शिस्तीत 'बेशिस्त' चालते पुण्याची वाहतूक!

pune traffic
pune traffic

गेल्या पंधरवड्यात दसरा झाला. सणासुदीसाठी म्हणून एकाच दिवशी पुणे शहरात किमान साडे आठ हजार हजार लोकांनी नवीन वाहन घेतले. पुण्यातल्या रस्त्यांचा आधीच कोंडलेला श्वास नव्या वाहनांच्या गर्दीनं आणखी दबला गेला. येत्या आठवड्यात दिवाळी. म्हणजे आणखी वाहन खरेदी होणार. आधीच बेशिस्तीनं कुप्रसिद्ध झालेली पुण्याची वाहतूक व्यवस्था आणखी कोलमडण्याच्या दिशेने जाणार. सोशल नेटवर्किंग साईटवर पुण्याच्या वाहतुकीचे नवे नवे किस्से येणार आणि ते फॉरवर्डही होणार. परंतु, वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी किती जण प्रयत्न करतात, यावर कोणीच काही बोलणार नाही.

पुण्यातील रस्ते लहान अन् वाहनांची संख्या मोठी. अशा विचित्र प्रमाणामुळे वाहतूक व्यवस्थेचे तीन तेरा वाजतात. सकाळी प्रत्येकाला ऑफिस गाठायची तर विद्यार्थ्यांना शाळेत जायची घाई. संध्याकाळीही यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही. विशिष्ट वेळांमध्ये गर्दी वाढत असल्याने प्रत्येकजण जागा मिळेल तिथून आपले वाहन बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो अन् हळूहळू वाहतूक कोंडीत भर पडत जाते. प्रवासादरम्यान दुचाकीचालक रिक्षांना, रिक्षाचालक बसचालकांना अन् बसचालक दुचाकीचालकांना दोषी ठरविण्याचा प्रयत्न करतात. रस्तोरस्ती वाहन चालकांमध्ये भांडणे सुरू असतात. गेल्या पंधरा दिवसांमध्ये विविध ठिकाणी पीएमपी बसचालकांना बेदम मारहाण झाल्याच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत, यामध्ये नेमके दोषी कोण? हे पोलिस तपासात उघड होईलही. पण, वाहतूक व्यवस्था सुधारायला हवी आणि त्यासाठी पुढाकारही आपणच घ्यायला हवा.

नुकताच पुण्यातील पीएमपी बसचालकाला भेटलो. त्यांना नेमकं काय वाटतं वाहतुकीबद्दल याविषयावर गप्पा मारल्या. त्यांच्या लेखी अन्य वाहनचालक दोषी असतात. 'पुण्यातील रस्त्यांवरून बस चालवताना डोके शांत ठेवून पीएमपी बसचालकाची भूमिका पार पाडावी लागते. चूक नसतानाही अनेकजण थेट शिवीगाळ सुरू करून मारहाण करतात. प्रत्येक वेळेस भांडण करत बसले तर काम कधी करणार म्हणून शिवी ऐकायची अन् पुढे जायचे. परंतु, कधी-कधी असह्य होते. दुचाकी अथवा चारचाकीमधील दोघा-चौघांमुळे बसमधील किमान पन्नास प्रवाशांचा वेळ कशाला घालवयचा म्हणून दुर्लक्ष करतो. दुर्लक्ष नाही केले तर काम करणे अन् शांतपणे वाहन चालवणे अवघड होईल. नळस्टॉपजवळ एका दुकाची चालकाने केबीनमध्ये घुसून सर्वांसमोर अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून मारहाण केली. मी, हात न उचलता गुपचूप सहन केले अन् असह्य झाल्यामुळे पोलिसांकडे जाऊन तक्रार केली. दुचाकी चालकाची तक्रार केली नसती तर अपराध नसतानाही अपराधी पणाची भावना मनामध्ये राहिली असती,' असे एका बसचालकाने सांगितले.

सार्वजनिक वाहतुकीदरम्यान काही पीएमपी बसचालकही बेदरकारपणाने बस चालवतात. परंतु, सर्वच बसचालकांना एकाच तराजूमध्ये तोलता येणार नाहीत. दहा दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱया बसचालकाला बस चालवताना हृदयविकाराचा धक्का बसला. बसचालकाने बस बाजूला घेऊन उभी केली अन् प्राण सोडला. प्रामाणिक बस चालकांच्या जशा बातम्या वाचयला मिळतात तशा बेदरकार वाहनचालकांच्याही. पण, प्रत्येकाने समाजून घेण्याचा प्रयत्न केला तर वाहतूकीत नक्कीच बदल होईल अन् पुणेकरांचे चांगले उदाहरण म्हणून काही दिवसांत सोशल नेटवर्किंगवरून पहायला मिळेल.

सार्वजनिक वाहतूकीचा प्रश्न सोडविताना पोलिसांनाही कसरत करावी लागते. काही पोलिस चौकाचौकांमध्ये वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करताना दिसतात तर काहीजण सिग्नलच्या पुढे नियम तोडणाऱयांना अडविताना. वरिष्ठांनी प्रत्येकावर वेगवेगळी जबाबदारी सोपविली असावी, असे आपण समजू या. परंतु, भर उन्हात, पावसांत, थंडीत उभे राहणाऱया पोलिसांना नियमांचे पालन करून मदत करणे हे आपल्य कर्तव्यच आहे. बुलेटवरून मोठा आवाज काढून इतरांना त्रास देणारेही महाभाग पहायला मिळतात तर दुसरीकडे रुग्णवाहिकेला जागा करून देणारे वाहन चालकही पहायला मिळतात.

सगळ्यात धोकादायक प्रकार म्हणजे मोबाईल फोनवर बोलत वाहन चालवणे. पुण्यात पाच किलोमीटरच्या प्रवासात किमान पाच ते दहा वाहनचालक मोबाईल फोनवर बोलत गाडी चालवताना सहज दिसतात. या वाहन चालकांचा धोका साऱयांनाच असतो. तुम्ही नियम पाळणारे असाल, तरी मोबाईलवर बोलत कोणी तुमच्यावर येऊन आदळू शकते.

प्रश्न अनंत आहेत. मात्र, उत्तरं शोधलीच पाहिजेत. पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी नागरिक म्हणून आपण काय प्रयत्न करायला हवेत, ज्याचा फक्त आपल्यालाच नव्हे, तर साऱया शहराला फायदा होऊ शकेल? आपल्याला आलेले अनुभव काय आहेत...आमच्यापर्यंत पोहोचवा...अन्य शहरांतील, परदेशातील वाहतुकीचे अनुभवही आपण शेअर करू शकता.

प्रतिक्रिया सविस्तर असेल, तर webeditor@esakal.com वर ई-मेल करा. Subject मध्ये लिहा ‘Pune Traffic‘.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com