ब्रेकडाउनचे प्रमाण कमी करा - तुकाराम मुंढे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 एप्रिल 2017

पुणे - पीएमपीमधील ब्रेकडाउनचे वाढलेले प्रमाण तातडीने कमी करून दहा टक्‍क्‍यांवर आणण्यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी प्रशासनाला शुक्रवारी दिले. सध्या सुमारे 20 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक बस दररोज नादुरुस्त होतात.

पुणे - पीएमपीमधील ब्रेकडाउनचे वाढलेले प्रमाण तातडीने कमी करून दहा टक्‍क्‍यांवर आणण्यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी प्रशासनाला शुक्रवारी दिले. सध्या सुमारे 20 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक बस दररोज नादुरुस्त होतात.

पीएमपीच्या स्वतःच्या आणि भाडेतत्त्वावरील, अशा सुमारे 250-300 बस दररोज नादुरुस्त होतात. त्यामुळे काही बसची रस्त्यावरच दुरुस्ती करावी लागते, तर काही बस कार्यशाळेत आणून त्यांची दुरुस्ती करावी लागते. एकूण बससंख्येच्या तुलनेत हे प्रमाण 20 टक्‍क्‍यांहून जास्त आहे, त्यामुळे अनेक मार्गांवरील बस नादुरुस्त होत असल्यामुळे तेथील फेऱ्यांवर परिणाम होतो. परिणामी प्रवाशांची गैरसोय होते.

अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यावर मुंढे यांनी जास्तीत जास्त बस रस्त्यावर कशा येतील, यावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी मुख्य अभियंता सुनील बुरसे आणि संबंधित अधिकाऱ्यांची त्यांनी शुक्रवारी बैठक घेतली. भाडेतत्त्वावरील बस नादुरुस्त होण्याचे प्रमाण जास्त असल्याचे लक्षात आल्यावर संबंधित ठेकेदारांना देखभाल - दुरुस्तीवर लक्ष केंद्रित करण्याचा आदेश त्यांनी दिला. तसेच, पीएमपीच्या बसही जास्तीत जास्त मार्गावर धावतील, यासाठीचे उद्दिष्ट त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. बसच्या देखभाल - दुरुस्तीसाठी सुटे भाग वेळेत उपलब्ध होतील, यासाठीही उपाययोजना करण्याचे आदेश त्यांनी दिले.

ई-तिकिटिंगचे काम पूर्ण
पीएमपीच्या 13 आगारांमधील बसमध्ये प्रवाशांसाठी ई-तिकिटिंगचे काम नुकतेच पूर्ण झाल्याची माहिती वाहतूक महाव्यवस्थापक अनंत वाघमारे यांनी दिली. गेल्या तीन महिन्यांपासून हे काम सुरू होते. पीएमपी प्रशासनाने दैनंदिन प्रवासासाठी "मी कार्ड' सुरू केले आहे. त्यासाठी येत्या जून महिन्यापासून प्रवाशांना या कार्डचे वाटप करण्यात येणार आहे. दैनंदिन वापरात मी कार्ड यावे, यासाठी ई-तिकिटिंग पूर्ण होणे आवश्‍यक होते. ई-तिकिटिंग संगणक प्रणालीला जोडले असल्यामुळे कोणत्या मार्गावर किती प्रवासी आहेत, प्रवाशांची चढ-उतार कोणत्या मार्गावर सर्वाधिक होते, उत्पन्न किती आदींची माहिती प्रशासनाला अल्पावधीतच मिळू शकेल.

Web Title: Reduce the breakdown rate