पुण्यात रेडीरेकनर दरात 3.64 टक्के वाढ

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 एप्रिल 2017

कोरेगाव पार्क-कल्याणीनगर ठरला महागडा परिसर; ग्रामीण भागात 15.3 टक्‍क्‍यांची वाढ

कोरेगाव पार्क-कल्याणीनगर ठरला महागडा परिसर; ग्रामीण भागात 15.3 टक्‍क्‍यांची वाढ
पुणे - दरवर्षीप्रमाणे यंदाच्या आर्थिक वर्षात एक एप्रिलपासून लागू केलेले रेडीरेकनर (वार्षिक मूल्य दर तक्‍ते) आज नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने जाहीर केले. त्यानुसार रेडीरेकनगरमध्ये पुणे शहर महापालिका हद्दीत 3.64 टक्केइतकी दरवाढ करण्यात आली आहे. गतवर्षी हा दर 7 टक्के होता.

रेडीरेकनच्या दरात या वर्षी कोणतीही दरवाढ करू नये, अशी जोरदार मागणी लोकप्रतिनिधींनी केली होती. त्यानुसार गेल्या सात वर्षांतील सर्वांत कमी दरवाढ प्रथमच यंदा झाली आहे. त्यामुळे शहरातील घरांच्या खरेदी-विक्रीला चालना मिळणार आहे. नव्या रेडीरेकनरनुसार कोरेगाव पार्क-कल्याणीनगर हा नेहमीप्रमाणेच सर्वांत महागडा परिसर ठरला आहे, तर सर्वांत कमी दर भवानी पेठ आणि नाना पेठ परिसरासाठी निश्‍चित केला आहे. मध्यवर्ती पेठांमध्ये सर्वाधिक बाजारमूल्य कुमठेकर रस्ता-विश्रामबाग वाडा परिसरासाठी, तर जमिनीचा सर्वाधिक भाव लक्ष्मी रस्त्यावरील जागेचा ठरला. यंदाच्या वर्षीदेखील औंध-बाणेर, एरंडवणा, भांडारकार रस्ता, लॉ कॉलेज रस्ता परिसराने रेडीरेकनरचा सर्वाधिक दर मिळविण्याची परंपरा कायम राखली आहे.

पुण्याच्या रेडीरेकनरसंदर्भात माहिती देताना नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचे महानिरीक्षक डॉ. एन. आर. रामास्वामी म्हणाले, 'पुणे ग्रामीण भागात 15.3 टक्के, तर प्रभाव क्षेत्रात 7.81 टक्के, नगरपालिका व नगर परिषद 7.24 टक्के वाढ करण्यात आली आहे. पुणे महापालिका हद्दीत 3.64 टक्के आणि पिंपरी-चिंचवड पालिका हद्दीत 4.46 टक्के सरासरी वाढ करण्यात आली आहे. संपूर्ण पुणे जिल्ह्यात सरासरी 8.60 टक्के दरवाढ झाली आहे. जिल्ह्यात भोर आणि वेल्हे परिसरात होणारे जमिनींचे खरेदी व्यवहार वाढीव दराने होत असताना शासकीय दर मात्र कमी असल्याने त्या ठिकाणी यंदा दरवाढ सुचविण्यात आली आहे. तसेच शहराला लागून असलेल्या हवेली, मुळशी, वडगाव मावळ या तालुक्‍यांचा निम्मा भाग महापालिका क्षेत्रात मोडत असून, उर्वरित क्षेत्र हे ग्रामीण भागात गणले जाते. त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणावर विकासाला संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शहराच्या तुलनेत जिल्हा आणि उपनगरांमध्ये वार्षिक दर मूल्य जास्त निश्‍चित केले आहेत.''

'केवळ एखादा प्रकल्प येणार आहे किंवा विकासाची कामे जास्त होतात, म्हणून त्या ठिकाणाचे दर वाढविले जात नाहीत, तर ज्या त्या ठिकाणच्या बाजारपेठांमधील वस्तुस्थितीचे आकलन करून वार्षिक दर मूल्य (रेडीरेकनर) आणि चालू बाजारभाव यांची सांगड घालून रेडीरेकनरचे दर निश्‍चित केले जातात.

यंदा जनतेवर अतिरिक्त बोजा न देता, सर्वसामान्य नागरिकांना घर, सदनिका खरेदी करण्यासाठी दिलासादायक दर देण्याचा प्रयत्न केला आहे.''
- डॉ. एन. रामास्वामी, महानिरीक्षक, राज्य नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग