इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागात पाऊस (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 जून 2018

वालचंदनगर- इंदापूर तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात आज सायंकाळी जोरदार पाऊस झाला. सायंकाळी पाचनंतर सुरू झालेला पाऊस सुमारे अर्धा ते पाऊण पडत होता. या पावसामुळे जळून चाललेल्या उसाला फायदा होणार आहे. जोराचा पाऊस झाल्याने शेतांमधून पाणी वाहत होते. 

वालचंदनगर- इंदापूर तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात आज सायंकाळी जोरदार पाऊस झाला. सायंकाळी पाचनंतर सुरू झालेला पाऊस सुमारे अर्धा ते पाऊण पडत होता. या पावसामुळे जळून चाललेल्या उसाला फायदा होणार आहे. जोराचा पाऊस झाल्याने शेतांमधून पाणी वाहत होते. 

जेजुरीत ९५ मिलिमीटरची नोंद
जेजुरी - जेजुरी शहरात आज सायंकाळी पाचच्या सुमारास एक तासभर मुसळधार पाऊस झाला. नगरपालिकेच्या वेधशाळेत सुमारे ९५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जेजुरी परिसरात अनेक वर्षांनंतर असा मोठा पाऊस झाला आहे. यंदा जून महिन्यात आत्तापर्यंत ६१ मिलिमीटर पाऊस झाला होता. आजच्या पावसाने तो १५६ मिलिमीटरवर पोचला आहे. गेल्या काही वर्षांत जेजुरी परिसरात पडलेला सर्वांत मोठा पाऊस आहे. यंदा आठ दिवसांतच १५६ मिलिमीटर पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. बेलसर परिसरातही चांगला पाऊस झाला. बुधवारीही या परिसरात चांगला पाऊस झाला होता. यंदा पावसाला लवकरच समाधानकारक सुरवात झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

दिवे घाटातील पावसाचा व्हिडिओ पाहा 

मावडी सुप्यात जोरदार हजेरी
गराडे- मावडी सुपे (ता. पुरंदर) येथे शुक्रवारी (१० जून) सायंकाळी ५ पासून संपूर्ण भागात काळे ढग जमा झाले व काही वेळातच जोरदार पावसाला सुरवात झाली. जोरदार पावसानंतर सगळीकडे पाणी पाणीच झाले. या पावसामुळे शेतीची पूर्वमशागतीची कामे करण्यास मदत होणार असून, तणदेखील बाहेर पडून पुढील पिकास फायदेशीर राहणार आहे. बऱ्याच वर्षांतून रोहिणी नक्षत्र व मृग नक्षत्रात जोडून चांगला पाऊस झाल्याने या भागातील शेतकरी आनंदी झाला आहे, असे पाणलोट समिती सचिव संदीप देवकर यांनी सांगितले.

पुरंदरच्या पूर्व भागात शेतात तळी
माळशिरस - पुरंदर तालुक्‍यातील पूर्व भागातील राजेवाडी, आंबळे, टेकवडी व माळशिरसच्या काही भागात आज जोराचा पाऊस झाला. यामुळे शेतांना तळ्याचे स्वरुप आले होते. खरिपाच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. आज दिवसभर या परिसरात मोठ्या प्रमाणात उकाडा होता. सायंकाळी पाचच्या सुमारास पूर्वभागात पावसाला सुरवात झाली. पूर्व भागातील पोंढे गाव वगळता माळशिरस, टेकवडी, आंबळे व राडेवाडीत चांगला पाऊस झाला. राजेवाडी व आंबळ्यात पावसाचे प्रमाणात सर्वाधिक जास्त होते. यामुळे पाण्याचा प्रश्न पूर्णत: सुटला नसला, तरी हंगामाची सुरवात मात्र चांगली झाली आहे.

वाल्हे परिसरात सखल भागात पाणी
वाल्हे : वाल्हे (ता. पुरंदर) परिसरामध्ये शुक्रवारी साडेपाचनंतर मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे सखल भागांत पाणी साचले. दुचाकीस्वार व पादचाऱ्यांची तारांबळ उडाली. दिवसभराच्या उकाड्याने घामाघूम झालेल्या वाल्हेकरांसह शेतकऱ्यांना सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पावसाच्या सरींनी भिजवले. दरम्यान, पावसाअभावी अनेक ठिकाणी वीज खंडीत झाल्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली. आज सकाळपासूनच कडक उन पडले होते. दुपारपासून वातावरणात दमटपणा जाणवत होता. सायंकाळी पाचनंतर आकाशात ढग दिसू लागले, मात्र उकाडा कायम होता. वाल्ह्यासह, जेजुरी, मांडकी, जेऊर, लपतळवाडी, पिंगोरी, पिसुर्टी, नीरा आदी ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या. 

दावडी, वाफगावात समाधान
दावडी : दावडी व वाफगाव (ता. खेड) परिसरात शुक्रवारी (ता.८) पावसाने हजेरी लावली. समाधानकारक पाऊस झाल्यामुळे शेतीच्या मशागतीच्या कामांना सुरवात करता येणार आहे. वाफगाव परिसरातील गुळाणी, वाकळवाडी, मांदळवाडी, वरुडे व जरेवाडी या गावांमध्ये दुपारी अडीचच्या सुमारास तासभर व संध्याकाळी सव्वासहाचे सुमारास तासभर जोरदार पाऊस झाला. दावडी, निमगाव, खरपुडी परिसरातही संध्याकाळी सव्वासहाच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. वेळेवर व समाधानकारक पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांत समाधान आहे.

चाकण परिसरात शेतकऱ्यांची लगबग
चाकण - चाकण व परिसरातील गावांमध्ये शुक्रवारी सायंकाळी सुरू झालेला पाऊस उशिरापर्यंत सुरू होता. चाकण शहरात दोन तास पाऊस झाला. शेलपिंपळगाव परिसरातही पावसाचा जोर चांगला होता. या पावसाने शेलपिंपळगाव परिसरात शेतात पाणी साचले, अशी माहिती शेलपिंपळगावच्या सरपंच विद्या मोहिते यांनी दिली. या पावसाने जनावरांचा चारा, कडबा, सरमाड आदींच्या वळई प्लॅस्टिकच्या कागदाने झाकण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू होती.

दावडी, निमगावात वाहतूक ठप्प
दावडी : शुक्रवारी (ता. ८) सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास झालेल्या पावसामुळे दावडी व निमगाव (ता. खेड) येथील ओढ्यांना पूर येऊन तासभर वाहतूक दोन्ही बाजूंनी ठप्प झाली होती.  तासभर चाललेल्या पावसामुळे दावडी येथील महालक्ष्मी मंदिराजवळील ओढ्याला व निमगाव येथील सायंबाचा ओढा; तसेच मुक्ताई मंदिराजवळील ओढ्याला साडेसातच्या सुमारास पूर येऊन पुलावरून पाणी वेगाने वाहू लागले. पुलावरून पाणी वेगाने वाहत असल्यामुळे तीनही ओढ्यांच्या दोन्ही बाजूंनी रहदारी ठप्प झाली. निमगाव येथील सायंबाचे ओढ्याचे दोन्ही बाजूस कार, जीप, पिकअप व टेंपो अशी सुमारे तीस चारचाकी वाहने व सुमारे चाळीस दुचाकी वाहने पुरामुळे अडकून पडली होती. पाऊस थांबल्यानंतर पावणेनऊच्या सुमारास पाणी ओसरले व त्यानंतर रहदारी पूर्ववत झाली. 

Web Title: Rain in western part of Indapur taluka