लोकांशी संवादी भूमिका हवी - प्रा. भावे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 मार्च 2017

पुणे  - 'जागतिकीकरणामुळे माणसे एकत्र आली नाहीत किंवा भिंतीही पडल्या नाहीत. डोनाल्ड ट्रम व नरेंद्र मोदी हे राजकारणातील नेते असतील, तर भिंती पडल्या का उभ्या राहिल्या हे बघावे लागेल.

पुणे  - 'जागतिकीकरणामुळे माणसे एकत्र आली नाहीत किंवा भिंतीही पडल्या नाहीत. डोनाल्ड ट्रम व नरेंद्र मोदी हे राजकारणातील नेते असतील, तर भिंती पडल्या का उभ्या राहिल्या हे बघावे लागेल.

संकुचितपणाची भिंत फोडायची असेल, तर गांधी, आंबेडकर व घटनेचा आधार घ्यावा लागेल. लोकांशी संवादी भूमिका ठेवावी लागेल,'' असे मत ज्येष्ठ लेखिका प्रा. पुष्पा भावे यांनी शनिवारी व्यक्त केले.

सामाजिक कृतज्ञता निधी समितीतर्फे वार्षिक पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या वेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव, प्रा. सुभाष वारे उपस्थित होते. मुंबईतील सामाजिक कार्यकर्ते गजानन खातू यांना "सामाजिक कृतज्ञता' पुरस्कार प्रदान करण्यात आला; तर वाई येथील सामाजिक कार्यकर्त्या उषा ढवण यांना "एस. एम. जोशी कार्यकर्ता' पुरस्कार आणि मुंबईतील समता चळवळीतील कार्यकर्ते जगदीश खैरालिया यांना "डॉ. राम आपटे प्रबोधन' पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

प्रा. भावे म्हणाल्या, 'काहींना बदल व परिवर्तन यातील फरकही कळत नाही. परिवर्तन ही खाण्याची गोष्ट नाही. मूल्यांचा गाभा असणारेच परिवर्तन घडवितात. मला "विकास' या शब्दाचे आता भय वाटायला लागले आहे. भौतिक विकास की माणसांचा विकास, याचा विचार केला पाहिजे. संविधान या देशाचा धर्म आहे, त्याविषयी व गावोगावी गांधी पोचविण्याचा बेडरपणा आपल्यात पाहिजे.'' मुख्यमंत्री पदावरील व्यक्तीने किंचाळणे योग्य नाही, रुग्णांविषयी बोलताना शेतकऱ्यांना मरू देणार का, डॉक्‍टरांच्या संपाच्या काळात कित्येक जण मृत्यू पावले, याला जबाबदार कोण, असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला.

'आपल्या आयुष्यात आलेली माणसेच माझ्यासाठी पुरस्काराप्रमाणे होती,'' अशी कृतज्ञता खातू यांनी केली. ते म्हणाले, 'जगभर उजव्या शक्ती पुढे येऊ लागल्या आहेत, हीच इष्टापत्ती समजून परिवर्तनवाद्यांनी बदल घडविण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आपल्या बोलण्यापलीकडील समाजाशी, विरोधकांशी संवाद वाढविला पाहिजे. शेतीचे व्यापक स्वरूपात "मार्केटिंग' करून शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे.''

यशामुळे सरकार सुस्त - डॉ. आढाव
'मुख्यमंत्री भूमिका घेत नाहीत. कर्जमाफी की कर्जमुक्ती शब्दांचा छळ मांडला जात आहे. शेतकऱ्यांच्या मुख्य प्रश्‍नांपासून दूर नेण्याचे काम फडणवीस करत आहेत. सध्याचे सरकार यशामुळे अक्षरशः सुस्त झाले आहे. शेतकऱ्यांना फक्त वीज व पाणी त्यांचे सगळेच प्रश्‍न मिटतील. आता बोलून चालणार नाही; तर पर्याय देण्याची गरज आहे,'' अशा शब्दांत डॉ. आढाव यांनी मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडले.