औंध रस्त्यावरील ३३ झाडांचे पुनर्रोपण

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 डिसेंबर 2016

पुणे - क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक ते औंधमधील ब्रेमेन चौकादरम्यानच्या रस्त्यावरील ३३ जुन्या आणि मोठ्या वृक्षांचे पुनर्रोपण करण्याची शिफारस अधिकारी आणि वृक्ष प्राधिकरणाच्या समितीने प्रत्यक्ष पाहणीनंतर मंगळवारी केली, तर विद्यापीठ चौक ते सिमला ऑफिस चौकदरम्यानची १० झाडे तोडण्याचा प्रस्ताव नामंजूर करण्यात आला. 

औंध रस्त्यावर नजीकच्या काळात बीआरटी कार्यान्वित होणार आहे. या कामात अडथळा येऊ नये, म्हणून राजभवनसमोरील म्हणजे चतुःशृंगी पोलिस ठाण्याच्या रांगेतील ३३ झाडांच्या पुनर्रोपणाचा प्रस्ताव पथ विभागाने ठेवला होता. वृक्ष प्राधिकरण समितीची बैठक गेल्या आठवड्यात झाली. त्यात प्रत्यक्ष पाहणीनंतर झाडांच्या पुनर्रोपणाच्या शिफारशीचा विचार करण्याचे ठरले होते. त्यानुसार महापालिकेच्या वृक्ष अधिकारी प्रीती सिन्हा, वृक्ष प्राधिकरण समितीचे सदस्य नंदकुमार मंडोरा, गोविंद थरकुडे आणि कविराज संघेलिया आणि वाहतूक पोलिस यांच्या पथकाने पाहणी केली. त्यात राजभवनसमोरील ३३ झाडांचे मागील बाजूस पुनर्रोपण करण्यासाठी आयुक्तांकडे शिफारस करण्याचे ठरले, तर सिमला ऑफिस ते विद्यापीठ चौका दरम्यानची दहा झाडे तोडण्याची आवश्‍यकता नसल्याचीही शिफारस या वेळी संयुक्त समितीने केली. त्यामुळे १० झाडांना जीवदान मिळाले आहे.

अधिकारी आणि सदस्यांच्या शिफारशीवर प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणजेच आयुक्त कुणाल कुमार यांनी स्वाक्षरी करून मंजुरी दिल्यावर हे काम सुरू होणार आहे. औंध रस्त्यावरील वाहतूक काही प्रमाणात यामुळे सुरळीत होणार आहे; मात्र बाणेर रस्त्यावरील विद्यापीठ चौकातील झाडांची तोडणी करून रस्ता रुंदीकरण करण्याच्या शिफारसीवर अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे तेथील वाहतुकीची कोंडी कायम आहे.