दौंड शहरातील तब्बल ४१ तासानंतर वीजपुरवठा पूर्ववत

प्रफुल्ल भंडारी
बुधवार, 30 मे 2018

दौंड शहरातील बहुतांश भागात तब्बल 41 तासानंतर वीजपुरवठा पूर्ववत झाला असून काही भागात दुरूस्तीचे काम सुरू असल्याने सायंकाळी पाच वाजेपर्यंत वीजपूरवठा खंडित होता. सोमवारच्या वादळी पावसात दौंड शहर, पाटस ते देऊळगाव राजे आणि कुरकुंभ पर्यंतचा भाग समाविष्ठ असलेल्या दौंड उपविभागातील विजेचे एकूण 190 खांब कोसळले होते. 

दौंड(पुणे) : दौंड शहरातील बहुतांश भागात तब्बल 41 तासानंतर वीजपुरवठा पूर्ववत झाला असून काही भागात दुरूस्तीचे काम सुरू असल्याने सायंकाळी पाच वाजेपर्यंत वीजपूरवठा खंडित होता. सोमवारच्या वादळी पावसात दौंड शहर, पाटस ते देऊळगाव राजे आणि कुरकुंभ पर्यंतचा भाग समाविष्ठ असलेल्या दौंड उपविभागातील विजेचे एकूण 190 खांब कोसळले होते. 

मंगळवारी (ता.29) रात्री अकरा वाजता मुख्य बाजारपेठ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. आंबेडकर चौक व महात्मा गांधी चौक या परिसरातील वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला. आज (ता. 30) दुपारी एक वाजता अहिल्यादेवी होळकर सहकार चौक, जनता कॅालनी, गोकुळ हॅाटेल रस्ता व परिसरातील वीजपुरवठा सुरू करण्यात आला. परंतु, दुपारी साडेचार पर्यंत त्या भागात विजेचा लपंडाव सुरू होता.

शहरात दिवसाआड एक वेळ पाणीपुरवठा केला जात असून आज पाणी आल्यानंतर नागरिकांनी डिझेल जनरेटर लावून पंपाच्या साह्याने पाणी घ्यावे लागले. सलग 41 तास वीज नसल्याने विजेवर अवलंबून असलेले पिठाची गिरणी, आईस्क्रीम पार्लर, पिण्याचे पाणी पुरविणारी केंद्रे, आदी व्यवसाय कालपासून ठप्प होते. शहरात आज ज्या भागात वीज होती तेथे वीज नसलेल्या भागातील नागरिक आपले नातेवाईक, परिचित यांच्याकडे पिण्याचे पाणी भरण्यासाठी आणि मोबाईल रिचार्ज करण्यासाठी गेल्याचे पाहावयास मिळाले.

दौंड नगरपालिकेने महावितरणच्या कर्मचाऱ्यांना वीजवाहीन्यांवर उन्मळून पडलेली मोठी झाडे हटविण्यासाठी सहकार्य केले. परंतु मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, सेंट सेबॅस्टियन स्कूल रस्ता, कुरकुंभ रस्ता, रेल्वे वसाहत, आदी ठिकाणची झाडे सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत हटविण्यात आली नव्हती.

Web Title: Recover of electricity supply in Daund city after 41 hours