पुण्याचे भवितव्य युवकांच्या हाती 

punes future in youth hand
punes future in youth hand

पुणे :  गेल्या तीन- चार वर्षांपासून राजकारणातील युवकांचा सहभाग वाढू लागला आहे. या क्षेत्राकडे फटकूनही न पाहणारा युवा वर्ग अलीकडे रस घेताना दिसतोय. त्यामुळे गेल्या काही वर्षांत मतदानाची टक्केवारी वाढणे, निवडणुकांचे निकाल बदलणे, असे राजकीय चमत्कार घडू लागलेत. उजवे, डावे असो वा मध्यममार्गी... युवक सर्वांकडे आकर्षित होताना दिसत आहेत. नव्या बदलांची, नावीन्यपूर्ण प्रयोगांची, चांगल्या व्यवस्थेची स्वप्ने ते पाहत आहेत. अर्थातच ते सध्याच्या राजकीय व्यवस्थेकडे; राष्ट्रीय, प्रादेशिक आणि स्थानिक नेते मंडळींकडे चिकित्सकपणेही पाहत आहेत. त्यामुळे सध्याच्या प्रस्थापित नेतेमंडळींवर खूप मोठी जबाबदारी येऊन पडली आहे. युवापिढीवर चांगले राजकीय संस्कार व्हायला हवेत. त्याची जबाबदारी निवडणुकीच्या बाहेर असलेल्या मंडळींकडे नव्हे, तर प्रत्यक्ष काम करणाऱ्या प्रस्थापित नेत्यांकडे आहे. म्हणून या नेत्यांनी अधिक जबाबदारीने वागायला हवे. उक्ती आणि कृती यामध्ये ताळमेळ ठेवायला हवा, अशी अपेक्षा आहे. 

निवडणुकीचे राजकारण आमूलाग्र बदलण्याची ताकद युवापिढीमध्ये आहे, त्यामुळे सगळे संदर्भ बदलू शकतात. असे असताना काही राजकीय मंडळी टोकाची राजकीय डायलॉगबाजी करताना दिसतात. अमक्‍या पक्षांकडून पैसे घ्या, पण मते आम्हालाच द्या; आता लक्ष्मीदर्शन होणार; निवडणूक कधी तरी येते, त्यामुळे राजकीय पक्षांना लुटा... अशी वाक्‍ये कशाचे द्योतक आहेत. नेतेमंडळींचे तेच आणि बड्या राजकीय पक्षांच्या प्रमुखांचेही तेच. एकीकडे म्हणायचे, राजकारणात सुधारणा व्हायला हवी. मात्र, त्या दिशेने कोणीही पावले टाकताना दिसत नाही. उलट परिस्थिती बिघडेल कशी, यासाठीच सर्व स्तरांवर आणि सर्व नेतेमंडळींकडून प्रयत्न होताना दिसत आहेत. मग त्याला कोणताही पक्ष अपवाद ठरलेला नाही. 

नव्याने राजकारणात येऊ इच्छिणारी पिढी 25 ते 40 वयोगटातील आहे. ती प्रस्थापितांच्या मळलेल्या आणि बरबटलेल्या वाटेवर चालणार, की सुधारणांच्या मार्गावरून जाणार, याचा फैसला सिनियर राजकारण्यांच्या हातात आहे. म्हणूनच नव्या राजकीय अंकुरांवर चांगले संस्कार करण्याची जबाबदारी आता ज्येष्ठांपैकी कुणीतरी उचलायला हवी, त्यासाठी योग्य व्यासपीठ निर्माण करायला हवे, ते सर्वसमावेशक असायला हवे, तरच पुढची राजकीय पिढी आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव काढणारी निर्माण होईल. 
पुणे शहराच्या नव्या मतदार याद्यांवर नजर टाकली, तर तरुणांच्या फौजेने प्रौढांना मागे टाकले आहे, असे दिसेल. नवमतदारांसह चाळिशीपर्यंतच्या युवा मतदारांची संख्या 11 लाखांच्या घरात गेली आहे, तर 40 ते 60 वयोगटातील प्रौढ मतदारांची संख्या साडेनऊ लाखांवर आहे. साठी ओलांडलेले सुमारे साडेचार लाख "सिनियर्स' आहेत. अगदी नवे मतदार म्हणजे 18 ते 23 वयोगटातील तरुणांचे प्रमाण चार टक्‍क्‍यांजवळ आहे. म्हणून पुणे शहराची खऱ्या अर्थाने जबाबदारी युवावर्गावर आहे. या प्रचंड ताकदीचे सकारात्मक ऊर्जेमध्ये रूपांतर करण्याचे काम ज्येष्ठ नेत्यांना करावे लागेल, त्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील. 

... आणि गेल्या निवडणुकांवर नजर टाकली असता, नवमतदार किंवा युवा मतदारांचाच निकालांवर प्रभाव असल्याचे दिसते. 2009 च्या मनपा निवडणुकीत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचा मतदानातील वाटा सारखाच, म्हणजे प्रत्येकी 24.8 टक्के होता. भाजपला 13 टक्के, तर शिवसेनेला 9 टक्के मते मिळाली होती. 2012 च्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी (25 टक्के), भाजप (12 टक्के), शिवसेना (9.5 टक्के) अशी मतदानाची टक्केवारी होती. म्हणजे त्यांच्या मतदानात फारसा बदल झाला नाही. कॉंग्रेसची मते मात्र 20 टक्‍क्‍यांच्या खाली घसरली आणि मनसेने युवा मतदारांच्या बळावर मोठी बाजी मारली. म्हणून युवकांची ऊर्जा सकारात्मकपणे सोबत घेत राजकीय पक्षांनी धोरणे निश्‍चित करण्याची गरज निर्माण झाली आहे. 

प्रभाग 41 सर्वांत तरुण 
शहरातील नव्या 41 प्रभागांपैकी कोंढवा बु. आणि येवलेवाडी परिसराचा समावेश असलेला क्र. 41 हा सर्वांत तरुण प्रभाग ठरला आहे. त्यात युवा मतदारांचे प्रमाण 58 टक्के (नवमतदारांसह) आहे. प्रौढ मतदारांचे (40 ते 60 वर्षे) प्रमाण 32 टक्के, तर वृद्धांचे (60 वर्षांवरील) प्रमाण दहा टक्‍क्‍यांजवळ आहे. येथे नवमतदारही (18 ते 23 वर्षे) शहरात सर्वाधिक म्हणजे पाच टक्के आहेत. शनिवार पेठ आणि सदाशिव पेठ परिसराचा समावेश असलेला प्रभाग क्र. 15 हा सर्वाधिक "सिनियर' प्रभाग ठरला आहे. येथे तब्बल 68 टक्के मतदार चाळिशीवरील आहेत. साठी पार केलेल्यांची संख्या 31 टक्के आहे. म्हणजे 40 ते 60 वयोगटातील मतदार 37 टक्के आहेत.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com