‘रॅकेट’ तोडण्यासाठी प्रबोधनच गरजेचे

‘रॅकेट’ तोडण्यासाठी प्रबोधनच गरजेचे
‘रॅकेट’ तोडण्यासाठी प्रबोधनच गरजेचे

मुंबईच्या पश्‍चिम उपनगरातील उच्चभ्रू वस्तीतील तारांकित हिरानंदानी रुग्णालयातील ‘किडनी रॅकेट’ उघडकीस आले आणि परत एकदा या विषयावरील चर्चांना उधाण आले. अवयवदानाची प्रक्रिया पारदर्शक असली, तरी बनवणारे ‘चलाख चोर’ अस्तित्वात आहेतच. त्यामुळे अशी रॅकेट्‌स उद्‌ध्वस्त करण्यासाठी रुग्णांमध्ये आरोग्याची जाण व दानासंदर्भात प्रबोधन, हाच महत्त्वाचा उपाय आहे...

माणसाची अमरत्वाची आकांक्षा थेट पुराणांमध्येही आढळते. अश्‍वत्थामा आणि अन्य चिरंजीव मंडळी किंवा पुरू राजाने ययातीकडून मिळवलेले तारुण्य अशी याची काही उदाहरणे सर्वांनाच ठाऊक आहेत. महामृत्युंजय यज्ञ वगैरे थोतांड समाजमनात रुजलेल्या या विचारधारेमुळेच बळावली आहेत. आधुनिक वैद्यकशास्त्राने मात्र मानवी मनातील या अमरत्वाच्या आशेला जागते ठेवण्याएवढी प्रगती गेल्या काही दशकांत केली आहे. आज एकविसाव्या शतकात हृदय, यकृत, मूत्रपिंड आदी अवयवांचे प्रत्यारोपण भारतातही होत आहे. आधुनिक जगात विविध क्षेत्रांत होत असलेल्या गतिमान प्रगतीबरोबरच काही गुंतागुंतीचे जटिल असे नवे प्रश्‍नदेखील उभे राहू लागले आहेत. त्यापैकी दीर्घायुष्यामुळे अनेक नवीन व्याधी समोर येऊ लागल्या आहेत. यातील एक प्रमुख बाब म्हणजे मूत्रपिंडे निकामी होणे. मधुमेह, उच्च रक्‍तदाब, वेदनाशामक औषधांचा दुष्परिणाम आदी. काही कारणांनी मूत्रपिंडे निकामी होतात. या आजारावर रामबाण औषध अजून तरी सापडलेले नाही. (फसव्या जाहिरातींपासून सावध राहा!) तात्पुरता उपाय म्हणून ‘डायलिसिस’ केले जाते; परंतु फार काळ या उपाययोजनेवर काढता येत नाही आणि शेवटी मूत्रपिंड प्रत्यारोपण (किडनी ट्रान्सप्लांट) करावे लागते.

देशभरात अक्षरश: लक्षावधी रुग्ण मूत्रपिंड प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत आहेत. मूत्रपिंड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया साधारणपणे गेल्या दशकाच्या आठव्या शतकात आपल्या देशात मोठ्या प्रमाणावर सुरू झाली. आणीबाणीच्या काळात लोकनायक जयप्रकाश नारायण यांना मूत्रपिंडांच्या आजारामुळे जसलोक इस्पितळात दाखल करण्यात आले होते आणि तेथे त्यांच्यावर ‘डायलिसिस’चे उपचार सुरू होते. त्यांच्या वयामुळे त्यांच्यावर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होऊ शकली नाही. मात्र, मूत्रपिंडे निकामी झालेल्या व्यक्तीसाठी प्रत्यारोपण हीच सर्वांत चांगली उपाययोजना आहे. साहजिकच मागणी भरमसाट; पण पुरवठा अत्यल्प! अवयवदानाची चळवळ आपल्या देशात अजूनही म्हणजे एकविसाव्या शतकातही म्हणावी तशी रुजलेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. साहजिकच त्या काळी म्हणजे १९८० च्या आसपास या प्रत्यारोपणाच्या क्षेत्रात बाजाराचे नियम लागून मूत्रपिंडांचा व्यापार सुरू झाला आणि त्यापाठोपाठ दलालांचा सुळसुळाटही वाढत गेला. फसवणुकीचे प्रकार सुरू झाले. मूत्रपिंडदात्यांना भल्या मोठ्या रकमांचे आमिष दाखवून फसवण्यात येऊ लागले. अगदी अलीकडेच अमरावती येथील एका शेतकऱ्याला श्रीलंका या देशात नेऊन त्याचे मूत्रपिंड काढून घेऊन, त्याच्या तोंडाला पाने पुसण्यात आली.

