निधी उभारण्यावरून कॉंग्रेसमध्ये "खडाखडी'

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 जानेवारी 2017

पुणे - सत्ता गेल्यानंतर निधीची चणचण भासू लागलेल्या कॉंग्रेसमध्ये आता निवडणुकीसाठी निधी उभारण्यावरून जोरदार वाद सुरू झाला आहे. महापालिकेत जबाबदारीची पदे घेतलेल्या नगरसेवकांनी निवडणुकीसाठी भरीव निधी उभारण्याचा वाटा द्यावा, अशी सूचना कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांनी केली; तर आमदारकीसारखी पदे उपभोगलेल्या नेत्यांनीही यात भर घालावी, अशी अपेक्षा नगरसेवकांनी व्यक्त केली.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पक्षातून सात नगरसेवक विविध राजकीय पक्षांमध्ये गेले आहेत. निधी नसल्यामुळे पक्षाला "आउट डोअर' प्रचार करण्यावर मर्यादा आल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेसमधील अंतर्गत गटातटाचे राजकारण चव्हाट्यावर येत आहे. निवडणुकीच्या निधीसंकलनाची बैठक पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याच्या घरी नुकतीच झाली. त्यात पक्षातील पदाधिकारी विरुद्ध नगरसेवक असा वाद रंगल्याची माहिती पुढे येत आहे.

महापालिकेत स्थायी समितीसह शहर सुधारणा समिती, विरोधी पक्षनेतेपद आदी पदे भूषविणाऱ्या नेत्यांनी निवडणुकीसाठी निधीसंकलनात मोठा वाटा उचलावा, असे मत एका पदाधिकाऱ्याने व्यक्त केले. विकास आराखडा, मोबाईल टॉवर, बांधकाम व्यावसायिकांची दंडमाफी आदी विषयांवर सत्ताधाऱ्यांना काही नगरसेवकांनी "सहकार्य' केल्याची जाणीवही त्यांनी करून दिली. त्यामुळे पक्षानिधीसाठी नगरसेवकांनीच विशिष्ट रक्कम द्यावी, असा सूर उमटला. त्यावरून नगरसेवकातर्फे एक पदाधिकारी आक्रमक झाला. विधानसभा, विधान परिषद, लोकसभा आदींसाठी संधी दिलेल्या नेत्यांनी शहरात काय केले आहे, त्याचा पक्षाला किती फायदा झाला, याचाही जाहीर लेखाजोखा मांडा, म्हणजे "दूध का दूध...' होईल, असे त्याने सांगितले; तसेच काही कार्यकर्त्यांना पदे देताना "नेत्यांनी' किती सहकार्य केले, हेही जगजाहीर असल्याचे त्याने स्पष्ट केले. पुण्याच्या निवडणुकीची जबाबदारी पक्षाने काही ज्येष्ठ नेत्यांवर टाकली आहे. त्यांची निधीसंकलनातील काय जबाबदारी आहे, यावरही या बैठकीत चर्चा झाली.

Web Title: Raise funds from Congress