'जोर धार'

सहकारनगर - पावसामुळे रस्त्याला नाल्याचे स्वरूप आले होते.
सहकारनगर - पावसामुळे रस्त्याला नाल्याचे स्वरूप आले होते.

पुणे - यंदाच्या पावसाळ्यातील पहिल्याच दमदार पावसाने पुणेकरांचे जनजीवन विस्कळित झाले. उशिरा धावणाऱ्या पीएमपी बस, रस्त्यांना आलेले नाल्याचे स्वरूप, जागोजागी झालेली वाहतूक कोंडी, बंद पडलेले सिग्नल यामुळे उपनगरांसह शहराच्या मध्य वस्तीत खेळखंडोबा झाल्याचे चित्र रस्त्या-रस्त्यांवर दिसत होते. शहरात नैॡत्य मोसमी पाऊस गेल्या महिन्यात दाखल झाला; पण त्यानंतर आतापर्यंत प्रत्येक पुणेकर दमदार पावसाची वाट पाहात होता. आजचा आठवड्याचा पहिला दिवस उजाडला तोच दमदार पावसाने. सोमवारी पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू होता. त्यामुळे रस्त्यांवर जागोजागी पाणी साचले होते.

पावसाळी गटारे तुंबली 
सहकारनगरमधील गजानन महाराज चौकातील तुळशीबाग कॉलनीच्या मुख्य रस्त्यावर पाणी साचले होते. महापालिकेने पावसाळ्यापूर्वीच्या कामांसाठी ८० कोटी रुपये खर्च केले, असा दावा केला आहे. प्रत्यक्षात मात्र या परिसरात जागोजागी पावसाळी गटारे बंद आहेत. येथील नागरिकांनी पुढाकार घेऊन भरपावसात पावसाळी गटारांच्या झाकणातील घाण स्वच्छ करून पाण्याला वाट करून दिली. या वेळी महापालिकेचा कोणताही कर्मचारी फिरकला नाही. शिवाजी शिरसट हे पिठाची गिरणी कामगार आहेत; पण रस्त्यावर गुडघाभर साचलेल्या पाण्याला वाट करून देण्यासाठी ते स्वतः पाण्यात उतरले. ते म्हणाले, ‘‘या भागात कायमच पावसाचे पाणी साचते; पण त्याला वाट करून देण्यासाठी महापालिकेचा कोणीच कर्मचारी फिरकत नाही. त्यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागते.’’

पीएमपी बससेवा कोलमडली 
सहकारनगर बसथांब्यावर एक तासापासून कोणतीही बस आली नसल्याची तक्रार येथील प्रवाशांनी केली; तसेच धायरी परिसरातही भर पावसात पीएमपीची वाट बघत प्रवासी थांबले होते; पण तासाभरानंतरही बस आली नसल्याची माहिती येथील प्रवाशांनी दिली.

वाहतूक कोंडीत अडकले पुणे 
आठवड्याच्या पहिल्या दिवशी शाळेसाठी घराबाहेर पडलेले विद्यार्थी आणि कार्यालयात जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची त्रेधा उडाली. ठिकठिकाणी रस्त्यांना नाल्याचे स्वरूप आले होते. त्यामुळे वाहतुकीची गती मंदावली होती. जागोजागी वाहतूक कोंडी झाल्याचे दिसत होते. सिंहगड रस्ता, कर्वे रस्ता, नगर रस्ता, सातारा रस्ता या प्रमुख रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली होती.

पावसातील पुणे...
 खड्ड्यांमुळे वाहतुकीचा वेग मंदावला
 पावसाळी गटारे तुंबली
 मेट्रोचे नदीपात्रातील काम बंद
 भिडे पूल पाण्याखाली
 खडकवासला धरणातून मुठा नदीत १८ हजार ४०० क्‍युसेक पाण्याचा विसर्ग
 नदी पात्रातील रस्ते वाहतुकीसाठी दुपारनंतर बंद 
 खबरदारीचा उपाय म्हणून नदीपात्रात पोलिस बंदोबस्त
 महापालिकेचा पूर नियंत्रण कक्ष सक्रिय

सकाळपासून धायरीतील गारमळ्याच्या बसथांब्यावर पीएमपीची वाट बघत होते. पण तासभर वाट पाहूनही बस आली नाही. या ठिकाणी पावसापासून बचाव करण्यासाठी व्यवस्थित थांबाही नाही. त्यामुळे जोरदार पावसात वाट पाहण्याशिवाय पर्यायच नव्हता.
- पुष्पलता कदम, धायरी

वाहतूक कोंडीमुळे इतर वेळी शाळा सुटल्यावर घरी जाण्यासाठी अर्धा ते पाऊण तास लागतो. आज कर्वेनगर परिसरात भयंकर वाहतूक कोंडी होती. त्यामुळे बाल शिक्षण मंदिरातून सिंहगड रस्त्यावरील आनंदनगर येथे जायला दीड तास लागला. कर्वेनगर, राजाराम पूल, सिंहगड रस्ता या सर्व ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती.
- सायली जोशी, आनंदनगर

आपत्कालीन मदतीसाठी या क्रमांकावर फोन करा
०२०-२५५०६८००,१,२,३,४ किंवा ०२०-२५५०१२६९

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com