या फसवणुकीच्या व्यवहारात जाण्याआधी प्रत्यक्ष शस्त्रक्रियेसंबंधात थोडक्‍यात माहिती घेणे जरुरीचे आहे. एखाद्या रुग्णाची मूत्रपिंडे निकामी होतात, तेव्हा त्यास प्रथम डायलिसिस आणि नंतर प्रत्यारोपणाचा उपचार सुचवला जातो. या दोन्ही उपचारांसाठी रुग्णालयांत अतिशय उच्च दर्जाची अशी आधुनिक सामग्री, तज्ज्ञ डॉक्‍टरांची टीम म्हणजेच एक नेफ्रॉलॉजिस्ट, दोन युरॉलॉजिस्ट, भूलतज्ज्ञ तसेच परिचारिका आणि त्याचबरोबर या विषयात पारंगत असलेला असा टेक्‍निकल स्टाफ आणि विशिष्ट अशा आधुनिक शस्त्रक्रिया करण्यासाठी सुसज्ज अशी ‘ऑपरेशन थिएटर्स’ यांची आवश्‍यकता असते. शिवाय, शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची काळजी घेणारी; तसेच योग्य शुश्रूषा करणारी यंत्रणा आदी बाबींची नितांत गरज असते. साहजिकच हे महागडे उपचार विशिष्ट दर्जाच्या रुग्णालयांतच उपलब्ध असतात. सरकारी रुग्णालयांत होणाऱ्या अशा प्रकारच्या शस्त्रक्रियांचे प्रमाण मागणीच्या तुलनेत अत्यंत अत्यल्प असेच आहे.

या संपूर्ण विवेचनामुळे वाचकांच्या हे सहजच लक्षात येईल, की मूत्रपिंड देऊ इच्छिणारी व्यक्‍ती ही बव्हंशी गरीब, बेकार अशाच पार्श्‍वभूमीतली असते आणि मूत्रपिंड घेऊ इच्छिणारी व्यक्‍ती ही ज्यास हा सारा महागडा खर्च परवडू शकतो, अशाच समाजव्यवस्थेतील असते. मूत्रपिंड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया भारतात होऊ लागल्यानंतरच्या सुरवातीच्या काळात म्हणजे १९८० ते ९० या दशकात या मूत्रपिंड प्रत्यारोपणाच्या क्षेत्रात मूत्रपिंडदात्यांच्या फसवणुकीचे; तसेच अन्य अनेक गैरप्रकार उघडकीस आले. त्यानंतर राज्यात १९९४ च्या सुमारास फक्‍त नातेसंबंधातील प्रत्यारोपणच कायदेशीर ठरवण्यात आले. अर्थात, आपल्या देशातील चलाख असे डॉक्‍टर तसेच दलाल वगैरे मंडळींनी ‘भावनिक नाते’ (इमोशनल रिलेशन) अशी संकल्पना पुढे आणली आणि कायद्यातून अनेक पळवाटा काढणे सुरू केले.

