‘वाय फाय’च्या उद्‌घाटनाला मुहूर्त मिळेना!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 सप्टेंबर 2017

पुणे - स्मार्ट सिटीअंतर्गत ‘वाय फाय’ योजनेची पूर्तता झाली असली तरी उद्‌घाटनाचा मुहूर्त सापडत नसल्यामुळे ही योजना अधांतरीच आहे. 

पुणे - स्मार्ट सिटीअंतर्गत ‘वाय फाय’ योजनेची पूर्तता झाली असली तरी उद्‌घाटनाचा मुहूर्त सापडत नसल्यामुळे ही योजना अधांतरीच आहे. 

शहरात किमान २०० ठिकाणी ‘वाय फाय’ स्पॉट उभारण्याची महत्त्वाकांक्षी योजना महापालिकेने हाती घेतली आहे. त्यासाठी स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांतही त्याचा समावेश करण्यात आला. या प्रकल्पात सहभागी होण्यासाठी राष्ट्रीय- बहुराष्ट्रीय कंपन्यांनीही इच्छा व्यक्त केली होती. गुगल कंपनीचाही त्यात समावेश होता. गुगलने रेल्वे स्थानकावर वाय-फाय सुविधा पुरविली आहे. आता एलअँडटी, रेलटेलसोबत शहरात वाय-फाय स्पॉट निर्माण करण्याच्या उपक्रमातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. एखाद्या शहरात ‘वाय फाय’ स्पॉट निर्माण करण्यात गुगलने घेतलेला सहभाग, ही भारतातीलच नव्हे तर, जगातील पहिली घटना असल्याचे महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी म्हटले आहे. 

या योजनेनुसार महापालिकेने वाय-फायसाठी उद्याने, प्राथमिक शाळा, बस स्थानके, रुग्णालये, काही शासकीय कार्यालये आदी वर्दळीच्या ठिकाणी १२५ स्पॉट्‌स उभारले आहेत.

सुरवातीला या योजनेचे उद्‌घाटन २७ जून रोजी करण्याचे ठरले होते. त्यानंतर १६ सप्टेंबरचा मुहूर्त ठरला; परंतु काही कारणामुळे तो मुहूर्तही हुकला. आता पुढचा मुहूर्त मात्र अजून ठरलेला नाही. सत्ताधारी भाजप या कार्यक्रमाचा मुहूर्त ठरविणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. 

पहिली ३० मिनिटे फ्री 
‘वाय-फाय स्पॉट’ लोकप्रिय करण्यासाठी त्याचे उद्‌घाटन झाल्यावर ही सुविधा तीन महिन्यांसाठी मोफत देता येईल का, याचा आढावा घेण्यात येत असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. त्यानंतर माफक शुल्क आकारण्यात येणार आहे. त्यातही पहिली ३० मिनिटे वाय-फाय सुविधा मोफत देण्यात येणार असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.  

दसऱ्याला उद्‌घाटनाचा प्रयत्न 
याबाबत महापौर मुक्ता टिळक यांच्याशी संपर्क साधला असता, ‘वाय-फाय’ सुविधेच्या उद्‌घाटन लवकरात लवकर करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप परदेशात गेले आहेत. ते परतल्यावर ३० सप्टेंबरला उद्‌घाटन करण्याचा प्रयत्न करू, असे महापौरांनी सांगितले. 

Web Title: pune news wi-fi inauguration