जिल्ह्यात पावसामुळे धरणे पाणीदार

Rain-Pune-District
Rain-Pune-District

नीरा खोऱ्यात ३२ टीएमसी पाणी
सोमेश्वरनगर/गुळुंचे - नीरा खोऱ्यातील चार धरणांमध्ये ३२ टीएमसी इतका म्हणजेच ६४.४९ टक्के पाणीसाठा झाला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत पंचवीस टक्‍क्‍यांनी हा पाणीसाठा जास्त आहे. नीरा डावा कालवा व उजव्या कालव्याची आवर्तने अवलंबून असलेले वीर धरण तर भरण्याच्या मार्गावर आहे. दरम्यान, धरणे भरू लागल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.

नीरा खोऱ्यातील नीरा देवघर, भाटघर, वीर व गुंजवणी या चारही धरणांच्या लाभक्षेत्रातील लोकांचे धरणसाठ्याकडे लक्ष लागले होते. नीरा डावा कालवा व नीरा उजवा कालवा यावर अवलंबून असलेले पुणे व सातारा जिल्ह्यातील शेतकरीही पाऊस लांबल्याने खरिपासाठीच्या आवर्तनाच्या अपेक्षेत होते.

धरणक्षेत्रात विशेषतः नीरा देवघर व गुंजवणी धरणाच्या क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्याने धरणांचा पाणीसाठा मागील आठवड्यात झपाट्याने वाढला. भाटघर व देवघर या मोठ्या धरणांनी साठीचा टप्पा पार केला. गुंजवणी धरण केव्हाच भरले असते; परंतु त्यातून वीर धरणात पाणी सोडले जात आहे.

यामुळे प्रत्यक्षात कमी पाऊस असतानाही वीर धरण ७५ टक्‍क्‍यांपर्यंत पोचले आहे. मागील वर्षी याचवेळी हे धरण अवघे ३१ टक्के होते. या धरणातून दोन्ही कालव्यांना पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे बारामती, पुरंदर, इंदापूर, माळशिरस, सांगोला या पाऊस लांबलेल्या तालुक्‍यांतील शेतकऱ्यांना खरिपासाठी दिलासा मिळणार आहे.

‘खरीप हंगामासाठी आवर्तन’
धरणांचा पाणीसाठा समाधानकारक वाढला आहे. त्यामुळे नीरा डावा कालव्यातून ८२७ क्‍युसेक प्रतिसेकंद क्षमतेने व उजवा कालव्यामधून १२०४ क्‍युसेक प्रतिसेकंद वेगाने खरीप हंगामासाठी आवर्तन सोडण्यात आले आहे, असे उपविभागीय अभियंता विजय नलावडे यांनी सांगितले.

वीर धरणाचा पाणीसाठा पुरेसा वाढल्याने मागील पाच दिवसांपासून चार मेगावॉट क्षमतेचा वीजनिर्मिती संच सुरू झाला आहे. दोन मेगावॉटपर्यंत वीजनिर्मिती होत आहे. 
- दत्ता शिंदे, तांत्रिक अधिकारी, पाटबंधारे खाते

उजनीचा साठा ‘प्लस’मध्ये
इंदापूर - पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूरलगत सोलापूर जिल्ह्यात भीमानगर (ता. माढा) येथे भीमा नदीवर असलेले उजनी धरण वजा पातळीतून उपयुक्त पातळीत आले आहे. 

उजनी धरणात बुधवारी दुपारी हजारापर्यंत पाणीपातळी ४९१.६६० मीटर होती. एकूण साठा ६८.१९ टीएमसी इतका आहे. धरणातील उपयुक्त साठा ४.५३ टीएमसी झाला असून, धरणातील पाण्याची टक्केवारी ८.४५ टक्के आहे. धरणात बंडगार्डन येथून ११७३१, तर दौंड येथून ३९९८१ क्‍युसेक पाणी भीमा नदीतून धरणात मिसळत आहे. १७ जुलै रोजी ६६ हजार क्‍युसेकने पाणी धरणात आल्याने धरण उपयुक्त पातळीत येण्यास मदत झाली. 

मागील एक महिन्यापासून धरणातील पाणीपातळी उणे २० टक्‍क्‍यांवर गेल्याने शेतकरी हवालदिल झाले होते. मात्र, गेल्या ४ ते ५ दिवसांपासून लोणावळ्याच्या पश्‍चिम भागात पडलेल्या मुसळधार पावसामुळे मुळा, मुठा, पवना व इंद्रायणी नदीतील पाणी भीमा नदीत येत आहे. भामा आसखेडा, वडिवळे, कासारसाई, पानशेत व खडकवासला धरणातील पाणीसुद्धा भीमा नदीत येत असल्याने धरणाची पाणीपातळी चांगलीच वाढू लागली आहे. सध्या पडणारा पाऊस लक्षात घेता उजनी धरण ऑगस्टअखेर किंवा सप्टेंबरमध्ये भरेल, असा विश्वास शेतकरी व्यक्त करत आहेत. 

दरम्यान, उजनी धरण भरल्यास धरणातील पाण्याचे योग्य नियोजन करावे, धरणासाठी त्याग केलेल्या प्रकल्पग्रस्तांचा पाणी देताना प्रामुख्याने विचार करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील, किसन जावळे, कर्मयोगी कारखान्याचे संचालक सुभाष भोसले, सुभाष काळे, माजी संचालक अंकुश पाडुळे, इंदापूर बॅंकेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब मोरे यंनी केली आहे.

शेतकऱ्यांना दिलासा
साखर कारखाने, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, उपसा सिंचन जलसिंचन योजना व पाणीपुरवठा योजनांना पाणी उपलब्ध होणार असल्याने कारखानदार व शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. उजनी धरण भरले तर आर्थिक सालचंदी चांगली राहात असल्याने शेतकरी वरुणराजास साकडे घालत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com