भोसले सांस्कृतिक भवन निधीविना रखडले

जागृती कुलकर्णी
बुधवार, 6 जून 2018

धायरी - ‘‘हौशी कलाकार, अल्प उत्पन्न असलेल्या नाट्य संस्था व कलावंतांसाठी सिंहगड रस्ता परिसरात नाट्यगृह झाल्यास कला सादर करण्याची त्यांनाही संधी मिळेल, या उद्देशानेच नाट्यगृह व्हावे ही येथील नागरिकांची अनेक वर्षांपासूनची इच्छा आहे,’’ असे स्थानिक नागरिक नीलेश घोडके यांनी सांगितले. परंतु येथील नियोजित श्री छत्रपती शिवाजीराजे भोसले सांस्कृतिक भवनाचे काम २०१६ पासून संथ गतीने चालले असून, नाट्यगृहाची इमारत उभी राहण्यास आणखी किमान तीन वर्षे तरी लागतील, असे महापालिकेच्या भवन रचना विभागाचे म्हणणे आहे. 

सिंहगड रस्ता येथे नाट्यगृहासाठी जागा निश्‍चित झाली. नाट्यगृहाच्या जागेचे भूमिपूजन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते १८ डिसेंबर २०१६ रोजी झाले. ‘‘नियोजित नाट्यगृहासाठी एकूण ३५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र त्यापैकी १७ कोटींच्या निविदेतील ७० टक्के काम झाले आहे. चालू आर्थिक वर्षात तीन कोटी रुपयांची तरतूद आहे. निधीच्या उपलब्धतेनुसार काम चालले असल्याने प्रत्यक्षात नाट्यगृह सुरू होण्यास अजून तीन वर्षांचा कालावधी लागेल,’’ अशी माहिती भवन रचना विभागाचे शाखा अभियंता भास्कर हांडे यांनी दिली. माणिकबाग येथील डीपी रस्त्यालगत वडगाव बुद्रुक (सर्व्हे नं. ३५/४०) येथे ५ हजार ८४५ चौरस मीटर क्षेत्रात तीन मजली इमारतीसह आठशे आसनक्षमतेचे नाट्यगृह अशी येथील रचना आहे. तर ३५० आसनक्षमतेचे कलामंदिर आणि संगीत महाविद्यालय येथे असेल. या भागात एकही नाट्यगृह नसल्याने नाटकासाठी रसिक प्रेक्षकांना मध्यवर्ती भागात यावे लागते. येथे नाट्यगृह लवकर सुरू झाल्यास स्थानिकांची सोय होईल.  

सिंहगड रस्ता परिसरात एकही नाट्यगृह नाही. त्यामुळे आमच्यासारख्या रसिक प्रेक्षकांना आमची सांस्कृतिक भूक भागविता येत नाही. नाटकांच्या प्रयोगांसाठी शहराच्या मध्यवर्ती भागात जावे लागते. येथे अद्ययावत सुविधांनीयुक्त नाट्यगृह झाले तर येणाऱ्या पिढीला सांस्कृतिक वारसा उपलब्ध येईल. त्यामुळे या भागात लवकरात लवकर नाट्यगृह सुरू व्हावे. 
- शर्वरी कुलकर्णी, प्रेक्षक 

 उद्याच्या अंकात औंध येथील पं. भीमसेन जोशी नाट्यगृहाची सद्यःस्थिती.

Web Title: PuneTheatre Issue Bhosale cultural bhavan fundless