कलमाडी लाओ, काँग्रेस बचाओ!

उमेश घोंगडे
गुरुवार, 9 फेब्रुवारी 2017

पुणे : महापालिका निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू असताना काँग्रेसमधील असंतोष उफाळून लागला आहे. या असंतोषाला वाट करून देणारी पत्रके शहराच्या विविध भागात आज सकाळी झळकली आहेत.

निवडणुकीत उमेदवारी देताना बिल्डरांना तिकिटे विकण्यात आल्याचा आरोप करीत काँग्रेस वाचविण्यासाठी माजी खासदार सुरेश कलमाडी यांना पक्षात आणण्याचे आवाहन या पत्रकाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. 

उमेदवारी देताना विशिष्ट जात व बिल्डरांना जवळ करण्यात आल्याचा आरोपही करण्यात येत आहे. 'बिल्डरांना काँग्रेस पक्ष विकणाऱ्या व जातीपातीचे राजकारण करणाऱ्यांना काँग्रेस नेत्यांना हटवा' तसेच 'कलमाडी लाओ, देश बचाओ, असे या पत्रकावर लिहिण्यात आले आहे. शहरात अनेक ठिकाणी ही पत्रके लावण्यात आली आहेत.

रवींद्र धंगेकर यांना पक्षाची उमेदवारी देताना घालण्यात आलेल्या घोळाबाबत पक्षात जोरात चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे पक्षाकडे इतके अनुभवी लोक असताना अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत पक्षाच्या तब्बल आठ अधिकृत उमेदवारांचे अर्ज बाद झाले या बद्दल चीड व्यक्त करण्यात येत आहे.

प्रत्येक जागा महत्त्वपूर्ण असताना केवळ योग्य मार्गदर्शनाअभावी आठ उमेदवारांचे अर्ज बाद झाले. यातील बहुसंख्य ठिकाणी काँग्रेसची स्थिती मजबूत आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी उमेदवार निवडून येऊ शकत होता तो अर्ज भरताना संबंधित उमेदवार तसेच पक्षानेदेखील अधिक काळजी घेण्याची गरज होती, असे पक्षातील एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले. 

विधानपरिषदेतील एका आमदारांनी आपल्या दोन कार्यकर्त्यांसाठी मोठ्या प्रयत्नाने दोन तिकिटे मिळविली. मात्र अर्ज भरताना या दोन्ही उमेदवारांचे अर्ज बाद झाले. विशेष म्हणजे यातील एका उमेदवाराचा अर्ज केवळ अनामत रक्कम भरण्यासाठी पैसे नव्हते या कारणासाठी बाद झाल्याचे सूत्रांनी सांगितले.