समाविष्ट गावांनाही आता चोवीस तास पाणीपुरवठा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 ऑक्टोबर 2017

पुणे - महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांमधील रहिवाशांना समान व शुध्द पाणीपुरवठ्यासाठी स्वतंत्र चोवीस तास पाणीपुरवठा योजना राबविण्याचे नियोजन महापालिका प्रशासनाचे आहे. ही योजना राबविल्यानंतरच नव्या गावांमधील तीन लाख रहिवाशांना पुरेसा पाणीपुरवठा करणे शक्‍य होईल, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. सहा महिन्यांत योजनेचा प्राथमिक आराखडा तयार केला जाणार आहे. 

पुणे - महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांमधील रहिवाशांना समान व शुध्द पाणीपुरवठ्यासाठी स्वतंत्र चोवीस तास पाणीपुरवठा योजना राबविण्याचे नियोजन महापालिका प्रशासनाचे आहे. ही योजना राबविल्यानंतरच नव्या गावांमधील तीन लाख रहिवाशांना पुरेसा पाणीपुरवठा करणे शक्‍य होईल, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. सहा महिन्यांत योजनेचा प्राथमिक आराखडा तयार केला जाणार आहे. 

हद्दीलगतची अकरा गावे महापालिकेत आल्याने तेथील रहिवाशांना पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी महिनाभरात आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी त्या त्या गावांची लोकसंख्या, उपलब्ध सेवा-सुविधा आणि भविष्यातील गरज याची पाहणी करण्यात येत आहे. विशेषत: रस्ते, पाणी, वीज आणि आरोग्य सेवा तातडीने पुरविण्याची गरज असली तरी, जवळपास सर्व गावांमध्ये पाण्याची समस्या बिकट असल्याचे आढळून आले आहे. त्यापैकी काही गावांना महापालिका टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करत आहे. मात्र, ते पुरेसे नसल्याची गावकऱ्यांची तक्रार आहे. गावे महापालिकेत आल्याने गावकऱ्यांनीही पुरेसे पाणी पुरविण्याची मागणी लावून धरली आहे. मात्र, सुमारे तीन लाख लोकसंख्येला आजघडीला पाणीपुरवठा करणे महापालिकेला शक्‍य नाही, असे पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केले. मात्र, या गावांमधील पाणीपुरवठा योजनेची फेररचना करावी लागणार असल्याचेही सांगण्यात आले. 

शहरातही चोवीस तास पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यातील पाण्याच्या टाक्‍यांची कामे हाती घेतली आहेत. त्यातच, नवी गावे महापालिकेत आल्याने या योजनेत बदल करावा लागणार का, असा प्रश्‍न उपस्थित केला जात होता. मात्र, तित कोणताही बदल न करता, या योजनेच्या धर्तीवर गावांसाठी पाणीपुरवठा योजना राबविण्याचा विचार असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले. 

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी म्हणाले, ""महापालिकेत आलेल्या नव्या गावांमधील लोकसंख्या साधारण तीन लाख आहे. एवढ्या लोकसंख्येला रोज सव्वाचार कोटी लिटर पाणी पुरवावे लागणार आहे. त्याकरिता नियोजन करण्यात येत आहे. मात्र, सध्याच्या पाणीपुरवठ्यातून गावांना पाणी देणे शक्‍य नाही. ज्या गावांमध्ये पाण्याची समस्या अधिक आहे, तेथील रहिवाशांना टॅंकरद्वारे पाणी देऊ. मात्र, भविष्यातील लोकसंख्येचा विचार करून या गावांसाठी नवी पाणीपुरवठा योजना राबविणे आवश्‍यक आहे'' 

पाण्यासाठी सातत्याने पाठपुरावा 
पुणे शहरातील वाढती लोकसंख्या आणि धरणातून घेण्यात येणारा पाणीसाठा अपुरा ठरत आहे. त्यामुळे जादा पाणीसाठा देण्याची मागणी महापालिका प्रशासनाने राज्य सरकारकडे केली आहे. त्यासाठी सातत्याने पाठपुरावाही सुरू आहे. त्यातच, नव्या गावांसाठी वर्षांसाठी आणखी दोन अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा आवश्‍यक आहे. सध्याच्या स्थितीत या गावांना पाणीपुरवठा करायचा झाल्यास ताण येण्याची शक्‍यता असल्याने नवी योजना राबविण्याचा प्रयत्न महापालिका प्रशासन करणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले.