रेडीरेकनर, मुद्रांक शुल्क "ऑनलाइन' कळणार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 एप्रिल 2017

पुणे - घर किंवा सदनिका खरेदी करताना त्यासाठी किती मुद्रांक शुल्क (स्टॅम्प ड्यूटी) भरायचा, याची अचूक माहिती नागरिकांना मिळत नव्हती. त्यामुळे मालमत्ता खरेदीदरम्यान आर्थिक फसवणुकीचे गैरप्रकार होतात; परंतु आगामी काळात रेडिरेकनरचे दर आणि मुद्रांक शुल्क संकेतस्थळावर "ऑनलाइन' उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे नागरिकांना घरबसल्या त्यांच्या मालमत्तेसाठी किती मुद्रांक शुल्क भरावे लागेल, याची अचूक माहिती मिळू शकणार आहे.

येत्या एक एप्रिलपासून प्रायोगिक तत्त्वावर ही सुविधा मुंबईत सुरू होणार असून, येत्या दोन महिन्यांमध्ये राज्यभरात ही सेवा उपलब्ध होणार आहे. या संदर्भात राज्याचे नोंदणी व मुद्रांक महानिरीक्षक डॉ. एन. रामस्वामी म्हणाले, ""स्वतंत्र सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले असून, त्यामध्ये नागरिकांनी संबंधित मालमत्तेचा सर्व्हे क्रमांक दिल्यानंतर रेडीरेकनरचा दर आणि मुद्रांक शुल्क याची अचूक माहिती मिळेल. तेवढीच स्टॅम्प ड्यूटी खरेदीदारालादेखील भरावी लागणार आहे.

सध्या ही सुविधा केवळ उपनिबंधकांना उपलब्ध आहे; परंतु येत्या काही महिन्यांमध्ये राज्यभरात ही सेवा सुरू केली जाईल. संकेतस्थळावरून "ऑनलाइन' कोणालाही स्टॅम्प ड्यूटीची रक्कम बघता येईल. आतापर्यंत स्टॅम्प ड्यूटी कमी भरण्याचे अनेक गैरप्रकार घडले आहेत. त्यामध्ये विभागाकडून दोषींना नोटिसा बजावून त्यांच्याकडून वसुलीदेखील केलेली आहे, तर काहींच्या मालमत्तादेखील जप्त केलेल्या आहेत. मात्र, आता ऑनलाइन सुविधेमुळे खरेदी व्यवहारादरम्यान होणारे आर्थिक फसवणुकीचे गैरप्रकार कायमचे बंद होतील व पारदर्शकता निर्माण होईल,'' असा विश्‍वास त्यांनी या वेळी व्यक्त केला.

Web Title: ready reconer stamp duty online