उज्ज्वल भवितव्याची जबाबदारी सर्वांची - पवार

Prataprao-Pawar
Prataprao-Pawar

पुणे - ‘लोक एकत्र येतात तेव्हा एखादा समाज अथवा धर्म वाढत असतो. मात्र, त्याच्या उलट परिस्थिती निर्माण झाली तर समाज किंवा धर्माचा ऱ्हास होतो. संघटित झालो तर विचारशक्ती वाढते. प्रत्येक धर्मातील व्यक्तीलादेखील त्याचे आयुष्य चांगले असावे, असे वाटते. म्हणूनच भारताचे भवितव्य उज्ज्वल करण्याची जबाबदारी समाजातील सर्व घटकांची आहे,’’ असे मत सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी व्यक्त केले. 

‘जमाअत-ए-इस्लामी हिंद’तर्फे आयोजित ‘बहुसांस्कृतिकता आणि विश्‍वशांती’ या विषयावरील चर्चासत्रप्रसंगी पवार बोलत होते. साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस, प्रा. अजीज मोहियोद्दीन, डॉ. सय्यद रफीक पारनेरकर, सचिन पवार आदींनीही या प्रसंगी त्यांचे विचार व्यक्त केले. 

पवार म्हणाले, ‘‘सर्वधर्मीय एकोपा हा समाजाच्या व देशाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. कारण जगभरातील कोणत्याही धर्माचा सर्वसामान्य माणूस असो, तो चांगला आहे. त्याच्या मनात पाप नाही. मात्र, सदसद्विवेक बुद्धी जागृत ठेवली तर सर्वांचेच भले होईल. समाजात एकोपा निर्माण करण्यासाठी ज्या कोणी व्यक्ती व संस्था झटत आहेत. त्या सर्वांना माझा मनापासून पाठिंबा आहे. त्याच भूमिकेतून मी येथे आलो आहे.’’ 

डॉ. सबनीस म्हणाले, ‘‘धर्म मानव निर्मित आहे. विवेकी लोकांनी भारताची एकात्मता जपण्याची गरज आहे. राम, रहीम, येशूख्रिस्त, बसवेश्‍वरांचा विचार स्वीकारला पाहिजे. सर्वधर्मातील संतांनी या देशातील नागरिकांमध्ये त्यांच्या विचार संस्कृतीने प्रबोधन केले आहे.’’ डॉ. पारनेरकर म्हणाले, ‘‘संतांनी व पैगंबरांनी आपल्या वचनांतून मानव जातींचे रक्ताचे नाते वर्णिले आहे; परंतु माणसे संस्कृती व धर्माला विसरली असून, चंगळवाद बोकाळला आहे.’’ मोहियोद्दीन म्हणाले, ‘‘धर्मा-धर्मातील वादविवाद मिटविण्यासाठी प्रेमाची भाषा उपयुक्त ठरेल.’’ 

सचिन पवार म्हणाले, ‘‘धर्म एकमेकांप्रती बंधुता शिकवितो. म्हणून अल्लाह व ईश्‍वरासमोर आपण समान आहोत, हीच भावना नागरिकांमध्ये असावयास हवी.’’ इम्तियाज शेख यांनी प्रास्ताविक केले. दीपक म्हस्के यांनी सूत्रसंचालन केले. फरजान सय्यद यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com