पुणे विद्यापीठ घडविणार उद्योजक 

संतोष शाळिग्राम - सकाळ वृत्तसेवा 
मंगळवार, 7 मार्च 2017

विद्यापीठाकडून मदत 
- नवउद्योजकांना दीड वर्षापर्यंत जागा देणार. 
- इंटरनेट आणि विजेची मोफत सुविधा मिळणार. 
- साधनांसाठी एक लाख रुपयांपर्यंत अर्थसाह्य. 
- कंपनीची नोंदणी करून देणार. त्याचा खर्च देणार. 
- व्यवसायाचा आराखडा करण्यासाठी पाच हजार रुपये. 

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पदव्युत्तर पदवी शिक्षण घेणाऱ्या पाच विद्यार्थ्यांचे उद्योजक होण्याचे स्वप्न विद्यापीठ पूर्ण करणार आहे. त्यांना कंपनी स्थापन करून देण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, दीड वर्षापर्यंत जागा आणि प्राथमिक खर्चही विद्यापीठ देणार आहे. 

विद्यापीठातील संशोधन वाढावे व विद्यार्थ्यांमधील उद्योजकतेचा विकास व्हावा, यासाठी कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी गेल्या वर्षी अर्थसंकल्पात तरतूद केली. त्यानंतर विद्यापीठात "स्टार्टअप सेल' आणि "सेंटर फॉर इनोव्हेशन, इन्क्‍युबेशन अँड आंत्रप्रेन्युअरशिप' या केंद्राची स्थापना झाली. विद्यार्थ्यांकडे व्यवसाय किंवा उद्योग यांच्या असंख्य कल्पना असतात. त्याची स्पर्धा या केंद्रामार्फत घेण्यात आली. त्यात 187 विद्यार्थ्यांनी भाग घेतला. विद्यापीठात 11 डिसेंबर ते पंधरा जानेवारी या दरम्यान ही स्पर्धा झाली. 

एकूण 187 पैकी 17 विद्यार्थ्यांनी मांडलेल्या कल्पनांचा विचार करण्यात आला. त्यांची व्यवहार्यता तपासण्यासाठी बारा उद्योगांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अन्य तज्ज्ञांना बोलावण्यात आले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. त्यांच्या कल्पनांविषयी चर्चा केली. नंतर त्यांना व्यावसायिक आराखडा तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यानुसार, विद्यार्थ्यांनी व्यवसायाचा विस्तार, व्याप्ती यांसह व्यवसायाची गरज यांचे अहवाल सादर केले. त्यातून उद्योगांच्या अधिकाऱ्यांनी पाच जणांची निवड केली. उद्योजकता विकासासाठी काम करणाऱ्या "टाय' या आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्थेचीही विद्यापीठाने मदत घेतली. 

विद्यापीठाकडून मदत 
- नवउद्योजकांना दीड वर्षापर्यंत जागा देणार. 
- इंटरनेट आणि विजेची मोफत सुविधा मिळणार. 
- साधनांसाठी एक लाख रुपयांपर्यंत अर्थसाह्य. 
- कंपनीची नोंदणी करून देणार. त्याचा खर्च देणार. 
- व्यवसायाचा आराखडा करण्यासाठी पाच हजार रुपये. 

नवउद्योजक आणि कल्पना 
- आदिती देवढे (व्यवस्थापन विद्याशाखा) : माय स्टडी टेबल - विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययनासाठी जागा उपलब्ध व्हावी, त्यासाठी ऑनलाइन सुविधा. 
- सौरभ जोशी (व्यवस्थापन विद्याशाखा) : सॉलिड स्पेस - "थ्रीडी प्रिटिंग'साठी आवश्‍यक साहित्य निर्मितीची कंपनी. 
- शिल्पा नाकतोडे (ऊर्जा विद्याशाखा) : डॉक्‍टर बॅटरी - वापरलेल्या मोठ्या बॅटरी सेलचा पुनर्वापर करण्याचा प्रकल्प 
- वीरेंद्र देवरे (व्यवस्थापन विद्याशाखा) : ट्रान्झिट - मालवाहतुकीसाठी वाहने उपलब्ध करून देणारी कंपनी. 
- गीतांजली भापकर (ललित कला) : कलांगण - मानस आणि अन्य काही विकारांवर नृत्यांद्वारे उपचार पद्धती. 

उद्योजक घडविण्यासाठी विद्यापीठात ही प्रक्रिया सुरूच राहील. ज्या विद्यार्थ्यांच्या प्रकल्प अहवालाची निवड झाली, त्यांना कंपनी स्थापन करून देण्याची प्रक्रिया सुरू विद्यापीठाने केली आहे. ज्या प्रकल्पांची निवड झाली नाही, त्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी मार्गदर्शन मिळवून दिले जाणार आहे. 
- डॉ. प्रफुल्ल पवार (समन्वयक, सेंटर फॉर इनोव्हेशन, इन्क्‍युबेशन अँड आंत्रप्रेन्युअरशिप) 

Web Title: Pune University in influencing entrepreneurs