एजंट, कर्मचाऱ्यांची युती

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 मार्च 2017

शिधापत्रिका कार्यालयातील चित्र; नागरिक त्रस्त

शिधापत्रिका कार्यालयातील चित्र; नागरिक त्रस्त
पुणे - शिधापत्रिकांशी संबंधित विविध कामांसाठी नागरिकांना शिवाजीनगर शासकीय गोदाम आवारातील सर्व परिमंडळ विभाग कार्यालयांमध्ये अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे; परंतु परिमंडळ अधिकाऱ्यांच्या "गैरहजेरी'चा गैरफायदा घेत "एजंट आणि कर्मचारी' एकत्र काम करत असल्याचे दिसून आले. "एजंटगिरी' आणि "दफ्तरदिरंगाई'च्या नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.

या संदर्भात भवानी पेठेतील ज्येष्ठ नागरिक प्रवीण पाटील म्हणाले, 'रीतसर नाव कमी करूनही एका महिन्यापासून मुलाचे स्वतंत्र शिधापत्रिका काढण्यासाठी कार्यालयात चकरा मारतोय. एका कर्मचाऱ्याने सांगितल्यानुसार आवारात एजंटला दोन हजार रुपये दिले. एका आठवड्यात केशरी शिधापत्रिका देतो, असे त्याने सांगितले; परंतु शिधापत्रिका न मिळाल्याने हा प्रकार अधिकाऱ्यांना सांगितला तर त्यांनी दुर्लक्ष केले.''

मंगळवार पेठेतील कल्पना गायकवाड म्हणाल्या, 'गोदामाच्या आवारात नवीन व्यक्ती आली की एजंट त्यांना गाठतात. अधिकाऱ्यांशी सेटिंग असल्याचे सांगून नवीन शिधापत्रिकेसाठी दीड ते दोन हजार रुपये घेतात. दोन आठवड्यांपासून परिमंडळ अधिकाऱ्यांना भेटण्याचा प्रयत्न करतेय; पण ते गायबच असतात.''

"ब' परिमंडळ अधिकारी, एस. आर. दांडगे म्हणाले, 'नागरिकांनी परिमंडळ कार्यालयात येऊन रीतसर अर्ज भरावा. कोणत्याही अनोळखी व्यक्तीला भेटू नये, त्यांच्याशी आर्थिक व्यवहार करू नये. येत्या दोन महिन्यांत ऑनलाइन प्रक्रिया सुरू होईल.''

शिधापत्रिकेसंदर्भातील सर्व कामे ऑनलाइन यंत्रणेद्वारे केली जाणार आहेत. हैदराबादच्या कंपनीकडून ई-पॉस मशीन आल्यानंतर ऑनलाइन अर्ज भरणे, स्वीकृती आणि ई-पेमेंट अशी कामे सुरू होतील. येत्या दोन महिन्यांत सेवा पूर्णपणे ऑनलाइन होईल. त्यामुळे एजंटगिरीला पूर्ण आळा बसेल.''
- शहाजी पवार, शहर अन्नधान्य वितरण अधिकारी

शासकीय दर
नवीन शिधापत्रिकेसाठी

- पिवळी 10 रु., केशरी 20 रु., पांढरी 50 रु.
दुय्यम (नक्कल) शिधापत्रिकेसाठी
- पिवळी 20 रु., केशरी 40 रु., पांढरी 100 रु.
प्रतिज्ञापत्रासाठी 100 रुपये
- एजंटांचा दर दीड ते दोन हजार रुपये - एका शिधापत्रिकेसाठी

Web Title: ration card agent