आम्ही लाभार्थी कधी होणार ?

आम्ही लाभार्थी कधी होणार ?

पुणे - ‘आम्ही तुम्हाला निधी देऊ’ असे सांगत सरकार वेगवेगळ्या योजना जाहीर करते. त्यासाठी आम्ही सरकारकडे वारंवार अर्ज केले; पण एकही पैसा मिळाला नाही. तो मिळाला असता तर आमच्याकडे असलेला ऐतिहासिक ठेवा जतन करण्याचे काम व्यापक पातळीवर आणि वेगाने पूर्ण झाले असते... अशा शब्दांत व्यथा मांडली आहे, शंभर वर्षे पूर्ण केलेल्या भारत इतिहास संशोधक मंडळाने. त्यामुळे सरकार आतातरी मंडळाला आर्थिक मदतीचा लाभ देते का?, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

देशाच्या सर्वांगीण इतिहासाचे संशोधन करणारी एक अग्रगण्य स्वायत्त संस्था म्हणून मंडळाकडे पाहिले जाते. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे, खं. चिं. मेहेंदळे, न. चिं. केळकर अशा अनेक दिग्गजांचा वारसा मिळालेल्या या संस्थेने आजवर इतिहास संशोधनात मोलाचे काम केले आहे. या मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ. श्री. मा. भावे यांची नुकतीच निवड झाली आहे. यानिमित्ताने ‘सकाळ’ने त्यांच्याशी संवाद साधला. या वेळी ‘अर्ज करूनही मंडळाला सरकारचा निधी मिळाला नाही’, हे त्यांनी स्पष्ट केले.

भावे म्हणाले, ‘‘मंडळाचे काम वर्षानुवर्षे लोकाश्रयावर सुरू आहे. येथील दुर्मिळ कागदपत्रे व वस्तूंचे जतन-संवर्धन, त्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देणे अशा महत्त्वाच्या कामांबरोबरच कर्मचाऱ्यांचे पगार, इमारत दुरुस्ती, स्वच्छता अशा निरनिराळ्या कामांसाठी निधीची आवश्‍यकता असते. सरकारने मदतीचा हात दिला तर या मंडळाच्या महत्त्वाच्या कामात गतिमानता येईल. शंभर वर्षे पूर्ण केलेल्या संस्थांना पाच लाख रुपयांचा निधी देऊ, असे सरकारने स्वत:हून सांगितले. सुरवातीला साहित्य-संस्कृती मंडळाकडे अर्ज करा, असे सांगण्यात आले. तसा अर्ज केला. नंतर इकडे नाही राज्य मराठी विकास संस्थेकडे अर्ज करा, असे त्यांनी नव्याने जाहीर केले. मग तिकडेही आम्ही अर्ज केला; पण निधी मिळाला नाही.’’

पुणे महापालिकेने २०१० मध्ये मंडळाला २५ लाखांची देणगी जाहीर केली होती; पण हाही निधी मिळाला नाही, अशी खंत व्यक्त करून भावे म्हणाले, ‘‘संस्थेतील वि. का. राजवाडे सभागृहाचे काम जुने आहे. आता ही वास्तू खचली आहे. हेरिटेज वास्तू असल्यामुळे योग्य त्या परवानगी घेऊन या सभागृहाची डागडुजी करण्यात येईल.’’

मंडळाची पुढची वाटचाल
संस्थेचे अधिकृत संकेतस्थळ सुरू करून त्या माध्यमातून संस्थेचे कामकाज सांगणे आणि निवडक ऐतिहासिक ठेवा सर्वांसाठी खुला करणे.

मंडळात ३३ हजार हस्तलिखित पोथ्या आहेत. त्यापैकी १५ हजार पोथ्यांचे ‘डिजिटायझेशन’ करणे व त्याची सूची बनवणे.

निरनिराळ्या घराण्यांतून गोळा केलेली मोडी, फारसी, कानडी, संस्कृतमधील जुन्या कागदपत्रांचे जतन करणे आणि त्याची सूची बनवणे.

मंडळाच्या चित्रशाळेचे नूतनीकरण करणे. भिन्न-भिन्न काळातील आणि विविध शैलीतील दुर्मिळ अशी साडेबाराशे चित्र ‘चित्रशाळे’त पाहायला मिळणार.

संस्थेत १९३० पासून शिवचरित्र साहित्यावर काम सुरू आहे. आत्तापर्यंत १६ खंड प्रसिद्ध झाले असून सतराव्या खंडावरील काम सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com