सध्या मात्र एखाद्या रुग्णाला ही शस्त्रक्रिया करून, मूत्रपिंडाचे प्रत्यारोपण करून घ्यायचे असेल, तर विविध प्रकारच्या गुंतागुंतीच्या प्रक्रियांना सामोरे जावे लागते. उदाहरणार्थ : प्रथम रुग्णालयातील विशेष समिती कागदपत्रांची छाननी करून, नातेसंबंधांची सत्यता तपासून बघते. अर्थात, दात्याचे मूत्रपिंड (मानवी शरीरात दोन मूत्रपिंडे असली तरी एकावर काम भागू शकते)

रुग्णाला तंतोतंत जुळते आहे की नाही, हे तज्ज्ञ डॉक्‍टर विविध तपासण्यांच्या माध्यमातून तपासून बघतात. नुकत्याच या प्रक्रियेतून जावे लागलेल्या एका डॉक्‍टर मित्राने सांगितले, की एकूण १०७ दस्तावेज त्या वेळी तपासले जातात. त्यानंतर सरकारी कमिटीसमोर रुग्ण, तसेच मूत्रपिंड दाता आणि संबंधित नातेवाईक इत्यादींना मुलाखतीला सामोरे जावे लागते; तसेच त्या वेळी अन्य काही तपासण्याही केल्या जातात. या सर्व प्रक्रियेचे ‘व्हिडिओ शूटिंग’ केले जाते. एका रुग्णाला त्याची पत्नीच मूत्रपिंड देणार होती. तेव्हा त्या पत्नीच्या आईची मुलाखतही या समितीने घेतली. आईची या मूत्रपिंडदानाला संमती आहे, हे स्पष्ट झाल्यानंतरच ती शस्त्रक्रिया पुढे होऊ शकली.

थोडक्‍यात, छाननी करण्याची, वस्तुस्थितीची खातरजमा करून घेण्याची व्यवस्था अस्तित्वात आहे; परंतु हिरानंदानी रुग्णालयात जे काही घडले आहे, त्याचा तपशील बघितल्यावर आपल्या देशातील महान भ्रष्टाचारी अशा परंपरेमुळे या व्यवस्थेला हातोहात बनवणारे ‘चलाख चोर’ अस्तित्वात नसतीलच, असे म्हणणे धाडसाचे ठरेल. डॉक्‍टर मंडळींची या प्रक्रियेतील भूमिकाही या साऱ्या विवेचनाच्या पार्श्‍वभूमीवर बघणे जरुरीचे आहे. रुग्ण आणि दाता यांच्या मूत्रपिंडांचे ‘मॅचिंग’ करण्याच्या गुंतागुंतीच्या तपासण्या करून ‘नेफ्रॉलॉजिस्ट’ त्यांना युरॉलॉजिस्टकडे पाठवतात. दोन युरॉलॉजिस्ट दोन भूलतज्ज्ञांच्या मदतीने ही अवघड शस्त्रक्रिया पार पाडतात आणि रुग्णास परत नेफ्रॉलॉजिस्टच्या ताब्यात देतात. हे तज्ज्ञ डॉक्‍टर प्रत्यारोपण केलेले मूत्रपिंड नाकारले (रिजेक्‍शन) जाऊ नये, म्हणून आधुनिक औषधांची उपाययोजना करतात. ही औषधे अत्यंत महागडी असतात आणि ती रुग्णाला आयुष्यभर घेणे भाग असते, हे वाचकांनी समजून घ्यायला हवे.

हिरानंदानी रुग्णालयात जो काही प्रकार घडला, त्यासंबंधात बरीच अशी चर्चा झाली आहे. मूत्रपिंड प्रत्यारोपणापूर्वीच्या प्रदीर्घ तसेच गुंतागुंतीच्या प्रक्रियेबाबत वर जो काही तपशील दिला आहे, तो बघता, या रुग्णालयात अनेक पातळ्यांवर गैरप्रकार झाल्याची शक्‍यता नाकारता येत नाही. मात्र, सर्वच गैरप्रकारांना संबंधित डॉक्‍टर मंडळीच जबाबदार असतील, असे म्हणणे हे अतिशयोक्‍त वाटते. साहजिकच नेफ्रॉलॉजिस्ट आणि युरॉलॉजिस्ट या अतिविशेष तज्ज्ञांच्या (सुपर स्पेशालिस्ट) संघटनांनी मूत्रपिंड प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया बंद करण्यासंबंधात घेतलेला निर्णयही त्यामुळेच चुकीचा म्हणता येणार नाही.

