समाजसेवेसाठी अंतरात्म्याचा आवाज ऐका - भारत वाटवानी

समाजसेवेसाठी अंतरात्म्याचा आवाज ऐका - भारत वाटवानी

पुणे  - गरिबी, दारिद्य्र आणि प्रचंड दु:ख आपल्या भोवताली आहे. आपणही याच समाजाचा भाग आहोत. त्यावर फुंकर घालायची असेल, तर तरुणांनो उभे राहा. त्यासाठी तुमच्या अंतरात्म्याचा आवाज ऐका आणि सेवा करा, हेच सत्य आहे, अशा शब्दांत रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते भारत वाटवानी यांनी गुरुवारी तरुणाईला सेवाधर्म बजावण्याचा सल्ला दिला. 

"सकाळ'चे संस्थापक संपादक डॉ. नानासाहेब परुळेकर यांच्या 121 व्या जयंतीनिमित्त "सामाजिक बदलांमागील प्रेरणेचा प्रवाह' या विषयावर ते बोलत होते. याप्रसंगी सकाळ माध्यम समूहाच्या संचालक मृणाल पवार, संपादक सम्राट फडणीस उपस्थित होते. वाटवानी यांनी यादरम्यान त्यांच्या श्रद्धा रिहॅबिलिटेशन संस्थेने केलेल्या कार्याची दृकश्राव्य माध्यमातून उपस्थितांना माहिती दिली. आतापर्यंत हजारो मनोरुग्णांवर उपचार करून त्यांना मुख्य प्रवाहात आणताना त्यांना कुटुंबाच्या मायेची ऊबही त्यांनी मिळवून दिली. त्या प्रत्येक प्रसंगाचा अनुभव वाटवानी यांनी विशद केला. त्या वेळी उपस्थितांच्या डोळ्यांचा कडा पाणावल्या. 

डॉ. वाटवानी म्हणाले, ""सनदी लेखापालपासून असंख्य उच्चशिक्षित लोकांना मनोरुग्ण म्हणून समाजाने नाकारले. असे लाखो लोक त्या वेदना, जखमा घेऊन जगत आहेत. गरज आहे, ती त्यांना समजून घेण्याची. त्यासाठी समाजात जागृती होण्याची गरज आहे. जसा मधुमेह, रक्तदाब होतो, तसा मानसिक आजार कुणालाही होऊ शकतो; पण ते मान्य करण्याची कुणाची तयारी नसते. यातून समस्या जटिल होतात आणि त्यातून असंख्य लोक कुटुंबाच्या मायेला पारखी होतात.'' 

""मी मनोरुग्णांवर उपचारास सुरवात केली, त्या वेळी समाजातून विरोधही झाला; पण आतला आवाज ऐकला. काम करीत राहिलो. कोणत्याही फळाची अपेक्षा ठेवली नाही. सुरवातीला बायकोचे दागिनेही विकले; पण कामात खंड पडला नाही. या रुग्णांवर उपचार करून त्यांना त्यांच्या कुटुंबाशी जोडतो, त्या वेळी मिळणारे समाधान आणि त्या कुटुंबाने दिलेली दुवा यांचे मोल कशातच मोजता येणार नाही. देशात अजूनही तीन लाखांहून अधिक मनोरुग्ण रस्तोरस्ती फिरत आहेत. केवळ एक संस्था त्यासाठी पुरेशी पडणार नाही. अनेक स्वयंसेवी संस्थांनी हे काम सुरू केले पाहिजे,'' असे आवाहन त्यांनी केले. 

पुरस्कार प्रदान...  
स्वातंत्र्यसैनिक व पत्रकार कै. ना. अ. पेंडसे पुरस्कृत डॉ. नानासाहेब परुळेकर स्मृती पुरस्कार ः पुणे आवृत्तीचे बातमीदार ज्ञानेश सावंत, बीड आवृत्तीचे बातमीदार दत्ता देशमुख, तर पुणे जिल्हा आवृत्तीचे उपसंपादक शंकर टेमघरे यांना विशेष पुरस्कार. 

विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरीबद्दल विशेष पुरस्कार 
- जलसंधारण कामामध्ये योगदानाबद्दल विनायक वाळेकर 
- आठ अनाथ मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलणारे श्रीपाद घोडके आणि त्यांची पत्नी शलाका घोडके 
- नदीत बुडणाऱ्या महिलेसह तीन मुलांचा जीव वाचविणारे निवृत्त मेजर सुरेश भोसले. 
- ससून रुग्णालय व बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले 
- रस्त्यांवरील भिक्षेकऱ्यांवर उपचार करणारे डॉ. अभिजित आणि त्यांची पत्नी मनीषा सोनवणे 

मनोरुग्णांसाठी डॉ. वाटवानींचे कार्य 
- गेली 30 वर्षे सेवा. दहिसर येथे 20 खाटांच्या हॉस्पिटलपासून सुरवात. बाबा आमटे, प्रकाश आमटेंच्या कार्यापासून प्रेरणा 
- श्रद्धा रिहॅबिलिटेशन सेंटरच्या माध्यमातून निराधार व अनाथ मनोरुग्णांचे पुनर्वसन 
- आतापर्यंत 7 हजारांहून अधिक मनोरुग्णांवर उपचार करून कुटुंबीयांकडे सुपूर्त 
- अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित. आशियातील प्रतिष्ठेचा रॅमन मॅगसेसे पुरस्काराचे यंदाचे मानकरी 

डॉ.भारत वाटवानी म्हणाले... 
- देशात एकूण लोकसंख्येच्या एक टक्के लोक मनोरुग्ण 
- मानसिक रोगांबाबत समाजात अद्याप जागृती नाही 
- औषधोपचार मिळाल्यास मनोरुग्ण बरे होऊ शकतात 
- मनोरुग्णांना समाज स्वीकारायला तयार नाही हे वास्तव 
- मी देखील मानसिक तणावातून गेलो आहे 
- रस्त्यावरील प्रत्येक मनोरुग्णामध्ये मी स्वतःला पाहतो 

जवानाने सॅल्यूट केला ! 
काश्‍मीर येथील एक मुस्लिम मनोरुग्ण मला रस्त्यावर सापडला. त्याच्यावर उपचार केले. ते समजल्यावर भारतीय लष्करात असलेला त्याचा भाऊ मला भेटायला आला. तो म्हणाला, माझ्या भावाला त्यांनी दहशतवादी ठरविले, कारण तो गायब झाला होता. त्यामुळे मलाही टीका सहन करावी लागली; पण केवळ तुमच्यामुळे एक नाही तर दोघांवर लागलेला खोटा आरोप पुसला गेला, असे सांगत त्याने मला सॅल्यूट केला, अशी आठवण डॉ. वाटवानी यांनी सांगितली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com