लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियतेचे रेकॉर्ड नोंदवा

लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियतेचे रेकॉर्ड नोंदवा

कळस - ‘‘ज्याच्या मनगटात ताकद व अंगात पाणी आहे, तोच इंदापूर तालुक्‍यात कालव्याला पाणी आणू शकतो. निष्क्रिय माणूस पाणी आणू शकत नाही. आम्ही केवळ रास्ता रोको आंदोलनाचे निवेदन दिले तर तालुक्‍यात पाणी आले. निष्क्रिय लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियतेची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद होणे गरजेचे आहे,’’ अशी टीका माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आमदार दत्तात्रेय भरणे यांचे नाव न घेता केली.

पळसदेव (ता. इंदापूर) येथे पुणे-सोलापूर महामार्गावर तालुक्‍याच्या पाणीप्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या वेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ॲड. कृष्णाजी यादव, विलास वाघमोडे, मयूरसिंह पाटील, मंगेश पाटील, हनुमंत बनसुडे, शरद काळे, संतोष काळे, भूषण काळे, माउली बनकर, लालासाहेब पवार, भरत शहा यांच्यासह हजारो शेतकरी उपस्थित होते. 

पाटील म्हणाले, ‘‘खडकवासला कालव्यातून तालुक्‍यातील ४० हजार एकर शेतीला पाणी मिळणे नियमानुसार गरजेचे आहे. मात्र, गेल्या चार वर्षांत चार एकरालाही पाणी मिळाले नाही. तीस कोटी रुपये खर्चून कालव्याच्या सणसर कटची निर्मिती केली. त्याद्वारे ३.२ टीएमसी पाणी मिळणे गरजेचे आहे. त्यातूनही पाणी मिळालेले नाही. मग तालुक्‍याच्या वाटणीचे ७.२ टीएमसी पाणी गेले कोठे? रस्त्यांची कामे मंजूर करायला आमदार लागतो, असे म्हणणाऱ्यांनी कालव्याचे पाणी आणण्यासाठी मग कोण लागतो, याचे उत्तर द्यावे. तालुक्‍याचा पाणीप्रश्न सोडविण्यात लोकप्रतिनिधी अपयशी ठरले आहेत. आमच्या आंदोलनाला स्टंटबाजी म्हणणाऱ्यांना २०१९ मध्ये खरा स्टंट कसा असतो, हे समजेल.’’

 खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता पांडुरंग शेलार, पुणे पाटबंधारे विभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता बी. के. शेटे, तहसीलदार सोनाली मेटकरी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. तहसीलदार मेटकरी यांनी तलावात पाणी सोडण्याबाबतचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्याचे आश्वासन दिले.

अधिकाऱ्यांच्या ७० टक्के जागा रिक्त
इंदापूर तालुक्‍यातील ७० टक्के अधिकाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत. पाटबंधारे विभागाच्या नीरा डावा कालव्याच्या पणदरे, बारामती व निमगाव केतकी येथील उपविभागीय कार्यालयातील अभियंत्याच्या जागा रिक्त आहेत. पणदऱ्यापासून वडापुरीपर्यंत केवळ दोन पाटकरी आहेत, त्यातील एक निवृत्त झाला आहे. खडकवासला पाटबंधारे विभागातील उपविभागीय अभियंत्यांची पदे रिक्त आहेत. शिवाय, पाच ठिकाणी शाखाधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. चार नायब तहसीलदारांपैकी केवळ एकच कार्यरत आहे. तालुक्‍यात अधिकारी आणायचे काम कोणाचे, असा सवाल हर्षवर्धन पाटील यांनी भरणे यांना नाव न घेता विचारला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com