आज पंचतारांकित रुग्णालयांना महागड्या स्वरूपाचे उपचार करण्यातच अधिक रस आहे. उदाहरणार्थ : हृदयविकाराचे अँजिओप्लास्टी आणि बायपास सर्जरी करणे, कर्करोगावरील उपचार, तसेच सांधे आणि अन्य अवयव बदलांच्या उपचारपद्धती. ही रुग्णालये अशा महागड्या उपचार पद्धतींमध्येच विशेष रस का घेतात, ते सहज समजून येण्यासारखे आहे. आरोग्य हा आपल्या देशातील प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्‍क आहे, असे २०१५ मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या आरोग्य अहवालात ठळकपणे नमूद करणाऱ्या आपल्या सरकारलाही या गुंतागुंतीच्या विषयातून आपले लक्ष काढून घेता येणार नाही. त्यामुळेच हिरानंदानी रुग्णालयात जे काही घडले आणि त्याचा जो काही तपशील बाहेर आला आहे, त्यानंतर सरकारलाही या प्रश्‍नावर काही उपाय हे शोधून काढावेच लागतील.

थोडक्‍यात काय? तर बलात्काऱ्यांना फाशी देऊन, मूळ प्रश्‍न सुटणार नाही; तसेच केवळ डॉक्‍टर मंडळींवर दोषारोप करूनही हा आरोग्यविषयक महत्त्वाचा प्रश्‍न सुटू शकणार नाही. या ‘किडनी रॅकेट’मधील एक ‘रावत’ नावाचा आयुर्वेदिक ‘डॉक्‍टर’ (?) आजही अनेकदा अटक होऊन, जामीन मिळवून परागंदा आहे. आपल्या देशातील कायदा व्यवस्थेचे हे खरे चित्र आहे.

काय असू शकतील उपाय?

 जनमानसात आरोग्यविषयक जाणिवांबाबत सातत्याने प्रबोधन करून, मधुमेह, उच्चरक्‍तदाब आदींसंबंधात जागृती करणे.

 स्वयंऔषधयोजनांचे तोटे जनतेला समजावून सांगणे. वेदनाशामक औषधांच्या सेवनामुळे मूत्रपिंडे निकामी होतात, हे लोकांना समजावून देणे अत्यंत आवश्‍यक आहे.

 ‘अवयवदाना’ची चळवळ पुढे नेणे आणि मृत्यूनंतर अवयवदान करण्यासाठी समाजमन तयार करणे. पाश्‍चिमात्य देशांमध्ये बहुतांश प्रत्यारोपण शस्त्रक्रिया या ‘कॅडेव्हर ट्रान्सप्लांट’ पद्धतीने म्हणजेच मृतदेहांचे अवयव काढूनच केल्या जातात. वृत्तपत्रे तसेच वृत्तवाहिन्या यासंबंधात चांगले काम करतात.

कोणते अवयव दान करता येऊ शकतात 

मूत्रपिंड, फुफ्फुसे, हृदय, डोळे, यकृत, पॅंक्रियॅज, कॉर्निया, छोटे आतडे, त्वचेच्या पेशी, हाडांच्या पेशी, हृदयाच्या झडपा, रक्तवाहिन्या (व्हेन्स)

कागदपत्रांची छाननी डॉक्‍टरांकडे नको!

