अधिकाधिक महिलांनी राजकारणात यावे - डॉ. गोऱ्हे 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 सप्टेंबर 2017

पुणे - ""महिलांना त्यांनी केलेल्या अथक संघर्षामुळे आरक्षण मिळाले आहे. मात्र, आरक्षण हे ध्येय नसून एक साधन आहे. राजकीय क्षेत्रात अधिकाधिक महिला आल्या पाहिजेत, त्यासाठी समाजाची मानसिकता बदलण्याची गरज आहे,'' असे मत शिवसेनेच्या प्रवक्‍त्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले. 

मेहता पब्लिशिंग हाउस फाउंडेशनतर्फे टिळक रस्त्यावरील डॉ. नीतू मांडके सभागृहामध्ये आयोजित "रुचिराकार कमलाबाई ओगले' पुरस्कार वितरण सोहळ्यात त्या बोलत होत्या. महापौर मुक्ता टिळक, फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील मेहता, प्रसन्न ओगले उपस्थित होते. सुवर्णा तळेकर, भारतबाई देवकर व अर्चना जतकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच शरयू दाते, चिन्मयी गोस्वामी, ऐश्‍वर्या सावंत यांना "यंग ऍचिव्हर्स' पुरस्कार देण्यात आला. 

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, ""जागतिकीकरणाच्या काळात सर्वच क्षेत्रांमध्ये महिलांचे प्रमाण 50 टक्के पाहिजे, त्यादृष्टीने महिलांची पावले देखील पडत आहेत. मात्र, असंघटित क्षेत्रातील महिलांची संख्या अधिक आहे. यावरून महिलांच्या शोषणाची शक्‍यता वाढतच आहे. आरक्षणाचा लाभ घेऊन अधिकाधिक महिलांनी राजकारणामध्ये आले पाहिजे.'' 

टिळक म्हणाल्या, ""केवळ भारतातच नाही, तर विकसित देशांतील महिला राजकारण्यांनाही लैंगिक भेदभावाचा सामना करावा लागत आहे. आपल्या देशात महिलांचे आर्थिक सक्षमीकरण तर झालेच पाहिजे, त्याचबरोबर योग्य ते शारीरिक पोषणही होण्याची गरज आहे.''