विद्यापीठात रंगले अपहरणनाट्य 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 मार्च 2017

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून नऊ वर्षांच्या मुलाला गुरुवारी कुणीतरी पोत्यात घालून नेल्याची चर्चा सुरू झाली. वातावरण सुन्न झाले. पण काही वेळातच तो मुलगा सापडला. तो विद्यापीठाबाहेर खडकीच्या दिशेने एकटाच चालत गेल्याचेही स्पष्ट झाले; पण तो एकटाच का बाहेर गेला, याबद्दल तो स्वतः किंवा त्याचे पालकदेखील काही सांगत नाहीत. 

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून नऊ वर्षांच्या मुलाला गुरुवारी कुणीतरी पोत्यात घालून नेल्याची चर्चा सुरू झाली. वातावरण सुन्न झाले. पण काही वेळातच तो मुलगा सापडला. तो विद्यापीठाबाहेर खडकीच्या दिशेने एकटाच चालत गेल्याचेही स्पष्ट झाले; पण तो एकटाच का बाहेर गेला, याबद्दल तो स्वतः किंवा त्याचे पालकदेखील काही सांगत नाहीत. 

विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील शिपाई सूर्यकांत तुपकर सेवक वसाहतीत राहातात. त्यांचा पाचवीत शिकणारा मुलगा वरद हा काल रात्री साडेआठच्या सुमारास गायब झाला. पालकांचे धाबे दणाणले, त्यांनी आरडाओरड सुरू केली. विद्यापीठातही घबराट निर्माण झाली. मुलाची शोधाशोध सुरू झाली. दरम्यान, त्याचे पालक चतुःशृंगी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले. त्याचवेळी त्यांना एका व्यक्तीचा फोन आला. वरद हा प्रादेशिक परिवहन कार्यालयाजवळ असल्याचे त्या व्यक्तीने सांगितले. 

ही माहिती मिळताच पोलिसांनी धावाधाव केली आणि वरदला ताब्यात घेऊन रात्री अकराच्या सुमारास पालकांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी चौकशी केली असता त्याने काहीही माहिती सांगितली नाही. सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर वरद खडकी प्रवेशद्वारातून एकटाच बाहेर गेल्याचे दिसून आले. त्याचे पालकही "आता त्याला काही विचारू नका,' असे म्हणू लागले आहेत. त्यामुळे पोलिस हतबल झाले असून, रात्रीच्या वेळी तो एकटा विद्यापीठाबाहेर का गेला, याचे कारण समजू शकलेले नाही. 

पोलिसांच्या म्हणण्यानुसार वरद याचे अपहरण झालेले नाही. घरातून कोणीतरी रागावल्याचा राग मनात धरून हा मुलगा निघून गेला असावा. 

याबाबत विद्यापीठाच्या सुरक्षा विभागाचे अधिकारी एम. एस. केदारी यांना म्हणाले, ""सीसीटीव्ही कॅमेऱ्यात या मुलाची हालचाल चित्रित झाली आहे. खडकी गेटच्या दिशेने तो एकटाच गेल्याचे दिसत आहे. त्यामुळे त्याचे खरेच अपहरण झाले का, याबाबत साशंकता आहे.'' 

वरदला हटकले का नाही? 
खडकीकडील प्रवेशद्वाराकडे वरद हा एकटाच गेल्याचे दिसत असले, तरी तिथे सुरक्षारक्षक असताना रात्रीच्या वेळी तो या गेटमधून एकटाच बाहेर कसा गेला, सुरक्षारक्षकांनी त्याला हटकले का नाही, असे प्रश्‍न विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनी उपस्थित केले आहेत. सुरक्षारक्षक सावध नसतील, तर त्यांची संख्या कितीही वाढवली, तरी विपरीत प्रकार घडत राहतील, अशी संतप्त भावनादेखील कर्मचारी व्यक्त करीत आहेत.