आता बाह्यमार्गांनीही होता येते संमेलनाध्यक्ष 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 फेब्रुवारी 2017

साहित्यातील राजकारणावर नाटककार रत्नाकर मतकरी यांचे सडेतोड भाष्य 

पुणे - ""एकमेकांना पुढे आणणारे वेगवेगळे कळप साहित्याच्या क्षेत्रात आहेत. त्यातूनच नाट्य किंवा साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होणे यासारख्या प्रतिष्ठेच्या कल्पना उगाचच तयार झाल्या आहेत. मात्र संमेलनाध्यक्ष झाल्याने लेखकाला प्रतिष्ठा मिळते असे नाही. ते तर तुमच्या व्यक्तिमत्त्व आणि लेखनावर ठरते; पण हे कठीण असल्याने संमेलनाध्यक्ष होण्यासाठी वेगवेगळ्या बाह्यमार्गांचा अवलंब केला जातो. ही सद्य:स्थिती आहे,'' अशा शब्दांत नाटककार रत्नाकर मतकरी यांनी साहित्य वर्तुळातील राजकारणावर भाष्य केले. 

समकालीन प्रकाशनाच्या समारंभात मतकरी यांच्या "कायमचे प्रश्‍न' या पुस्तकाचे प्रकाशन झाले. त्यानंतर विश्‍वंभर चौधरी आणि सुनीती सु. र. यांनी त्यांच्याशी संवाद साधला. यानिमित्ताने समाजातील कायमचे प्रश्‍न, नर्मदा बचाव आंदोलनातील सहभाग इथपासून साहित्य संमेलनातील राजकारण्यांचा वावर, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर होणारे हल्ले अशा नानाविध विषयांवर मतकरी यांनी आपली परखड मते मांडली. "समकालीन'चे आनंद अवधानी, सुहास कुलकर्णी उपस्थित होते. 

मतकरी म्हणाले, ""साहित्य संमेलनाला राज्य सरकार 25 लाख रुपयांचा निधी देतो; पण पैसे दिल्यानंतर सांस्कृतिक मंत्री संमेलनाला येतात कशाला? निधी देतो; पण संमेलनाला येणार नाही. माझ्यासमोर बरीच कामे आहेत, या कामांसाठीच मी मंत्री झालो आहे, असे म्हणणारा एखादा तरी सांस्कृतिक मंत्री महाराष्ट्राला मिळेल का? पण असे होत नाही. उलट आम्ही सांगू त्या तारखेला संमेलन घ्या, अशी अट मंत्री घालतात. ते येतात, गर्दी येते. ते जातात, गर्दी जाते. त्यामुळे संमेलनाध्यक्षाकडे दुर्लक्ष होते.'' 

समाजातील कुठलाही प्रश्‍न नैतिकतेशी जोडला गेलेला आहे. त्यामुळे अनैतिकतेची उतरंड कशी कमी करता येईल, सर्वसामान्यांना सुखाने जगता येईल, यासाठी उलट्या बाजूने विचार कसा करता येईल, हे पाहिले पाहिजे, असेही ते म्हणाले. 

Web Title: Ratnakar matkari's straightforward comment