रोजच विजेच्या तारेवरची कसरत 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017

पुणे - घराबाहेरच अधिक वेळ राहावे लागले, तरी महिलांना निर्भय आणि सुरक्षित वातावरण निर्माण करून देण्याचे कर्तव्य "महिला' पोलिसांना निभावता येत असल्याचा आनंद नवी ऊर्मी देतो. किंबहुना जगण्याचा नवा आयामही यातूनच मिळतो. इतर क्षेत्रांतील नोकरी करणाऱ्या महिला तारेवरची कसरत करतातच; पण महिला पोलिसांची ही कसरत विजेच्या तारेवरची असते, इतकाच काय तो फरक...अशा शब्दांत महिला पोलिस अधिकाऱ्यांनी कौटुंबिक आणि सामाजिक जीवनातील अंतरंग "सकाळ'च्या माध्यमातून उलगडले. 

पुणे - घराबाहेरच अधिक वेळ राहावे लागले, तरी महिलांना निर्भय आणि सुरक्षित वातावरण निर्माण करून देण्याचे कर्तव्य "महिला' पोलिसांना निभावता येत असल्याचा आनंद नवी ऊर्मी देतो. किंबहुना जगण्याचा नवा आयामही यातूनच मिळतो. इतर क्षेत्रांतील नोकरी करणाऱ्या महिला तारेवरची कसरत करतातच; पण महिला पोलिसांची ही कसरत विजेच्या तारेवरची असते, इतकाच काय तो फरक...अशा शब्दांत महिला पोलिस अधिकाऱ्यांनी कौटुंबिक आणि सामाजिक जीवनातील अंतरंग "सकाळ'च्या माध्यमातून उलगडले. 

चौकटीबाहेरचे क्षेत्र निवडून त्यात कर्तृत्व गाजविणाऱ्यांपैकी एक म्हणजे महिला पोलिस. कर्तव्य बजावत कौटुंबिक जबाबदाऱ्याही यशस्वीपणे पेलणाऱ्या महिला पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नवरात्रोत्सवाच्या पहिल्या माळेला "सकाळ' कार्यालयात निवडक अधिकाऱ्यांना प्रातिनिधिकरीत्या आमंत्रित करण्यात आले. महिला सक्षमीकरण आणि त्यासाठी काय प्रयत्न करावेत, तसेच स्त्री-पुरुष समानता कशी आणता येईल, यावर त्यांनी विचार मांडले. 

गीता दोरगे (पोलिस निरीक्षक) - ""आई-वडील फारसे शिकले नसले, तरीही मला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातले, हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. त्यांनी नेहमीच शिक्षणाला प्रोत्साहन दिले. माझ्या घरात मुलींना समानतेची वागणूक मिळत असली, तरीही समाजात फारशी चांगली स्थिती नसल्याचे वास्तव 
आहे.'' 

वैशाली चांदगुडे (पोलिस निरीक्षक) - ""महिला कोणत्याही क्षेत्रात असली, तरीही तिला तिचे कर्तृत्व सिद्ध करावे लागते. महिलांवर हे कर्तृत्व सिद्ध करण्याची वेळ येणे, हे चुकीचे आहे. शिक्षणासाठी मुलींना बाहेरगावी पाठविण्यात येत नव्हते, हे चित्र काही वर्षांपूर्वी होते. परंतु या मानसिकतेत आता बदल झाल्याचे पाहायला मिळते.'' 

क्रांती पवार (पोलिस निरीक्षक) - ""महिला सक्षमीकरण, सबलीकरण याविषयी केवळ बोलण्यापेक्षा कृती कार्यक्रम आखायला हवे आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी सर्वांनी एकत्र यावे. "सकाळ'च्या माध्यमातून एकत्र येऊन काम करण्याची आम्हाला इच्छा आहे.'' 

मनीषा झेंडे (पोलिस निरीक्षक) - ""मुलगा आणि मुलगी या दोघांना समानतेची वागणूक दिली जात नसल्याचे वास्तव आहे. स्त्री-पुरुष समानता आणण्यासाठी 
मानसिकतेत बदल होणे आवश्‍यक आहे. मलाही दोन मुलीच आहेत. मुलगा असावा, असे मला कधीच वाटले नाही.'' 
 

रेखा साळुंखे (पोलिस निरीक्षक) - ""महिलेचा संघर्ष घरातूनच सुरू होतो. गृहिणी, नोकरी करणाऱ्या महिला संसाराचा गाडा सांभाळण्यासाठी तारेवरची कसरत करत असतात. परंतु पोलिस महिलांची कसरत विजेच्या तारेवरची असते. प्रत्येक पोलिस महिला आपले कर्तव्य बजावण्याबरोबरच कुटुंबाची धुरा सक्षमपणे सांभाळते.'' 

विजयमाला पवार (सहायक पोलिस निरीक्षक) - ""ग्रामीण भागातील वातावरण काहीसे वेगळे असते. मुलींना बारावीपर्यंत शिक्षण दिले की पुष्कळ शिकविले, अशी मानसिकता असते. पदवीच्या शिक्षणासाठी त्यांना तालुक्‍याबाहेर पाठविले जात नाही. सुशिक्षित कुटुंबांमध्ये तुलनेने कमी प्रमाणात मुलगा आणि मुलगी यांच्यात फरक केला जातो.'' 
 

अश्‍विनी जगताप (सहायक पोलिस निरीक्षक) - ""आजूबाजूच्या वातावरणाचा परिणाम आपल्या मानसिकतेवर होत असतो. घरात मुलगी म्हणून मला कधीच वेगळी वागणूक दिली नाही. मुलगी म्हणून कोणतीही बंधने माझ्यावर लादली गेली नाहीत. समाजात मुलगा आणि मुलीला समानतेची वागणूक मिळावी, यासाठी स्वत-पासून प्रयत्न करायला हवेत.'' 

वर्षा शिंदे (सहायक पोलिस निरीक्षक) - ""स्त्री-पुरुष समानता रुजविण्यासाठी सर्व स्तरांतून प्रयत्न होण्याची गरज आहे. शिक्षणाची ज्ञानगंगा खेड्यापाड्यांतील मुलींपर्यंत पोचली तरच मुली सक्षम होतील.''