रेशनिंगच्या गव्हासह टेंपो वाघोलीमध्ये पकडला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 एप्रिल 2017

माहिती अधिकार कायकर्त्यांच्या दक्षतेमुळे 200 पोती जप्त

वाघोली (पुणे): काळ्या बाजारात विक्रीसाठी चाललेला रेशनिंगचा 200 पोती गहू मनसे व माहिती अधिकार कायकर्त्यांच्या दक्षतेमुळे वाघोलीतील पेट्रोल पंपाजवळ बुधवारी (ता. 12) रात्री दहाच्या सुमारास पकडला. याप्रकरणी टेंपोचालकांसह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी येथून तो गहू भरण्यात आला असताना कागदोपत्री मात्र तो ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्‍यातील मदाने गावातून आणल्याचे दर्शविण्यात आले.

या प्रकरणी हवेलीचे तहसीलदार प्रशांत सुरेश पिसाळ यांनी फिर्याद दिली. चालक संदीप नामदेव गुंड (वय 28, रा. पारगाव, नगर) यांच्यासह भोसरी येथील अज्ञात व्यक्ती, जय आनंद फूड इंडस्ट्रीज व शंकेश्वर फूड प्रॉडक्‍ट्‌सचे संचालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनसे व माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश तावरे व संदीप गुंड यांना रेशनिंगचा गहू काळ्या बाजारात विक्रीसाठी नेत असल्याचे समजले. त्यांनी आळंदीमार्गे टेंपो जात असताना लोणीकंद पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तहसीलदारांना याबाबत कळविले. वाघोलीतील नेवासकर पेट्रोल पंपाजवळ पोलिस उपनिरीक्षक शिवशांत खोसे व पोलिस कर्मचारी यांनी हा टेंपो पकडला. तहसीलदार पिसाळ यांनी टेंपोचालकाकडे चौकशी केली असता, तो भोसरी येथून भरण्यात आल्याचे व नगरमधील सुपा एमआयडीसीतील शंकेश्वरा फूड इंडस्ट्रीजमध्ये नेत असल्याचे सांगितले. तो गहू भिवंडी तालुक्‍यातून आणल्याची पावती चालकाकडे होती. अंदाजे 10 टन वजन असलेल्या या गव्हाची किंमत सुमारे दोन लाख रुपये आहे. चालकाचा जबाब व गव्हाचा पंचनामा केल्यानंतर लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली.

भोसरी येथील स्पाइन रोडवरील राकेश नामक व्यक्तीच्या गोदामातून हा माल भरण्यात आल्याचे सांगितले. चालकाकडून एकाचा मोबाईल नंबर मिळाला आहे. हा त्याचाच असण्याची शक्‍यता आहे.