर्तनाच्या पाण्याचा विसर्ग पिण्याच्या पाण्याचे तलाव भरण्यासाठीदेखील करण्यात येणार आहे. 

तरंगवाडी, बळकुटी, घागरगाव, पळसदेव, पोंदवाडी, मदनवाडी, दौंड नगरपरिषद तलाव, माटोबा, खामगाव, भादलवाडी, वरंगळी तलावांना त्याचा फायदा होणार आहे. यासोबतच २२ जुलैपासून खडकवासलामधून आवर्तन सुरू करण्यात आले होते. पिकांसाठीचे सिंचन संपले असून जानाई-शिरसाई उपसा सिंचन योजनेमधून वरवंड शिर्सूफळसाठी १५ ऑक्‍टोबरपर्यंत पाणी सोडण्यात येत आहे. तर चासकमान धरणामध्ये सध्या ७.५१ टीएमसी पाणीसाठा शिल्लक असून १६ जुलैपासून कालव्यात पाणी सोडण्यास सुरवात करण्यात आली होती. खेड-शिरूर या दोन तालुक्‍यातील क्षेत्र या सिंचन क्षेत्रात येत असून पहिले आवर्तन ५ सप्टेंबरला संपले आहे. ६ सप्टेंबरपासून दुसरे आवर्तन सुरू करण्यात आले आहे. पिकांसोबतच लघुतलाव, पाझर तलाव, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे भरण्यासाठीदेखील पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.

रावेत बंधारा पुन्हा बांधावा
पवना धरण १०० टक्के भरले असून त्यात सध्या ८.५१ टीएमसी पाणीसाठा आहे. या प्रकल्पाचे सिंचन खासगी उपसासिंचन योजनेद्वारे होते. खरिपासाठी ०.७६ टीएमसी पाणी लागणार असून पिंपरी चिंचवडला पिण्यासाठी तळेगाव नगरपालिका आणि देहूरोड लष्कर पाणीपुरवठा केंद्रासाठी ०.११५ टीएमसी पाणी लागणार आहे. चार बंधाऱ्यांतील पाण्याचा मुळशी, हवेली आणि मावळ तालुक्‍यातील शेतकरी वापरत आहेत. रावेत बंधाऱ्यातून पिंपरी चिंचवड शहराला पिण्यासाठी पुरवले जात आहे. हा बंधारा जुना झाला असून त्याची अवस्था खराब आहे. त्यामुळे हा बंधारा नव्याने बांधा, अशी सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी केली.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com