पुणे विद्यापीठात वाहणार अधिसभा निवडणुकीचे वारे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात आता लवकरच निवडणुकीचे वारे वाहू लागणार आहेत. निमित्त आहे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीचे.
Savitribai Phule Pune University
Savitribai Phule Pune UniversitySakal
Summary

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात आता लवकरच निवडणुकीचे वारे वाहू लागणार आहेत. निमित्त आहे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीचे.

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात आता लवकरच निवडणुकीचे वारे वाहू लागणार आहेत. निमित्त आहे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीचे. विद्यापीठाच्या अधिसभेचा कार्यकाळ संपत असल्याने विद्यापीठ प्रशासनाने अधिसभा सदस्य निवडणूक आणि त्यासंदर्भातील प्रक्रिया सुरू करण्याची घोषणा केली आहे.

विद्यापीठाच्या अधिसभेचा कार्यकाळ संपुष्टात येत असल्याने सर्व संबंधितांना विद्यापीठ कायद्यानुसार विद्यापीठाचे दहा नोंदणीकृत पदवीधर अधिसभेवर निवडून द्यायचे आहेत. त्यासाठी विद्यापीठाच्या पदवीधारकांकडून नोंदणीकृत पदवीधर म्हणून नाव नोंदणीसाठी तसेच मतदार यादी तयार करण्यासाठी विद्यापीठाच्या ‘election.unipune.ac.in’ या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने बुधवारपासून (ता.१५) अर्ज मागविण्यात येत आहेत. हे अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ४ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे. विद्यापीठाने पदवीधरांच्या नोंदवहीत नोंद करणे आणि नोंदणीकृत पदवीधरांच्या मतदार यादीत नाव समाविष्ट करणे, ही प्रक्रिया सुरू केली आहे.

नोंदणीकृत पदवीधर होण्यास विद्यापीठाचे पदवीधर, तसेच विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात वास्तव्यास असलेल्या, पुणे विद्यापीठाची स्थापना होण्यापूर्वी मुंबई विद्यापीठाचे पदवीधर असलेल्या व्यक्ती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात नोंदणीकृत पदवीधर म्हणून नाव नोंदविण्यास पात्र असणार आहेत. विद्यापीठाने दिलेल्या सूचनेनुसार नोंदणीकृत पदवीधर म्हणून नाव नोंदविण्यासाठी अर्ज केलेल्या व्यक्तीचे नाव अर्जातील विनंतीनुसार मतदार यादीत समाविष्ट केले जाईल, असेही विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.

नव्याने नोंदणीकृत पदवीधर म्हणून नोंदणी करू इच्छिणाऱ्या अथवा यापूर्वी नोंदणीकृत पदवीधर असलेल्या व मतदार यादीत नाव समाविष्ट करू इच्छिणाऱ्या व्यक्तींनी विद्यापीठाने दिलेल्या सूचनेनुसार ऑनलाइन अर्ज करावा. नोंदणीकृत पदवीधर मतदार संघाच्या मतदार यादीमध्ये नोंद होण्यासाठी दिलेल्या ऑनलाइन पद्धतीव्यतीरिक्त इतर आलेले अर्ज, अपूर्ण अर्ज तसेच आवश्यक ती कागदपत्रे न जोडलेले अर्ज नाकारले जातील, असेही विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले आहे. विद्यापीठाच्या अधिसभेत नोंदणीकृत पदवीधरांच्या निवडणूक कार्यक्रम, सूचना, मतदार याद्या, प्रकटन आदीबाबत फक्त विद्यापीठाच्या ‘election.unipune.ac.in’ या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येतील, अशी माहिती विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी परिपत्रकाद्वारे दिली आहे.ऑनलाइन अर्ज भरताना पदवीधरांनी प्रथम अर्ज भरण्यासंबंधीच्या सर्व सूचना व्यवस्थित वाचाव्यात, असे आवाहनही विद्यापीठ प्रशासनाने परिपत्रकाद्वारे केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com