दोनशे मराठी विद्यार्थ्यांना प्रवेशबंदी

Exam
Exam

पुणे - परीक्षा केंद्रावर आधार कार्ड, वाहन परवाना, पॅन कार्ड अशी सरकारी ओळखपत्रं दाखवूनसुद्धा दोनशेपेक्षा अधिक मराठी विद्यार्थ्यांना रेल्वे भरती बोर्डाद्वारे ग्रुप डी पदांसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेला बसू न दिल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी घडला.

रेल्वेत मराठी मुलांची संख्या कमी असताना क्षुल्लक त्रुटी काढून, त्यांची संधी हिरावली जात असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.

रेल्वे भरती बोर्डाने ग्रुप डीच्या 64 हजार जागांसाठी देशभरात बुधवारपासून परीक्षा घेण्यास सुरुवात केली आहे. यासाठी लाखो विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. परीक्षा खासगी कंपन्यांमार्फत ऑनलाइन पद्धतीने विविध सत्रांमध्ये घेण्यात येत आहे. परीक्षेला येताना कोणतेही सरकारी छायाचित्र असलेले ओळखपत्र सोबत बाळगावे, अशी सूचना जाहिरात आणि प्रवेशपत्रावर दिली होती. गुरुवारी सकाळी नऊला पेपर असल्याने विद्यार्थी सकाळी 7.15 वाजता नऱ्हे येथील एका खासगी कंपनीच्या परीक्षा केंद्रावर हजर होते. विद्यार्थ्यांनी ओळखपत्र दाखवून, परीक्षेला बसू देण्याची मागणी केली. मात्र, तेथील कर्मचाऱ्यांनी परीक्षार्थ्यांकडे असणारे आधार कार्ड पाहूनसुद्धा परीक्षेला बसू दिले नाही. त्यानंतर त्यांनी विविध ओळखपत्रं दाखवली. परंतु, कर्मचाऱ्यांनी त्रुटी असल्याचे सांगत परीक्षेला बसू दिले नाही. या संपूर्ण प्रकाराची तक्रार देण्यासाठी विद्यार्थी नऱ्हे पोलिस चौकीत गेले असता, त्यांचे म्हणणे ऐकून घेतले नाही. त्यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी न्याय मिळण्यासाठी पुण्याच्या रेल्वे विभागीय कार्यालयात रेल्वे व्यवस्थापक यांच्याकडे धाव घेतली.

दरम्यान, पुण्यात चार ठिकाणच्या केंद्रांवर ही परीक्षा होत आहे. केवळ नऱ्हे येथील केंद्र सोडल्यास इतर सर्व ठिकाणी कोणत्याही एका ओळखपत्रावर किंवा ओळखपत्राच्या कलर छायांकित प्रतीवर परीक्षेला बसू दिले जात आहे. नऱ्हेच्या परीक्षा केंद्रातील कर्मचारी हे उद्धट बोलत असून, कोणतेही कारण न देता विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्यापासून रोखत असल्याचा आरोप परीक्षार्थींनी केला आहे.

धक्के मारून बाहेर काढले
विद्यार्थ्यांनी आधार कार्ड दाखविल्यानंतर आधार कार्ड बनावट असल्याचे सांगत कर्मचाऱ्यांनी त्यांना परीक्षेला बसू दिले नाही. त्यानंतर पॅन कार्ड, वाहन परवाना, ओळखपत्र दाखवल्यानंतर त्यामध्ये त्रुटी काढून परीक्षेपासून वंचित ठेवले. काहीजण परीक्षेला बसले. मात्र, ऐनवेळी त्रुटी काढून त्यांना परीक्षा केंद्रातून धक्के मारून बाहेर काढल्याचे परीक्षार्थी राहुल निकम आणि किरण मोकळ यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com