चारही वेदांना राजाश्रय मिळावा - घैसास 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 जानेवारी 2017

पुणे - "" वेदांचे अध्ययन आणि अध्यापन करणारे घनपाठी आणि प्राध्यापक दोन्ही समानच आहेत. परंतु वेद मुखोद्‌गत असणाऱ्या घनपाठींना मात्र तुलनेने दहा-पंधरा हजार रुपयांवर समाधान मानावे लागते. त्यामुळे ते पौरोहित्याकडे वळतात. वेद ही मुखोद्‌गत करण्याची विद्या आहे. त्यामुळे घनपाठींची नियुक्ती विद्यापीठ स्तरावर व्हावी. त्यासाठी राज्य व केंद्र सरकारकडून वेदांना राजाश्रय मिळायला पाहिजे,'' अशी अपेक्षा वेदाचार्य मोरेश्‍वर घैसास यांनी व्यक्त केली. 

वेदमहर्षि कै. विनायकभट्ट घैसास गुरुजी जन्मशताब्दी वर्षाची सांगता वेदभवन येथे 15 ते 24 जानेवारीदरम्यान होत आहे. या निमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. घैसास म्हणाले, ""महर्षी सांदिपनी राष्ट्रीय वेदविद्या प्रतिष्ठानचा मी सदस्य आहे. संस्थेअंतर्गत तीनशे वेदपाठशाळा सुरू आहेत. त्यापैकी चाळीस वेदपाठशाळा अनुदानित आहेत. परंतु केंद्राकडून मिळणारे अनुदान अपुरे आहे. वर्षाला आठ कोटी रुपये मिळतात. त्यातून वेदपाठशाळांना अर्थपुरवठा करावा लागतो. चारही वेदांसाठी केंद्रांकडून योग्य तरतूद अपेक्षित आहे. महाराष्ट्रातही कृष्ण यजुर्वेदापेक्षा शुक्‍ल यजुर्वेदाची स्थिती चांगली आहे. भविष्यात वेदभवन येथे कृष्ण यजुर्वेदसहित चारही वेदांचे अध्ययन, अध्यापन सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे.'' 

दरम्यान, जन्मशताब्दी निमित्त आतापर्यंत 130 महायज्ञ पूर्ण झाले असून, 151 महायज्ञांची पूर्णाहुती पुण्यातील सांगता समारंभात होईल. 15 जानेवारीला डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्या हस्ते वेदध्वजारोहण, वेदमहर्षींच्या प्रतिमेचे आणि वेदांचे पूजन होईल. 17 जानेवारीला 21 ऋग्वेद संहिता महायज्ञांस सुरवात होईल. 19 जानेवारीला दुपारी साडेचार वाजता आयोजित कार्यक्रमास ज्योतिषपीठाधीश्‍वर शंकराचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी, योगगुरू रामदेवबाबा, खासदार सुभाषचंद्र, महामंडलेश्‍वर विवेकानंदपुरीजी स्वामी महाराज, बॅंक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष रवींद्र मराठे, पालकमंत्री गिरीश बापट उपस्थित राहतील. वेदमहर्षींच्या स्मृतिप्रीत्यर्थ सरस्वती उपासना पुरस्कार, कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्‍वविद्यालयाला देण्यात येईल. 12 जानेवारी ते 5 फेब्रुवारीपर्यंत कृष्ण यजुर्वेदाचे घनपारायण होईल, असेही घैसास यांनी सांगितले. शारंगधर फार्माचे डॉ. जयंत अभ्यंकर उपस्थित होते.

Web Title: Rajasraya with the four Vedas