नाट्यगृहांची किळसवाणी अस्वच्छता कायमच ! (व्हिडिओ)

स्वप्निल जोगी
मंगळवार, 18 जुलै 2017

"यशवंतराव' नंतर आता नेहरू सांस्कृतिक भवनचे "अस्वच्छ' वास्तव आले पुढे

"यशवंतराव' नंतर आता नेहरू सांस्कृतिक भवनचे "अस्वच्छ' वास्तव आले पुढे

पुणे : "स्वच्छ'तेच्या घोषणा कितीही दिल्या तरी प्रत्यक्षात दिसून येणारं वास्तव किती किळसवाणं असू शकतं याची प्रचिती पुणेकरांनी नुकतीच अभिनेत्री मुक्ता बर्वेच्या निमित्ताने घेतली. कोथरूडमधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहातील स्वच्छतागृहांमधील अस्वच्छता दाखवणारी काही छायाचित्रे मुक्ताने आपल्या फेसबूक पेजवर शेअर केली होती. त्यानंतर महापालिकेकडून त्याची तातडीने दखल घेतली जाऊन तेथे स्वच्छताही करण्यात आली होती. मात्र, ही "गतिमान कारवाई' तेवढ्यापुरतीच होती की काय असे दिसून येणारी किळसवाणी अस्वच्छता आता पालिकेच्या अजून एका नाट्यगृहात पाहायला मिळाली आहे.

घोले रस्त्यावरील जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवनमधील स्वच्छतागृहांमध्ये मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता "सकाळ'ने केलेल्या पाहणीत मंगळवारी दिसून आली. एवढेच नव्हे तर, पिण्याच्या पाण्याच्या कूलरशेजारीही तंबाखू आणि पानाचा तोबरा थुंकून ठेवल्याचे दिसून आले. या सगळ्यामुळे आरोग्याचा प्रश्‍न निर्माण होण्याची शक्‍यता वाढली आहे.

मुक्ता बर्वे यांच्यासारख्या सेलेब्रिटी व्यक्तीच्या तक्रारीनंतर लगोलग आपली "कार्यक्षमता' दाखवणारे पालिका प्रशासन आता काय करते, याकडे पुणेकरांचे लक्ष लागून राहिले आहे. अन्यथा मुक्ता प्रमाणेच पुणेकरांनाही आता "याला गलथानपणा म्हणायचा की बेजबाबदारपणा' असा रोखठोक सवाल प्रशासनाला पुनःश्‍च विचारावा लागणार आहे !

ही अस्वच्छता दिसली नाही का ?
सांस्कृतिक भवनमधील पहिल्या मजल्यावर असणाऱ्या सभागृहाशेजारीच एक स्वच्छतागृह आहे. या ठिकाणी आत प्रवेश केल्यावरच प्रचंड दुर्गंधी आपल्या "स्वागता'स हजर असल्याचे जाणवते. त्यानंतर पुढ्यात दिसतात ती घाणीने तुंबलेली भांडी (टॉयलेट पॉट), पान, सुपारी आणि तंबाखू थुंकून घाणेरडे केलेले कोपरे, गळल्याने जमिनीवर पसरलेले दुर्गंधीयुक्त पाणी आणि तुटलेले पाईप !... यशवंतराव चव्हाण नाट्यगृहातील स्वच्छतागृहांची तातडीने सफाई केल्यानंतर "अशी दुर्गंधी पुन्हा दिसणार नाही', असे पालिका प्रशासनाने जाहीर केले होते. मग प्रशासनास नेहरू सांस्कृतिक भवनमधील अस्वच्छता दिसली नाही का, असा प्रश्‍न काही स्थानिक नागरिकांनी महापौर मुक्ता टिळक व स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांना विचारला आहे.

"यशवंतराव'मध्ये बेसिन अस्वच्छ !
तातडीच्या कारवाईनंतर यशवंतराव चव्हाण नाट्यगृहातील स्वच्छतागृहे बऱ्यापैकी स्वच्छ केली गेल्याचे "सकाळ'ला पाहणीत आढळून आले. मात्र, एका स्वच्छतागृहातील बेसिनमध्ये पानाचा तोबरा थुंकून घाण केली गेल्याचे दिसून आले.

ई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा :