नाम फाउंडेशन, राजेश काची यांना ‘मानवता पुरस्कार’

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 फेब्रुवारी 2017

पुणे - अभिजित कदम मेमोरिअल फाउंडेशनचा ‘अभिजित कदम मानवता पुरस्कार’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जाणाऱ्या नाम फाउंडेशन या संस्थेबरोबरच सामाजिक कार्यकर्ते राजेश काची यांना जाहीर झाला आहे.

पुणे - अभिजित कदम मेमोरिअल फाउंडेशनचा ‘अभिजित कदम मानवता पुरस्कार’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जाणाऱ्या नाम फाउंडेशन या संस्थेबरोबरच सामाजिक कार्यकर्ते राजेश काची यांना जाहीर झाला आहे.

फाउंडेशनचे कार्यकारी विश्वस्त डॉ. विश्‍वजित कदम यांनी या पुरस्कारांची घोषणा केली. धनकवडीतील भारती विद्यापीठ येथे आयोजित कार्यक्रमात काँग्रेसचे नेते, आमदार नारायण राणे यांच्या हस्ते आणि भारती विद्यापीठाचे संस्थापक डॉ. पतंगराव कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी (ता. २७) या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. ‘नाम’च्या वतीने संस्थेचे संस्थापक नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे हा पुरस्कार स्वीकारतील.

कदम म्हणाले, ‘‘नाम’ने महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी जे काम उभे केले, ते अतुलनीय आहे. नाना आणि मकरंद यांच्या सहृदयतेची आणि संवेदनशीलतेची साक्ष देणारे आहे. त्यांची ‘नाम’ ही संस्था आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांची आधारवड बनली आहे. असेच वेगळे कार्य राजेश काची यांनीही करून दाखवले आहे. एखाद्याचे प्राण संकटात असतील तर हातातले काम बाजूला ठेवून काची धावून जातात. आजवर शंभराहून अधिक लोकांचे प्राण त्यांनी वाचवले आहेत. त्यामुळे त्यांचा सन्मान या पुरस्काराने करत आहोत.’’

Web Title: rajesh kachi manavata award