सिंहगर्जना होताच पर्यटकांचा जल्लोष ! 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 मे 2017

पुणे -  जंगलचा राजा असणारा सिंह कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात दाखल झाल्यापासून पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढली आहे. आठवड्याच्या अखेरीस जवळपास 17 ते 18 हजार पर्यंटक प्राणिसंग्रहालयाला भेट देत आहेत. गर्द झाडीत विश्रांती घेणाऱ्या सिंहाची एक झलक पाहताच... अन्‌ त्याची गर्जना होताच बच्चे कंपनीसह इतर पर्यटक एकच जल्लोष करत असल्याचे प्राणिसंग्रहालयात दिसून येते. 

सिंहदर्शनाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या पुणेकरांना तब्बल बारा वर्षांनंतर सिंह पाहायला मिळत आहे. प्राणिसंग्रहालयात सिंह आम्हाला पाहायला मिळावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून पर्यटक करत होते. त्यांची ही मागणी पूर्ण करण्यासाठी प्राणिसंग्रहालय गेल्या चार वर्षांपासून प्रयत्न करत होते. गुजरातमधील सक्करबाग प्राणिसंग्रहालयातून (जुनागढ) सिंहाची एक जोडी पुण्यात आणण्यात कात्रज प्राणिसंग्रहालयाला डिसेंबर 2016 मध्ये यश आले. तेजस आणि सुबी ही सिंहाची जोडी 26 डिसेंबर 2016 मध्ये पुण्यात दाखल झाली. त्यानंतर केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार या जोडीला काही काळासाठी पर्यटकांपासून दूर ठेवण्यात आले. पुण्यातील वातावरणाशी जुळवून घेतल्यानंतर या सिंहांना 9 एप्रिल 2017 पासून पर्यटकांना पाहण्यासाठी खुले केले आहे. खरंतर सिंहांसाठीचा स्वतंत्र खंदक बांधण्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. मात्र तरीही पर्यटकांना सिंह पाहता यावा, म्हणून पांढऱ्या वाघाच्या खुल्या खंदकात या सिंहांना तात्पुरते ठेवण्यात आले आहे. 

उन्हाळ्याची सुटी असल्यामुळे प्राणिसंग्रहालयात येणाऱ्या पर्यटकांची संख्या तुलनेने अधिक असते. हे लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे प्राणिसंग्रहालयाचे संचालक राजकुमार जाधव यांनी सांगितले.