शालेय विद्यार्थ्यांमधील दृष्टिदोष चिंताजनक

सलील उरुणकर
गुरुवार, 31 ऑगस्ट 2017

पुणे - शहरातील शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या दृष्टिदोषाचे प्रमाण चिंताजनक असल्याचे एका सर्वेक्षणात आढळून आले आहे.

दृष्टिदोषापाठोपाठ दात, कान आणि त्वचेचे आजारही या विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून आले आहे. 

पुणे - शहरातील शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या दृष्टिदोषाचे प्रमाण चिंताजनक असल्याचे एका सर्वेक्षणात आढळून आले आहे.

दृष्टिदोषापाठोपाठ दात, कान आणि त्वचेचे आजारही या विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून आले आहे. 

‘जेनेक्‍स ईएचआर’ या स्टार्टअपने केलेल्या पाच हजार विद्यार्थ्यांच्या सर्वेक्षणात या धक्कादायक बाबी उघड झाल्या आहेत. ‘इलेक्‍ट्रॉनिक हेल्थ रेकॉर्ड’ या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या या स्टार्टअपने मोबाईल ॲप्लिकेशन विकसित केले असून, वैद्यकीय चाचण्यांचे सर्व अहवाल व माहिती ही डिजिटल स्वरूपात साठविली जाते. या माहितीच्या विश्‍लेषणातून डॉक्‍टर व रुग्णांना अनेक गोष्टींचा उलगडा होतो. या माहितीच्या आधारे कोणताही डॉक्‍टर योग्य उपचाराची दिशा ठरवू शकतो.

‘जेनेक्‍स ईएचआर’चे संस्थापक मुकुल मुस्तिकर म्हणाले, ‘‘सामान्यतः आढळणाऱ्या वैद्यकीय समस्या कोणत्या, हा प्रश्‍न जर कोणी विचारला तर त्याचे उत्तर शासकीय यंत्रणेकडे आहे, ना कोणत्या समाजसेवी संस्था किंवा डॉक्‍टरांच्या संघटनेकडे. त्याचे मुख्य कारण म्हणजे ज्या वैद्यकीय चाचण्या किंवा शिबिरे घेतली जातात त्यामध्ये प्रत्येक व्यक्तीचे झालेले निदान आणि वैद्यकीय इतिहासाची माहिती ही कागदावरच राहते. त्याचे विश्‍लेषण होत नाही. लाखो विद्यार्थ्यांचे ‘इलेक्‍ट्रॉनिक हेल्थ रेकॉर्ड’ निर्माण झाले तर या प्रश्‍नाचे उत्तर सहज मिळेल. त्या दृष्टीने ‘जेनेक्‍स ईएचआर’ काम करत आहे.’’

‘‘शाळेमध्ये कोणत्याही विद्यार्थ्याला कशाही प्रकारचा त्रास झाल्यास तातडीने डॉक्‍टरांमार्फत वैद्यकीय माहिती तपासून उपचाराची दिशा ठरविता येते. हे अनेक उदाहरणांवरून आतापर्यंत दिसून आले आहे. पाल्याला होत असलेल्या अनेक प्रकारच्या त्रासाचे निदान अशा इलेक्‍ट्रॉनिक स्वरूपातील माहितीच्या विश्‍लेषणातून झाल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे शहरातील सर्व शाळा- महाविद्यालयांतील विद्यार्थी-विद्यार्थिनींची वैद्यकीय माहिती सुरक्षित पद्धतीने इलेक्‍ट्रॉनिक स्वरूपात साठविता आली तर महापालिका, राज्य सरकार व यंत्रणेतील अन्य संबंधित अधिकाऱ्यांना आपत्कालीन परिस्थितीत योग्य निर्णय घेणे शक्‍य होईल; तसेच अनेक धोरणात्मक निर्णय घेण्यासही याची मदत होऊ शकते,’’ असा विश्‍वास मुस्तिकर यांनी व्यक्त केला.

‘इलेक्‍ट्रॉनिक हेल्थ रेकॉर्ड’चे फायदे 
ऐनवेळी महत्त्वाची कागदपत्रे, डॉक्‍टरांची चिठ्ठी शोधण्यात वेळ खर्च होत नाही 
उपचाराची दिशा ठरविण्यासाठी डॉक्‍टरांना सर्व वैद्यकीय माहिती एकाच ठिकाणी दिसते 
शहर किंवा घराबाहेर असताना आपत्कालीन परिस्थितीत कुठेही माहिती उपलब्ध होते 

२ हजार ८०१ - जून व जुलैमध्ये आरोग्यतपासणी झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या

३४९ (१२.४५ टक्के) - विशिष्ट आजार असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या