खोत कोण हा? आमच्यासाठी तो विषय संपलाय- राजू शेट्टी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 मे 2017

या काळात परभणी जिल्ह्यांत शेतकऱ्यांच्या बांधावर खोत शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत. शेट्टी यांना आज पुन्हा खोत यांच्याविषयी विचारले असता, तो विषय आमच्यासाठी संपला असल्याचे स्पष्ट करीत, त्यावर अधिक भाष्य करण्याचे त्यांनी टाळले.

पिंपरी : कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याविषयी विचारणा केली असता, "त्या विषयावर बोलायची काही गरज नाही. तो विषय आमच्यासाठी संपला आहे,'' असे सांगत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी "सकाळ'शी बोलताना त्यांची दिशा मंगळवारी स्पष्ट केली.

त्याबाबत पुन्हा विचारणा केली असता, "खोत कोण हा? खोतबद्दल बोलायचा काय संबंध. संघटनेचे हजारो कार्यकर्ते आहेत. त्यातला हा एक आहे. शेतकऱ्यांची कर्जमुक्ती आणि स्वामीनाथन समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी हेच आता आमचे लक्ष्य आहे. बाकीचे विषय किरकोळ आहेत,'' असे सांगत शेट्टी यांनी त्यांची भूमिका ठामपणे मांडली.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते म्हणून खोत यांचा राज्यमंत्रिमंडळात समावेश झाला. मात्र, त्यानंतर खोत यांच्या भुमिकेमुळे संघटनेच्या या दोन नेत्यांतील अंतर्गत वाद वाढत चालले आहेत. शेट्टी यांनी पुण्यातून सोमवारपासून आत्मक्‍लेश यात्रा सुरू केली. पुण्यात, तसेच पिंपरीतही पत्रकारांनी त्यांना खोत यांच्याविषयी विचारणा केली. त्यावेळी शेट्टी यांनी त्यांच्या प्रश्‍नांकडे दुर्लक्ष केले होते. त्यांची यात्रा आज आकुर्डी येथून वडगाव मावळला पोचली. या काळात परभणी जिल्ह्यांत शेतकऱ्यांच्या बांधावर खोत शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत. शेट्टी यांना आज पुन्हा खोत यांच्याविषयी विचारले असता, तो विषय आमच्यासाठी संपला असल्याचे स्पष्ट करीत, त्यावर अधिक भाष्य करण्याचे त्यांनी टाळले.