आता एक पाऊल पुढं टाकायचं

आता एक पाऊल पुढं टाकायचं

अनामिकेने तिच्या आयुष्यातील ‘ती’ घटना सांगितली आणि ऐकून मनाचा थरकाप उडाला. ती एफवायला असताना एका नराधमाची वाईट नजर तिच्यावर पडली. बारावीनंतरचं कोवळं, निरागस वय, काही कळायच्या आत तिच्यावर असा अतिप्रसंग आला. खूप शिकायचं आणि नाव कमवायचं इतकच स्वप्न होतं तिचं. लहान गाव, साधी राहणी, फक्त आपल्या घराचा आणि संस्कृतीचा विचार करणाऱ्या अनामिकेवर अशी वेळ आली. ऐकून अंग शहारलं. अशा घाणेरड्या वृत्तीची किळस वाटली. एरवी मी मुलगी असल्याचा तोरा मिरवते, स्वतःला नशिबवान समजते. पण अशा घटना ऐकल्यावर मन सुन्न होतं. 

अनामिका बारावीत वर्गात पहिली आली. इतक्‍या लहान गावातून मुलीनं वर्गात प्रथम यावं ही गोष्ट कौतुकाचीच होती. पण इतक्‍या हुशार, सोज्वळ आणि मनाने निर्मळ मुलीच्या ऱ्हासाची खरंतर इथूनच सुरवात झाली. 

तिने एफवायला प्रवेश घेतला आणि तो नराधम तिच्या आयुष्यात आला. अजाणतेपणी, काहीही संबंध, चूक नसताना अनामिकेला अतिप्रसंगाला बळी पडावं लागलं. चूक नसताना तिला अशी शिक्षा का मिळाली?

अनामिकेची आणि त्याची ओळख कशी झाली, नाही माहीत. पण तो तिला ब्लॅकमेक करत होता. त्यानं कित्येकवेळा तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. घाबरून आणि काहीच न समजल्याने तिने कित्येक काळ त्याचा अन्याय सहन केला. मनात नसताना केवळ घरच्यांची आणि स्वतःची बदनामी होऊ नये म्हणून हा अन्याय, छळ सहन केला. कदाचित तो तिला घरच्यांना मारण्याची धमकी देत असावा किंवा अजून काहीतरी धमकी देत असावा. दरवेळी तिच्या मनात नसताना त्याच्या धमकीला घाबरून ती हे सगळं सहन करत होती. पण एक दिवस तिनं हिंमत केली आणि त्याच्या धमकीला आणि स्वतःच्या बदनामीला न घाबरता स्वतःची सुटका करून घेतली. त्याच्याबरोबर बोलणंच काय तर त्याचं तोंडसुद्धा बघणं बंद केलं. आत्महत्या करण्याचा विचार केला नाही, की त्याच्यावर सूडही उगवला नाही. खूप दूर जाऊन तिनं स्वतःच विश्‍व निर्माण केलं. घडलेल्या वाईट गोष्टींचा विचार न करता ती आयुष्यात पुढे सरकली. आयुष्यातील कित्येक काळ नरकापेक्षा भयंकर यातना भोगूनही ती खंबीर राहिली. 

ही एक अनामिका झाली. पण अशा कितीतरी अनामिका आज समाजात आहेत. ज्या अशा वृत्तीच्या बळी पडत आहेत. कितीतरी मुली या भयानक वृत्तीची शिकार बनतात. पण कुठेच तोंड उघडत नाहीत. कोवळ्या वयात अतिप्रसंग आणि तो ही वारंवार...! अनामिकाचं करिअर, तिची स्वप्नं, जीवन जगण्याची संकल्पना, तत्त्वे, सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आनंद सगळा धुळीला मिळाला. अगदी उभरत्या वयात नैराश्‍य आलं. पण तरीही ती उभी राहिली. कसलीही तक्रार न करता, कुणावरही सूड न उगवता आता ती ताठ मानेनं आयुष्य जगायला तिनं सुरवात केली. 

इथं चूक कोणाची? कोण चुकलं? कोण बरोबर? कुणी कधी, कसे आणि काय वागायला हवे? या गोष्टींची चर्चा करायची गरजच नाही. तो भूतकाळ होता तो विसरलेलाच बरा; पण अशा अजून अनामिका निर्माण होऊ नये यासाठी काय करता येईल याचा विचार नक्कीच झाला पाहिजे. ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ..’ असे फक्त नारेच द्यायचे, की अशा या घाणेरड्या वृत्तीचा नायनाट करण्यासाठी प्रत्येकानं एक पाऊल पुढं टाकायचं, याचा विचार झाला पाहिजे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com