‘यिन’च्या पाठीशी राहणार

‘यिन’च्या पाठीशी राहणार

‘समर यूथ समिट’च्या समारोपप्रसंगी मोहोळ यांची ग्वाही

पुणे - ‘‘आमच्यावेळी ‘यिन’ असतं, तर आम्हीही सभाधीटपणा दाखवला असता. आम्हालाही त्याचवेळी समाजभान आले असते. आमचाही आत्मविश्वास ‘यिन’च्या विद्यार्थ्यांसारखाच दुणावला असता. उद्याचा सक्षम अन बलवान भारत घडविण्याचे काम आपल्या हातात घेऊ पाहणाऱ्या मुलांना घडविण्याचे ‘सकाळ’ करत असलेले काम खरंच मोठे आहे. ‘यिन’च्या चांगल्या उपक्रमांच्या पाठीशी आम्ही नेहमीच उभे राहू,’’ अशा शब्दांत महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी विद्यार्थ्यांची पाठ थोपटली.

‘सकाळ’च्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कच्या (यिन) समर यूथ समिट २०१७ च्या समारोपाच्या प्रसंगी मोहोळ बोलत होते. या वेळी ‘सकाळ’चे संपादक मल्हार अरणकल्ले, खादी व ग्रामोद्योग मंडळाचे संचालक विशाल चोरडिया, सूर्यदत्ता इन्स्टिट्यूटच्या उपाध्यक्ष सुषमा चोरडिया, यिनचे प्रमुख तेजस गुजराथी आदी उपस्थित होते.

या वेळी अरणकल्ले म्हणाले, ‘‘तरुणांना यशाची तहान असली पाहिजे. तुमची परिस्थिती, 

जन्माचे ठिकाण अशा कुठच्याच गोष्टीवर खरंतर यश अवलंबून नसते. यश आणि अपयश यात अंतर अगदीच थोडे असते. पण जो अपयशी झालाय, त्याने ते अंतर शोधायचे असते. ते पार करत यशस्वी व्हायचे असते. पराभव झाला म्हणजे आयुष्य संपले असे नाही. नशीब वगैरे काही नसते. सारे काही अवलंबून असते, ते तुमच्या प्रयत्नांवर.’’

चोरडिया म्हणाले, ‘‘भारत हा युवा स्पंदनांचा, अर्थात तुमचा देश आहे ! तुमच्यात आज खूप मोठी धमक आहे. आता पूर्वीसारख्या भौगोलिक परिसीमा राहिलेल्या नाहीत. या नव्या संधींचा उपयोग करून घ्या. फक्त आपल्या विचारांना कृतीत बदला, तुम्ही शब्दशः जगावर राज्य कराल.’’

आपण आता आपल्या देशाचा विचार मर्यादित न ठेवता जागतिक विचार ठेवायला हवा. महाराष्ट्राचा प्रत्येकच नागरिक मोठा व्यावसायिक नक्कीच होऊ शकतो. आपल्याकडे आज ‘नॉलेज’ आहेच, आता गरज आहे ती योग्य ‘ॲक्‍शन’ आणि ‘डायरेक्‍शन’ची!
- विशाल चोरडिया

गेले तीन दिवस या समिटच्या निमित्ताने एक वेगळ्याच जगात वावरलेल्या सर्वच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यांवर आणि देहबोलीत समारोपाच्या दिवशी उत्साह जाणवून येत होता. अनेक दिग्गजांच्या टिप्स, त्यांचे अनुभव ऐकल्यानंतरचा आत्मविश्वास त्यांच्यात भरल्याचे दिसत होते. ‘आम्हीही बदल घडवू शकतो’, ही खात्री घेऊन हे सारे आपापल्या ठिकाणी परतले. पण परत जाताना एका नव्या दृष्टीचे संचित सोबतीला घेऊनच...

स्वतःची बलस्थानं ओळखा : मापूस्कर

समारोपाच्या दिवशी एका सत्रात विद्यार्थ्यांचा सेलिब्रिटींशी देखील संवाद घडवून आणण्यात आला. या वेळी गायक आनंद भाटे आणि दिग्दर्शक राजेश मापूस्कर यांनी चित्रपटसृष्टीतील आपला प्रवास उलगडून सांगितला.
मापूस्कर म्हणाले, ‘‘सिनेमाक्षेत्र हे खूप व्यापक क्षेत्र आहे. यात संधी मात्र अतिशय मोजक्‍या आहेत. प्रत्येकजण काही एका रात्रीत स्टार होत नसतो. स्वतःची बलस्थानं ओळखा. न्यूनगंड अनेकांना असतो, पण त्यावर आपण काम करायला हवे. दिशा सापडली की आत्मविश्वास येतोच.’’

यानंतर आपले गाजलेले ‘चिन्मया सकल हृदया’ हे गाणे गाऊन भाटे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधायला सुरवात केली. ते म्हणाले,  ‘‘आपण ठरवले तर, आपली पॅशन आणि आपलं करिअर हे दोन्ही जपता येऊ शकतात. फक्त ते करण्याचे कौशल्य मात्र आत्मसात करणे महत्त्वाचे आहे. एक लक्षात ठेवा- आपण पॅशन जपताना शिक्षण कधीही सोडू नये. शिक्षणातूनच एक प्रगल्भ व्यक्तिमत्त्व घडत असते.’’ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com