कागदपत्रांची छाननी हे डॉक्‍टरांचे काम कसे असू शकेल, असा सवाल मूत्रपिंडतज्ज्ञ करत आहेत. कागदपत्रे तपासणे हे डॉक्‍टरांचे मुख्य काम असावे, की शस्त्रक्रियेवर लक्ष केंद्रित करणे अपेक्षित आहे, याचे प्राधान्य सदसद्‌विवेकबुद्धी वापरून घेण्याची वेळ आली असल्याचेही डॉक्‍टरांचे मत आहे.

अवयवांच्या तस्करीत डॉक्‍टरांना आरोपी केले जात आहे. त्याबद्दल पुण्यातील डॉक्‍टरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. मूत्रपिंड प्रत्यारोपणापूर्वी रुग्णाची तपासणी करणे, प्रत्यक्ष शस्त्रक्रिया आणि शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची काळजी घेणे, ही डॉक्‍टरांची जबाबदारी आहे; पण आपल्या देशात शस्त्रक्रियेपेक्षा अवयव प्रत्यारोपणाच्या कागदपत्रांची पूर्तताही डॉक्‍टरांची जबाबदारी मानली जात आहे. अवयव प्रत्यारोपणासाठी अत्यावश्‍यक कागदपत्रांची भली मोठी यादी आरोग्य खात्याने दिली आहे. रुग्णाने दिलेली कागदपत्रे योग्य आहेत की बनावट आहेत, ही शोधण्याची जबाबदारी डॉक्‍टरांवर कशी देता येईल, असा संतप्त सवाल डॉक्‍टरांनी केला आहे. 

डॉक्टरांच्या मते...

अवयव प्रत्यारोपणात सहजता आणि सुसूत्रता आणण्यासाठी यापूर्वी विकेंद्रीकरण करण्याचा निर्णय घेतला होता. पण, ही प्रक्रिया पुन्हा बदलण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे केंद्रीय पद्धतीने अवयव प्रत्यारोपणाला परवानगी द्यावी.

- डॉ. अभय हुपरीकर, अध्यक्ष, पुणे नेफ्रॉलॉजिस्ट ग्रुप

कागदपत्रांच्या छाननीची जबाबदारी डॉक्‍टरांवर नकोच, त्यासाठी सरकारने स्वतंत्र समिती स्थापन करून कायदेशीर प्रक्रिया निश्‍चित करावी. त्यातून रुग्णाशी संबंधित सर्व कायदेशीर बाबी पूर्ण होतील. त्यानंतर या समितीने अवयव प्रत्यारोपण करण्याबाबतचे पत्र डॉक्‍टरांना द्यावे.

- डॉ. सुरेश पाटणकर, मूत्रपिंडतज्ज्ञ

रुग्णांच्या मते...

मधुमेह असल्याने मूत्रपिंडाचे कार्य थांबले होते. चार ते पाच वर्षे डायलिसिस केले. त्याचा खर्चही मोठा होत होता. मूत्रपिंड प्रत्यारोपण प्रभावी मार्ग असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. त्यातून माझ्या आईने मूत्रपिंड दान केले. आता माझे आयुष्य पूर्ववत झाले आहे. मूत्रपिंड प्रत्यारोपण थांबेल असे कोणतेही पाऊल डॉक्‍टरांनी उचलू नये. 

- संतोष कुलकर्णी

सलग सहा वर्षे डायलिसिस करूनही उपयोग होत नसल्याने अखेर मूत्रपिंड प्रत्यारोपणाचा निर्णय घेतला. त्यासाठी मूत्रपिंड प्रतीक्षा यादीत नोंद केली; पण एक-दोन वर्षे वाट पाहूनही मूत्रपिंड मिळाले नाही. त्यामुळे नातेवाइकांमधील एकाने पुढे येऊन मला मूत्रपिंड दान केले. त्यामुळे माझे प्राण वाचले. अवयव तस्करीच्या समस्येचा परिणाम प्रत्यारोपण शस्त्रक्रियेवर होऊ नये, अशी इच्छा आहे.

- एक रुग्ण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com