पुण्याच्या पावसाचा इंदापूरला आधार...

indapur
indapur

कळस (पुणे) : पावसाकडे डोळे लावून बसलेल्या इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना पुण्यात पडणाऱ्या पावसाने मोठा आधार दिला आहे. पावसामुळे पुण्यालगतच्या धरण साखळीतील धरणांमध्ये पाणीसाठा झपाट्याने वाढत असल्याने, या धरणांतून भिमा नदी पात्रात सोडण्यात आलेला विसर्ग व खडकवासला कालव्याच्या आवर्तनामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. यामुळे पुण्यातील पावसाचे उपलब्ध झालेले हे पाणी शेतीसिंचनासाठी उपयोगात आणण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. 

तालुक्यातील उजनी धरणाच्या फुगवट्यालगतच्या भिगवण ते हिंगणगाव या पट्ट्यातील कुंभारगाव, डाळज क्रमांक 1,2,3, काळेवाडी क्र. 1, 2, पळसदेव, भावडी, चांडगाव, अगोती, कांदलगाव, वरकुटे, हिंगणगाव येथील हजारो हेक्टर क्षेत्राला या पाण्याचा मोठा उपयोग होणार आहे. याचबरोबर खडकवासला कालव्यालगतच्या शेटफळगढे ते तरंगवाडीपर्यंतच्या पट्ट्यातील शेतकऱ्यांनाही हे पाणी उपलब्ध झाले आहे. यामुळे तालुक्याला जोरदार पावसाने हुलकावणी दिली असली तरी, सध्या शेतीसिंचनाचा प्रश्न या पाण्यामुळे काहीअंशी सुटला आहे.  

गेल्या काही दिवसांपूर्वी उणे पातळीत गेलेल्या उजनी धरणांतील पाणी साठ्यात यामुळे झपाट्याने वाढ होवू लागली आहे. यामुळे पाईपची संख्या वाढवून उपलब्ध पाण्याच्या ठिकाणी विद्युत पंप बसविलेल्या शेतकऱ्यांची आता धांदल उडाली आहे. कोणत्याही क्षणी पाण्याची पातळी वाढल्यानंतर विद्युत पंप बुडतील या भितीने ते हलवून सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचे काम शेतकऱ्यांमधून होत आहे. खडकवासला कालव्याचे आवर्तन सध्या सुरू आहे. या आवर्तनातून तालुक्यातील मदनवाडी, पोंधवडी, भादलवाडी, कळस, पळसदेव, गागरगाव, तरंगवाडी यांसारखे महत्वाचे व इतरही छोटे-मोठे तलाव, बंधारे भरुन घेतल्यास तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे. शिवाय निरा डाव्या कालव्याचेही आवर्तन सुरू आहे. यामुळे या कालव्यालगतच्या शेतकऱ्यांनाही या पाण्याचा आधार मिळाला आहे. अनेक शेतकरी उजनी, खडकवासला व निरा डावा कालव्यातून मिळालेल्या पाण्यातून शेततळी भरण्यास प्राधान्य देत असल्याचे चित्र आहे. उन्हाळ्यातील पाण्याची गरज भागविण्यासाठी शेततळे हे त्यांच्यासाठी वाॅटर बॅंक असल्याने ते आताच भरणे गरजेचे असल्याचे काहीं शेतकऱ्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com