पुढची लढाई धर्म विरुद्ध संविधान - यशवंत मनोहर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 जानेवारी 2018

डॉ. मनोहर म्हणाले... 
- संविधान समोर ठेवून लेखकांनी निर्भयपणे लिहावे 
- दलित हा शब्द आपण सर्वांनी नाकारला पाहिजे 
- आपले मन हे जात, धर्म, चौकट होणार नाही, याची काळजी घ्या 
- आपण चौकटी तोडणारे आहोत, चौकटीचे पोवाडे गाऊ नका 
- माणसांची जुळवणूक ज्याला जमत नाही, तो साहित्यिक नव्हे लेखनिक असतो

पुणे  - पुढची लढाई ही धर्म विरुद्ध संविधान, अशीच होणार आहे. या युद्धात धर्माची घोषणा विजयी होते की संविधानाची, हे आपल्याला पाहायचे आहे. त्यांच्याकडे वेगवेगळी शस्त्रे असतील; पण आपल्याकडे शाहू- फुले- आंबेडकर आणि संविधान अशा दोन महाशक्ती आहेत. या बळावर धर्माच्या विरोधात लढण्यासाठी आपल्या सर्व प्रवाहांनी आता एकत्र यावे आणि नव्या क्रांतीचा कार्यक्रम आखावा, अशी हाक अखिल भारतीय सम्यक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. यशवंत मनोहर यांनी शुक्रवारी दिली. "पेशवाई' आणि त्याही आधीच्या समाजव्यवस्थेच्या वाईट अवस्थेत आपल्याला ढकलले जात आहे, असेही ते म्हणाले. 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व स्टडीज सेंटर यांच्यावतीने आयोजित सम्यक साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन ज्येष्ठ विचारवंत के. इनोक यांच्या हस्ते झाले. त्यानंतर डॉ. मनोहर यांनी भारतीय जनता पार्टी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधत एकत्र येण्याचे आवाहन केले. संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे, दीनानाथ मनोहर, स्वागताध्यक्ष डॉ. विजय खरे, आयोजक परशुराम वाडेकर उपस्थित होते. 

मनोहर म्हणाले, """आपल्या' या शब्दाची व्याख्या विस्तृत करा. मुस्लिम, ख्रिश्‍चन, शीख, भटके- विमुक्त, आदिवासी, मराठा, डावे, समाजवादी अशा सर्वांना समान मुद्द्यावर एकत्र आणा. प्रत्येक गोष्टीचा किस पाडत बसू नका. क्रांतीचा कार्यक्रम आखा. हे जर शक्‍य झाले, तर आपण अराजकाच्या तावडीत सापडणार नाही. देशाचे नवे रूप निर्माण करू शकू. संघाची ताकद वाढेल अशी आपली कुठलीही उक्ती किंवा कृती असता कामा नये. उलट आपल्यातील जे लोक त्यांच्याजवळ गेले आहेत, त्यांना परत आणा. आपल्यातील ताकद आता गोठू देऊ नका.'' दीपक म्हस्के यांनी सूत्रसंचालन केले. 

...हेच या सरकारला हवेय 
""देश कूस बदलतोय. इतका की तो आता अराजकतेच्याच उंबरठ्यावर आहे. पूर्वी अस्पृश्‍यांची सुख-दु-खे ऐकायचो; पण सध्या एकही जात सुखी नाही. बहुतांश लोक अस्पृश्‍यतेच्या पातळीवर आले आहेत आणि आरक्षणाची मागणी करत आहेत. बेकारांची संख्या प्रचंड वाढली आहे. अशांना हाताशी घेऊन संस्कृतीचा, पुरोगामित्वाचा विध्वंस केला जात आहे. जात, धर्म, भाषा यांच्या नावाने लढविले जात आहे. यातून तयार होणारी अराजकताच या सरकारला हवीय, तेच झुंडी पोसत आहेत. हा संविधानविरोधी कट आहे,'' अशी नाराजी डॉ. कसबे यांनी व्यक्त केली. 

Web Title: pune news yashwant manohar Samyak Sahitya Sammelan