एक दिवस प्रेक्षणीय स्थळांसाठी...

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 नोव्हेंबर 2016

पुणे - "सुटीतील एक दिवस पुण्यातील प्रेक्षणीय स्थळांसाठी' असा फंडा वापरला जात असल्याने हौशी पुणेकर, पाहुणे म्हणून आलेले नातेवाईक शहरातील प्रेक्षणीय स्थळांना भेटी देत आहेत. त्यामुळे अनेक स्थळांवर पर्यटकांच्या रांगा लागल्याचे दिसते.

पुणे - "सुटीतील एक दिवस पुण्यातील प्रेक्षणीय स्थळांसाठी' असा फंडा वापरला जात असल्याने हौशी पुणेकर, पाहुणे म्हणून आलेले नातेवाईक शहरातील प्रेक्षणीय स्थळांना भेटी देत आहेत. त्यामुळे अनेक स्थळांवर पर्यटकांच्या रांगा लागल्याचे दिसते.

बाहेरगावाहून आलेल्या नातेवाइकांबरोबरच खास पर्यटनासाठी आलेले शनिवारवाडा, लाल महल, राजा दिनकर केळकर संग्रहालय, सारसबाग, कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालय आणि तुळशीबाग येथे एकदा तरी भेट देतातच, असा आजवरचा अनुभव. महिला पर्यटकांना तुळशीबाग ही पाहायचीच असते. त्यामुळे सुटीत किमान 50 हजारांहून अधिक जण तुळशीबागेत फिरायला जातात. तळ्यातल्या गणपतीचे आकर्षणही अनेकांना असल्याने सुटी सत्कारणी लावली जाते.

पुण्यात येऊन शनिवारवाडा पाहायचा नाही, असे कधी होईल! बाहेरगावाहून येणाऱ्या पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू म्हणजे शनिवारवाडा. दिवाळीच्या सुटीत शनिवारवाडा पाहायला प्रचंड गर्दी होते. दहा हजारांहून अधिक पर्यटक येथे भेटी देतात. याबरोबरच कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयाला आवर्जून भेट देणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. वर्षभरात साधारणत: 20 लाखांच्या आसपास पर्यटक येथे आवर्जून भेटी देतात. गेल्या वर्षभरात 18 लाख 47 हजार 431 पर्यटकांनी येथे भेट दिली आहे. यात तीन हजार सात परदेशी पर्यटकांचा समावेश आहे.

"दिवाळीच्या सुटीत जवळपास पावणेदोन लाख पर्यटक प्राणिसंग्रहालयाला भेट देतात. नोव्हेंबर 2015 मध्ये एक लाख 71 हजार 442, तर डिसेंबरमध्ये एक लाख 90 हजार 837 पर्यटकांनी भेट दिली होती. या वर्षी दिवाळीत पाडवा आणि भाऊबीज या दोन दिवसांत 25 हजार 500 पर्यटकांनी भेट दिली,'' असे प्राणिसंग्रहालयाचे संचालक राजकुमार जाधव यांनी सांगितले.

* वर्षभरातील पर्यटक (एप्रिल 2015 - मार्च 2016)
- प्रौढ : 14, 65, 725
- लहान मुले : 2, 75,682
- परदेशी : 3, 007
- शाळा (सरकारी) : 57, 698
- शाळा (खासगी) : 44, 296
- अपंग : 1017
- एकूण : 18, 47, 431

केळकर संग्रहालयाला दोन हजार पर्यटकांची भेट
राजा दिनकर केळकर संग्रहालय हेदेखील पर्यटकांसाठी उत्सुकतेचा विषय. वर्षभरात साधारणत: दीड लाख पर्यटक येथे भेट देतात. त्यातील 60 टक्के म्हणजेच, साधारणपणे 90 हजार पर्यटक नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मे महिन्यात येतात. दिवाळीच्या सुटीत पर्यटकांच्या संख्येत 15 ते 20 टक्‍क्‍यांनी वाढ होते. डिसेंबरपर्यंत 30 टक्‍क्‍यांपर्यंत ही वाढ नोंदविली जाते. 28 ऑक्‍टोंबर ते 1 नोव्हेंबरदरम्यान जवळपास 1900 पर्यटकांनी संग्रहालयाला भेट दिली. यात 56 परदेशी पर्यटकांचा समावेश आहे, अशी माहिती संग्रहालयाचे संचालक सुधन्वा रानडे यांनी दिली.

Web Title: Pune witness city-tourism