स्वतंत्र गटाबाबतचे महापौरांना आज पत्र

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 मार्च 2017

पिंपरी - राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी योगेश बहल यांची झालेली निवड अमान्य करून पक्षाच्या विरोधात ३६ पैकी २४ नगरसेवकांनी पुकारलेला बंडाचा पवित्रा कायम ठेवत सभागृहात वेगळा गट स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी (ता. १४) निवडीनंतर तसे पत्र महापौरांकडे दिले जाणार आहे. बंडखोर गटाचे नेते व नवनिर्वाचित नगरसेवक दत्ता साने यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना ही माहिती दिली.

पिंपरी - राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी योगेश बहल यांची झालेली निवड अमान्य करून पक्षाच्या विरोधात ३६ पैकी २४ नगरसेवकांनी पुकारलेला बंडाचा पवित्रा कायम ठेवत सभागृहात वेगळा गट स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी (ता. १४) निवडीनंतर तसे पत्र महापौरांकडे दिले जाणार आहे. बंडखोर गटाचे नेते व नवनिर्वाचित नगरसेवक दत्ता साने यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना ही माहिती दिली.

ते म्हणाले, ‘‘आमची भूमिका ठाम असून, आजवर ज्यांच्यामुळे पक्षाचे वाटोळे झाले, त्यांनाच पुन्हा गटनेतेपदी बसविण्याची चूक अजित पवार यांनी केली; जी असंख्य नगरसेवकांना अमान्य आहे. स्थानिक नेत्यांमुळे पक्ष अनेकदा अडचणीत आला. पक्षाचा पराभवही त्याच ठराविक नेत्यांमुळे झाला. हे माहीत असूनही वरिष्ठ नेते त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. सत्तेत असताना त्यांना संधी आणि सत्तेवरून दूर झालो तरी त्यांनाच संधी दिली जाणार असेल, तर आम्ही करायचे काय? अन्य कोणाला संधी मिळणार नसेल, तर अशा पक्षात न राहिलेले बरे. त्यासाठीच आम्ही स्वतंत्र गट स्थापण्याचा निर्णय घेतला आहे.’’

मंगळवारी (ता. १४) नवे महापौर, उपमहापौर यांची सर्वसाधारण सभेच्या वेळी निवड होईल. त्यानंतर आम्ही आमच्या स्वतंत्र गटाचे पत्र महापौरांकडे सोपविणार आहोत. आमच्याबरोबर चोवीस नगरसेवक आहेत. येत्या २० तारखेपर्यंत आम्ही काय आहोत, याची चुणूक राष्ट्रवादी काँग्रेसला दाखवून देऊ, असा इशाराही साने यांनी दिला.

दरम्यान, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी वेगळा गट स्थापन करण्यामागे सत्ताधारी भाजपचा काहीतरी डाव असावा, अशी शंका राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे. ज्या राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या कारकिर्दीत भाजप-शिवसेनेला विरोधी पक्षनेतेपदही मिळू दिले नाही, आपल्यासोबत आघाडी केलेल्या काँग्रेसला हे पद दिले, तशीच वेळ आता राष्ट्रवादी काँग्रेसवर आली आहे. विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादी काँग्रेसला मिळू नये यासाठी भाजपचा हा डाव असल्याचे बोलले जाते. मात्र, या बाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना कोणतीच कल्पना नसावी. हे वैयक्तिक भांडण आहे आणि ते मिटेल, अशी पक्षाची धारणा आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडून या भांडणाकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. त्याला फारशी किंमतही दिली जात नाही. 

योगेश बहल आणि दत्ता साने यांचे हे वैयक्तिक भांडण आहे. त्याचा पक्षाशी काहीही संबंध नाही. त्याला जास्त महत्त्व देण्याची आवश्‍यकता नाही. जो गटनेता निवडला, तो आमचे नेते अजित पवार यांनी निश्‍चित काहीतरी हेतू ठेवूनच निवडलेला असणार. त्यावरून वाद होण्याचे कारण नाही. साने यांना आम्ही समजविण्याचा प्रयत्न करू.
- संजोग वाघेरे पाटील, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस