हेल्मेट वापराबाबत पुणेकर उदासीन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 मे 2017

पुणे - वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यास होणारा दंड व शिक्षेच्या प्रमाणात वाढ करणाऱ्या मोटार वाहन कायदाला लोकसभेमध्ये नुकतीच मंजूर मिळाली. मात्र, "हेल्मेट' वापराबाबत पुणेकर नागरिक उदासीन असल्याचे एका खासगी संस्थेच्या सर्वेक्षणात आढळले आहे.

पुणे - वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यास होणारा दंड व शिक्षेच्या प्रमाणात वाढ करणाऱ्या मोटार वाहन कायदाला लोकसभेमध्ये नुकतीच मंजूर मिळाली. मात्र, "हेल्मेट' वापराबाबत पुणेकर नागरिक उदासीन असल्याचे एका खासगी संस्थेच्या सर्वेक्षणात आढळले आहे.

परिसर या स्वयंसेवी संस्थेने शहरातील 10 प्रमुख चौकांमध्ये केलेल्या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे, की फक्त 16 टक्के दुचाकीचालक हेल्मेटचा वापर करतात, तर दुचाकीवर मागे बसणाऱ्या (पिलियन रायडर) व्यक्तीने हेल्मेट घालण्याचे प्रमाण फक्त दोन टक्के एवढेच आहे. संस्थेतर्फे 769 दुचाकींचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यासाठी चौका-चौकांमध्ये छायाचित्रेही काढण्यात आली. आणखी एक धक्कादायक बाब या सर्वेक्षणात दिसली ती म्हणजे पुरुषांच्या तुलनेत हेल्मेट घालण्याचे प्रमाण महिलांमध्ये अत्यल्प आहे. फक्त आठ टक्के महिला आणि 18 टक्के पुरुषांनी हेल्मेट घातल्याचे सर्वेक्षणात आढळले आहे. याव्यतिरिक्त 110 जणांच्या मुलाखती घेण्यात आल्या. हेल्मेटचे वजन, ते घातल्यामुळे होणारा त्रास, छोट्या अंतरावर आणि कमी वेगाने जात असल्यास अपघात होऊच शकत नाही, अशी अनेक कारणे वाहनचालकांनी सांगितली. "हेल्मेट घातल्यामुळे खूप उकडते आणि अस्वस्थता निर्माण होते,' असे कारण सर्वाधिक वाहनचालकांनी दिले आहे.

दुचाकीवर मागे बसणाऱ्या व्यक्तीने हेल्मेट घालण्याची गरज आहे, असे 70 टक्के लोकांना वाटत नाही. पण, 65 टक्के दुचाकीचालकांना मात्र शहरातील रस्त्यांवरून गाडी चालवणे धोकादायक असल्याचे वाटते, असेही या सर्वेक्षणातून दिसले आहे.

"परिसर'चे प्रोग्रॅम डिरेक्‍टर रणजित गाडगीळ म्हणाले, ""फक्त जनजागृती करून फरक पडणार नाही. पोलिसांकडून हेल्मेटसक्तीच्या नियमांची कठोर अंमलबजावणी झाली तरच वाहनचालक नियमांचे पालन करतील.'